Sunday, September 23, 2012

श्रीमत दासबोध नवनीत




 
                                                   अंतरंग                  

                          पृष्ठ क्रमांक

१)     दशक ५ वा समास ६ वा  शुद्धज्ञान निरुपण      
२)     दशक ६ वा समास २ रा  ब्रम्हपावन निरुपण
३)     दशक ६ वा समास ३ रा मायोदभाव निरुपण
४)     दशक ६ वा समास १ ला देवशोधन नाम
५)     दशक ६ वा समास ५ वा माया ब्रह्मनिरूपण
६)     दशक ७ वा समास २ रा ब्रह्मनिरूपण
७)     दशक ८ वा समास ६ वा ओवी ४१ ते ४६
८)     दशक ८ वा समास ७ वा ओवी १८ ते २८
९)     दशक ८ वा समास ७ वा ओवी ५७ आणि ५८
१०) दशक ९ वा समास २ रा ओवी ३३ आणि ३४
११) दशक ११ वा समास २ रा ओवी ८
१२) दशक १८ वा समास ८ वा ओवी ६ ते १०
१३) दशक ९ वा समास ८ वा देहांतनिरुपण
१४) दशक १२ वा समास ३ रा भक्तनिरुपण
१५) दशक १५ वा समास १० वा ओवी १५
१६) दशक १६ वा समास ७ वा ओवी १ आणि २
१७) दशक १६ वा समास १० वा ओवी ९ आणि १०
१८) दसक १७ वा समास १ ला ओवी २५ ते २७
१९) दशक १७ वा समास २ रा ओवी ६ आणि ७
२०) दशक १५ वा समास ३ रा   श्रेष्ठ अंतरात्मानिरुपण
२१) दशक १४ वा समास ९ वा  शाश्वत निरुपण
२२) दशक १२ वा समास ७ वा विषयत्याग निरुपण
२३) दशक ७ वा समास ७ वा ओवी १, १५, ४३
   २४)दशक  ५ वा समास ६ वा ओवी ४५   
   २५)दशक  ४ था समास ९ वा  आत्मनिवेदन भक्ती.







                         नम्रनिवेदन
श्री समर्थ रामदास या नांवाचा उच्चार करिताच आपल्या डोळ्यांसमोर एक उंच, गौरवर्णी, पाणीदार नेत्रांची, सरळ नासिका असलेली,कसदार शरीरयष्टी असलेली आणि खणखणीत आवाज असलेली एक भव्य, दिव्य मूर्ती उभी राहते. अगदी लहान पणापासूनच असलेली त्यांची एकांताची आवड आणि अखिल जनसमुदायाच्या उद्धाराची तळमळ, ही श्री समर्थांच्या भावी उज्वल जीवनाचा पाया ठरली. वयाच्या बाराव्या वर्षी, मातेच्या आग्रहास्तव लग्न मंडपाच्या बोहल्यावर चढलेला हा किशोर अवस्थेतील नारायण. पुरोहितांनी सावधान असे म्हणताच खरोखरी सावधान झाला आणि त्याने लग्न मंडपातून धूम ठोकली. भानुजी गोसावी यांच्या कन्येच्या रुपाने मायादेवी हाती माळ घेवून, सर्वोतपरी सज्ज होऊन आपले मोहजाल पसरविण्याचा प्रयत्न करीत होती. परंतु अशावेळी माया आणि मायाकार्य या दोहींच्या मोहाचा स्पर्श नारायणाने आपल्या हृदयास मुळीच होऊ दिला नाही. या अद्भूत प्रसंगाच्या अनुसंगाने संत श्री गिरीधर स्वामी म्हणतात ऐसे कोठे नाही ऐकिले हो, वर्तले पूर्वी अवतारादिकांसी न झाले| माया, मोहिनीने ब्रहादिकांस भुलविले| नाना पुराणे  ऐकिली|| (समर्थ प्रताप २-४३)
ज्या किशोर अवस्थेत खेळावयाचे, आनंदाने हुंदडायचे, रंगीन स्वप्नात रंगून जायचे, त्याच वयात या नारायण बाळाने बारा वर्षे गोदावरी काठी राहून, धगधगीत ब्रम्हचर्याचे पालन करून श्रीरामांची तपश्चर्या केली आणि प्रभुना प्रसन्न करून घेतले. आता बालक नारायण समर्थ रामदास या नांवाने ओळखला जाऊ लागला. यानंतर समर्थांनी जनता-जनार्दनाचा उद्धार करण्याचे जणू हाती कंकणच बांधले. या मार्गाने वाटचाल करण्यासाठी प्रथम त्यांनी आसेतु-हिमाचल यात्रा केली. सर्व तीर्थांची दर्शने घेतली आणि त्या काळाच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचे सूक्ष्म अवलोकन केले. यवनी राजांच्या राजवटीत हिंदू जनतेची होणारी पिळवणूक, महिलांवर होणारे अत्याचार आणि दारुण छळ या सर्वांची स्पष्ट कल्पना समर्थाना यात्रेच्या काळात आली. प्रथम त्यांनी मरगळलेल्या, हतबल झालेल्या समाजात उत्साहाची, शक्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी तरुण युवकांना हाताशी धरून त्याना व्यायामाचे, बलशाली शरीरयष्टीचे महत्व पटवून देवून त्यांच्या मध्ये अन्याया विरुद्ध लढण्याची उमेद निर्माण केली. यासाठी व्यायाम  शाळा, तालिमी, आखाडे तयार करून शक्ती देवता मारुतीची मंदिरे स्थापन केली. जनसामान्यांच्या उद्धारासाठी  त्यांनी अथक परिश्रम केले. यावनी अन्यायपूर्ण  राजवटीपासून जनतेची सुटका होऊन महाराष्ट्रात हिंदवी राज्याची स्थापना व्हावी ही समर्थांची धृढ इच्छा होती. ती शिवाजी राजांनी हिंदवी राज्याची स्थापना करून पूर्ण केली आणि समर्थांचा अनुग्रह प्राप्त केला. या राज्य स्थापने नंतर श्रीसमर्थांनी उदंड झाले पाणी स्नान संध्या करावया असे अत्यंत समाधानाचे उदगार काढले. स्वतंत्र राज्याच्या स्थापनेनंतर श्रीसमर्थांनी  जनसामान्यांच्या उद्धारासाठी श्रीमद दासबोध, आत्माराम, मनाचे श्लोक अश्या भव्य, दिव्य ग्रंथांची रचना केली. श्रीसमर्थ म्हणतात  मुख्य ते हरिकथा निरुपण| दुसरे ते राजकारण | तिसरे ते सावधपण| सर्वाविषयी || (११-६-४)
दासाबोधात विषयांची एव्हढी विविधता आहे की यदिहास्ती तदन्यत्र  यन्नेहास्ती न तक्वचित  अर्थात येथे जे आहे तेच दुसरीकडे सापडेल आणि येथे जे नाही ते अन्यत्र कोठेच सापडणार नाही.
श्रीसमर्थांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट प्रथम त्यांनी स्वतः आचरण करून  नंतरच त्याचा उपदेश केला आहे. आधी केले मग सांगितले हा समर्थांचा दंडकच होता. बलदंड शरीराचा उपदेश करणारे श्रीसमर्थ स्वतः दररोज बाराशे सूर्यनमस्कार घालीत असत आणि  शिष्यांकडून घालवून घेत. श्रीसमर्थांच्या अपूर्व अवतार कार्याचे दर्शन आजही आपणास त्यांच्या दासबोध, आत्माराम, मनाचे श्लोक या अद्वितीय ग्रंथाद्वारे होत आहे. श्रीसमर्थांनी स्वतःच म्हटले आहे
 माझी काया आणि वाणी| गेली म्हणाल अंत:करणी|
परी मी आहे जगजीवनी| निरंतर ||
आत्माराम दासबोध| माझे स्वरूप स्वतः सिद्ध|
असता न करावा खेद| भक्त जनानी||
माझी काया गेली खरे| परी मी आहे जगदाकारे|
ऐका स्वहित उत्तरे| सांगेन ती ||
नका करू खटपट| पहा माझा ग्रंथ नीट|
तेथे सायुज्याची वाट| ठाइ पडे||
रहा देहाच्या विसरे|वर्तो नका वाईट बरे|
तेणे मुक्तीची द्वारे|चोजविती नुम्हासी||
रामी रामदास म्हणे| सदा स्वरूपी अनुसंधान|
करा श्रीरामाचे ध्यान| निरंतर||
प्रती देहातून दिसून येणार्या अहम मी या आत्मीय संवेदनेतून आनंदघन स्वरूपाचे संत दर्शन होणे हे सर्वस्वी दासबोध आणि आत्माराम या ग्रंथावरच अवलंबून आहे, त्यामुळे या दोन रूपातून श्रीसमर्थांचे दर्शन घेणे आणि आपला जन्म सफल करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.
ग्रंथराज दासबोध हा रत्नांनी भरलेल्या सागराप्रमाणे आहे. त्यातील कोणती रत्ने निवडून घ्यावीत हे सामान्य साधकांना कळत नाही. यासाठी आपल्या सदगुरु प.पु. लीलावती शामापंतबाईनी या अथांग सागरातून कांही रत्ने आपल्या भक्त जनासाठी निवडून दिली आहेत. त्या रत्नरूपी समासातील ओव्यांचा सुलभ अनुवाद श्रीमत दासबोध नवनीत या रूपात  संकलित करण्याचा प्रयत्न त्यांच्याच प्रेरणेने आणि आशीर्वादाने केला आहे. हा अनुवाद आम्हा सर्वाना मार्गदर्शक ठरेल असा विश्वास वाटतो. यात जे उत्तम आहे ते सर्व सदगुरुंचे आहे आणि ज्या कांही त्रुटी आहेत त्या या संकलकाच्या आहेत असे मानून  साधकांनी क्षमा कराव्यात

                           || जय,जय रघुवीर समर्थ ||


                         श्रीमत दासबोध नवनीत



शुद्ध ज्ञानाचे निरुपण करताना श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात. शिष्यानो, आता ज्ञानाचे लक्षण ऐका. ज्ञान म्हणजे केवळ आत्मज्ञानच. (अन्य कांही नाही)  आपण स्वतःस पहाणे याचे नांवच ज्ञान. आपल्या सत्य स्वरूपाला जाणणे, अर्थात मी कोण आहे ते ओळखणे हेच ज्ञान आहे. मी देह नाही तर मी सतचीदानंद स्वरूप, अविनाशी असा आत्मा आहे. माझा देह हा बाहेरील आवरण आहे. मुख्य जो ईश्वर त्याला जाणावे. आपल्यामधील खरा मी (म्हणजे आत्मा) त्यास ओळखावे. या विश्वात कायम टिकणारे काय आहे आणि तात्पुरते राहणारे काय ते निश्चित करावे. याला ज्ञान असे म्हणतात. खरा मी आत्मस्वरूप आहे. तोच ब्रह्मरूप असल्याने ईश्वर आहे. हे स्वरूपच कायम टिकणारे आहे. म्हणून एकाच आत्मज्ञानाची ही तीन अभिन्न अंगे आहेत. या संदर्भात तैतरीय उपनिषद म्हणते सत्यम  ज्ञानम अनंत ब्रम्हम तसेच एत्तरीय उपनिषद म्हणते प्रज्ञानं ब्रम्हम. आत्मस्वरूप आणि ज्ञान अभिन्न,एकरूपच आहेत.(२) ज्या अवस्थेमध्ये प्रकृतीचा दृश्य पसारा संपतो पंचभूतांचा डोलारा मावळतो, आणि मी,तू हा दैतवाद संपूर्णपणे नष्ट होतो, या अवस्थेस ज्ञान असे म्हणतात. परमात्म स्वरूपात  अहम अशी स्फूर्ती होण्याच्या अगोदरची  जी अवस्था त्यात दृश्याचा मागमुसही नसतो, त्यामुळे पंच महाभूतांचा पत्ताच नसतो आणि त्यामुळे भेदांचे नांवच नसते. अशी जी दृश्याची निर्मिती होण्या पूर्वीची  स्थिती तिला ज्ञान असे म्हणतात. ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष परमात्म स्वरूपच.(३) जो अनुभव बुद्धी आणि मन याना आकलन होत नाही, जो तर्काने विचारांच्या कक्षेत आणता येत नाही, परा वाणीच्याही जो पलीकडे आहे त्या अनुभवाला ज्ञान असे म्हणतात. मन, बुद्धी आणि वाणी आत्म्याच्या प्रकाशाने सजीव राहतात. त्याच्या सत्तेनेच कार्यक्षम होतात. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती, हा त्यांचा प्रांत असतो. इतकेच नव्हे तर तुर्येच्या पलीकडे  ज्ञान राहते म्हणून परावाणी सुद्धा तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. (४) जेथे दृश्याचे भान संपूर्णपणे नाहीसे होते, जेथे मी जाणतो, मला ज्ञान आहे  ही जाणीव अज्ञान समजले जाते, असे अत्यंत शुद्ध, मलरहित, जे स्वरुपभान त्याला ज्ञान म्हणतात. स्वरुपभानामध्ये माया मावळते म्हणून दृश्याचे भान उरत नाही. ज्ञानाने अज्ञान नष्ट होते आणि पुढे ते ज्ञानसुद्धा स्वरूपात विलीन होते. म्हणून मी जाणतो हे सुद्धा उरत नाही. कोणत्याही भेदाचा, दृश्याचा,विकल्पाचा मळ  नाही म्हणून ते स्वरूप अत्यंत निर्मल आणि शुद्ध आहे.(५) देह बुद्धीच्या तीन अवस्था (जागृती, स्वप्न, आणि सुषुप्ती) याना ओलांडून चौथ्या अवस्थेत प्रवेश केला की आत्मबुद्धी उदय पावते. परंतु ती सुद्धा मावळून केवळ स्वरूप उरते. हे खरे ज्ञान समजावे. तुर्या ही चौथी अवस्था सर्व साक्षिणी असते, म्हणून तिला आत्मज्ञान असे म्हणतात. परंतु या अवस्थेमध्ये साक्षित्वाने पदार्थज्ञान असते, यासाठी ते पूर्ण ज्ञान होऊ शकत नाही. (६) पदार्थ ज्ञान म्हणजे दृश्य पदार्थ जाणणे  दृश्य रहित शुद्ध स्वरूप जाणणे   म्हणजेच आत्मज्ञान (७) ज्या आत्मस्वरूपाचे ठिकाणी स्वरूपा शिवाय कांहीच उरत नाही तेथे सर्व साक्षिपणा असू शकत नाही. म्हणून तुर्येमध्ये होणारे ज्ञान शुद्ध आत्मज्ञान मानू नये. (८) आत्मज्ञानामध्ये संपूर्ण अद्वैत असते, परंतु तुर्या अवस्थेत तर प्रत्यक्ष द्वैत आढळते. यासाठी शुद्ध आत्मज्ञान स्वतंत्र आहे, निराळेच आहे.  मी देहच आहे ही धृढ भावना म्हणजे देहबुद्धी आणि मी आत्माच आहे अशी धृढ भावना म्हणजे आत्मबुद्धी. जागृती, स्वप्न, आणि सुषुप्ती या तीन अवस्था देहबुद्धीच्या तर तुर्या अवस्था आत्मबुद्धीची  देहबुद्धीच्या ज्ञानामध्ये ज्ञाता हा ज्ञेयाहून निराळा असतो. मी म्हणजे ज्ञाता आणि तू म्हणजे ज्ञेय म्हणून तेथे द्वैत आढळते. तुर्येच्या  ज्ञानात ज्ञाता मी आत्माच होतो. या अवस्थेत मी देह आहे हे भान लोपते. परंतु मी आत्मा आहे दृश्य पादार्थांहून निराळा आहे, मी त्याना वेगळेपणाने पहातो, असे भान असते. याला सर्वसाक्षिणी अवस्था म्हणतात. या अवस्थेत मी ज्ञाता आत्माच आहे असा प्रत्यक्ष अनुभव येतो. येथे अज्ञान उरत नाही. परंतु दृष्याला साक्षी  राहून वेगळेपणाने पहाणे शिल्लक राहते. याचाच अर्थ असा की दृश्य ज्ञेयप्रमाणे ज्ञाताहून वेगळे राहते.हेच द्वैत होय. आत्मज्ञानात संपूर्ण अद्वैत असल्याने द्वैत असणारी तुर्या अवस्था शुद्ध आत्मज्ञान नव्हे. श्री समर्थ श्रोत्यांना पुढे सांगतात, जे शुद्ध परमात्वस्वरूप आहे तेच आपण आहोत. असा जो साक्षात अनुभव येतो त्याचे नांव शुद्ध स्वरूप ज्ञान हे श्रोत्यांनी समजून घ्यावे. (१०).उपनिषदातील महावाक्यात आत्मज्ञानाचे संपूर्ण सार साठवलेले आहे. परंतु त्याचा नुसता जप करावयाचा नसतो. त्याचे मनन करून प्रत्यक्ष  अनुभव घ्यावयाचा असतो. महावाक्यांचा नुसता जप केल्याने अज्ञानाचा अंधकार दूर होत नाही.(११,१२) आत्मा हा ब्रह्मस्वरूप किंवा आत्मस्वरूप आहे आणि आपण वास्तविक आत्मस्वरूप आहोत. म्हणून आपण ब्रह्मस्वरूप अथवा परमात्म स्वरूप आहोत. सर्व महावाक्यांचा अर्थ असाच आहे. मी देह नसून आत्माच आहे आणि आत्मा ब्रह्मस्वरूप असल्याने मी ब्रम्हस्वरुपच आहे. असा प्रत्यक्ष अनुभव येणे म्हणजे आत्मज्ञान प्राप्त झाले असे समजावे. हे ज्ञान अतिसूक्ष्म विचाराने  आपल्यामध्ये उदय  पावते आणि त्याच्यामध्ये सारे विरोध मावळतात. या संदर्भात उपनिषदामध्ये तीन ठिकाणी फार सुंदर वर्णन आढळते. त्यांचा अर्थ असा आहे, (अ) ज्याप्रमाणे दिव्याच्या सहायाने मनुष्य वस्तू पहातो, त्याच प्रमाणे योगी, आत्मतत्वाच्या सहायाने अज, धृव, परमश्रेष्ठ आणि कांतिमान ब्रम्ह पहातो. (आ) सर्वोत्तम ब्रम्ह सर्वांचा आत्मा आहे, विश्वाचे मुळ आहे, अतिशय सूक्ष्म आहे आणि नित्य आहे, ते तूच आहेस, तूच आहेस. माझ्यातून सर्व व्यक्त स्थितीस येते. माझ्यामध्येच जगते, आणि अंती माझ्यातच लय पावते. ते अद्वैय ब्रम्ह मीच आहे. या महावाक्यांचा अर्थ पाहिला तर तो असा आहे की आपण परमात्म स्वरूप आहोत. परंतु अर्थ न पहाता नुसता त्याचा जप केल्यास व्यर्थ श्रम मात्र होतात. (१३) महावाक्याचे मनन करून त्यामधील अर्थाचा अनुभव स्वतः घेणे हे ज्ञानाचे मुख्य लक्षण आहे. आपण (म्हणजे मी) ब्रह्मच आहोत हा या महावाक्यांचा खरा, शुद्ध, सूक्ष्म अर्थ आहे (१४) आपले हरविलेले स्वस्वरूप अथवा आत्मस्वरूप प्राप्त होणे, आपला खरा मी जाणणे हे ज्ञान फारच दुर्लभ आहे. कारण ते ज्ञान आरंभापासून शेवटपर्यंत स्वयंभू आत्मस्वरूपच असते. स्वयंभू म्हणजे स्वतःसिद्ध. आत्म्याला जाणणारा आत्म्याशी तादाम्य पावून आत्मज्ञान मिळवितो. म्हणून त्याच्या ज्ञानाचे  प्रमाण त्या ज्ञानामध्येच अंतर्भूत असते, म्हणून आत्मज्ञान स्वतःसिद्ध असते.(१५) एका मुळ स्वरूपातून हे सारे विश्व व्यक्त दशेस येते आणि पुन्हा त्याच स्वरूपात लय पावते. त्या आत्मस्वरूपाचे ज्ञान झाले की अज्ञान नाहीसे होते मग आपण बांधले गेलो आहोत असा अज्ञानातून निर्माण होणारा भ्रम नाहीसा होतो. आपण विश्वापेक्षा सुद्धा विशाल असताना स्थळ, काळाने वेढल्यामुळे जणू कांही वृद्ध आहोत असे वाटते. विश्वच मुळी स्वरूपात लीन झाल्याने आत्मज्ञानी पुरुषास वृद्धपणाची भावनाच उरत नाही. (१६) स्वरूपाचा प्रत्यक्ष अनुभव येईपर्यंत अनेक मते आणि मतांतरे या मध्ये विरोध आढळतो. परंतु आत्मज्ञान झाल्यावर हा सर्व विरोध मावळतो. अतिसूक्ष्म विचार करून पाहिल्यास सर्वांमध्ये ऐक्य सापडते. आत्मस्वरूप अनंत असल्याने ज्याला ज्या अंगाचे दर्शन होते त्याला अनुसरून तो आपले मत मांडतो. आत्मज्ञानी पुरुषाच्या अनुभवामध्ये सर्व अंगे एकत्वाने गोळा होतात. अतिशय सूक्ष्म म्हणजे खोल आणि व्यापक विचार केला पाहिजे. (१७) अज्ञानाचा मळ  नसलेले अगदी शुद्ध आत्मस्वरूप या दृश्य चराचराचे मुळ आहे असा प्रत्यक्ष अनुभव येऊन ज्ञान होते त्यास वेदान्तामध्ये शुद्ध ज्ञान असे म्हणतात. (१८) आपण आपल्या मूळ स्थानाचा म्हणजे स्वरूपाचा शोध केला तर आपण आत्मस्वरुपात  जातो. ते स्वरूप ज्ञानमय  असल्याने तेथे अज्ञान आपोआप नाहीसे होते. म्हणून आत्मज्ञानाला मोक्ष देणारे ब्रम्हज्ञान असे नांव आहे.(१९) आपल्या मधील खरा मी कोण आहे याचा शोध करू जाता आत्मज्ञान होते. आत्मा सर्वव्यापी असल्याने आपण आत्मज्ञानाने  सर्वज्ञ बनतो. आपणास सर्व ज्ञान हस्तगत होते. सर्व ठिकाणी मीच व्यापून आहे असा अनुभव आल्यामुळे देहापुरता मी आहे ही आकुंचित वृत्ती शिल्लक उरत नाही. (२०) मी कोण आहे? हे जाणण्याचा हेतू बाळगून जर आपण शोध घेवू लागलो तर खरा मी देहाच्या पलीकडे आहे असा अनुभव येतो. देहाच्या पलीकडे असलेल्या मी ला पहाता पहाता आपण निश्चितपणे आत्मस्वरूपच होतो.(२१-२६) यानंतर श्री समर्थांनी आत्मज्ञान प्राप्त केलेल्या थोर महापुरुषांची नांवे सांगितली. त्यात महामुनी वशिष्ठ, व्यास, शुक, देवर्षी नारद, वामदेव, वाल्मिकी,अत्री, सनकादिक अशा अनेक ऋषीचा समावेश आहे. (२२) आत्मज्ञान प्राप्त ऋषी, मुनी, देवाधि देव महादेव या ज्ञानाच्या योगाने आनंदाने डोलत असतात. हे जे सर्व शास्त्रांचे सार आहे ते भाग्यानेच प्राप्त होते.(२७)पूर्वी होऊन गेलेले संत, पुढे होणारे संत आणि सध्या असलेले संत-सज्जन यांचे गुह्य असलेले जे आत्मज्ञान ते आता तुम्हास सांगतो. (२८) आत्मज्ञान सर्व ज्ञानाचे शिखर आहे. सदगुरुंच्या कृपेने ते विनासायास प्राप्त होते. सदगुरुंचे वचन हेच आत्मज्ञानाच्या बाबतीत परम श्रेष्ठ प्रमाण आहे. श्रीसमर्थ पुढे सांगतात तीर्थयात्रा, तप, व्रत, दान, पंचाग्नी साधन, गोरांजन या साधनांनी आत्मज्ञान प्राप्त होत नाही. (२९) आत्मज्ञान हेच समस्त परमार्थ साधनांचे खरे फळ आहे. तेच ज्ञानाची परमावधी आहे. आत्मज्ञानानेच संशय वृत्तीचे मूळ संपूर्णपणे नष्ट होते. (३०) या विश्वातील समस्त भाषेतील ग्रंथांचा तसेच वेदांताचा गहन अर्थ एकच आहे आणि तो म्हणजे आत्मज्ञान(३१) पुराणांचा अभ्यास करून आत्मज्ञान प्राप्त होत नाही. ते ज्ञान सांगता,सांगता वेद थकले. असे विलक्षण असणारे आत्मज्ञान आता याक्षणी गुम्हास गुरुकृपेने तुम्हास समजाऊन सांगतो.(३२) श्रीसमर्थ म्हणतात हे श्रोत्यानो, मी संस्कृत  ग्रंथांचे अध्ययन केले नाही. प्राकृत भाषेतील ग्रंथात माझा प्रवेश झालेला नाही. परंतु माझ्या हृदयात सदगुरु स्वामींची कृपामूर्ती मात्र स्थिरपणे राहिलेली आहे. (३३) आता संस्कृत अथवा प्राकृत ग्रंथांची गरज  काय आहे?. माझा स्वामी कृपेचा वर्षाव करीत माझ्या हृदयात वसलेला आहे.(३४) वेदांचा अभ्यास न करीता किंवा श्रवणाचे सायास न घेता  मला अगदी प्रयत्नावाचून गोड सदगुरु कृपा लाभलेली आहे.(३५) मराठी भाषेतील ग्रंथांपेक्षा संस्कृत भाषेतील ग्रंथ श्रेष्ठ आहेत. यांच्या पेक्षा वेदांत ग्रंथ श्रेष्ठ आहेत. (३६) वेदान्तापेक्षा कांहीच श्रेष्ठ नाही कारण वेदांचे सार वेदान्ता मध्ये प्रकट झाले आहे. (३७) वेदांताचा जो तात्पयार्थ आहे आणि जो अत्यंत खोल परमार्थ आहे तो तू  आता ऐक. (३८) अतिखोल आणि अर्थगंभीर असे कांही असेल तर ते सदगुरु वचन आहे. त्या वचनाने निश्चितपणे समाधान  मिळते. (३९) सदगुरु वचन तोच खरा सिद्धांत होय. ते वचन हेच प्रत्यक्ष अनुभविलेले ज्ञान होय.(४०) माझ्या सदगुरु स्वामिचे जे वचन आहे ते अतिशय खोल अर्थाने भरलेले आहे. त्या वचनाने माझे संपूर्ण समाधान झाले. (४१) ते वचन खरोखरी माझ्या जीवनाचे रहस्य आहे, गुपित आहे ते मी तुला अगदी याच क्षणी सांगतो.(४२) शरणागत होऊन शिष्याने श्री समर्थांचे पाय घट्ट धरले आणि तो दिन सुरात म्हणाला गुरुदेवा मी अगदी लक्षपूर्वक ऐकतो. त्यावेळी गुरुदेवांनी सांगण्यास प्रारंभ केला. (४३) अहं ब्रम्हास्मी हे महावाक्य आहे. मी ब्रम्ह आहे असा याचा अर्थ आहे. या अर्थाचे रहस्य तर्काने समजणार नाही. ते मी समजावून सांगतो. त्या अर्थामध्ये गुरु आणि शिष्य दोघे एकरूप होऊन जातात. (४४) शिष्या या महावाक्यातील मर्म ऐक. तू स्वतः ब्रह्मरूप आहेस. या बद्दल यत्किंचितही संशय धरू नकोस. (४५) भक्तीचे नउ प्रकार आहेत त्यापैकी आत्मनिवेदन तो आता संपूर्णपणे निवेदन करतो.(४६)विश्व निर्माण होते त्यावेळी ही पंचमहाभूते क्रमाने निर्माण होतात. परंतु विश्व अशाश्वत आहे कल्पान्ताच्या वेळी ते नाश पावते. त्यावेळी ही पंचमहाभूते ज्या क्रमाने निर्माण झाली त्याच क्रमाने लय पावतात. इतकेच नव्हे तर अखेर उरणारी दोघे प्रकृती आणि पुरुष ती सुद्धा परब्रम्हात विलीन होतात.(४७) अशा रीतीने सर्व दृश्य वस्तू नाश पावल्यावर मी पणाने वावरणारा मी सुद्धा उरत नाही. कारण मुळातच परमात्मा एकरूप असल्याने एकरूप होण्यास निराळे कांही करावे लागत नाही.(४८) सर्व  सृष्टी मुळ  स्वरूपात विलीन झाल्यावर केवळ एक स्वरूप ब्रम्ह तेव्हढे उरते. त्यामध्ये पिंड आणि ब्रम्हांड पहावे म्हटले तरी ते आढळणार नाही. (४९) ज्ञानाचा अग्नी एकदा पेटला म्हणजे दृश्याचा कचरा त्यात जळून  भस्म होतो. ज्ञाता, ज्ञानाशी तदाकार झाल्याने, ज्ञाता स्वतः ज्ञानरूपच झाल्याने वेगळेपणाचे मुळच जळून जाते. लौकिक ज्ञानामध्ये ज्ञाता  ज्ञेयाला जाणत असतो आणि त्याच्याहून वेगळा राहतो. त्यामुळे त्या ज्ञानामध्ये वेगळेपणाचे मुळ कायम राहते. अलौकिक ज्ञानामध्ये ज्ञाता ज्ञेयाशी तदाकार झाल्याने तेथे वेगळेपणा उरतच नाही. शिवाय दोघे गेल्यावर केवळ ज्ञान तेव्हडे शिल्लक राहते. हे ज्ञान  आत्मस्वरूपच असल्याने त्यामध्ये दृष्याला दृष्यपणाने राहणे शक्यच नसते. दृश्य भासणे हे अज्ञानाचा परिणाम असल्याने अज्ञान नष्ट झाले की दृश्य आपोआप अंतर्धान पावते.(५०) आपल्या इन्द्रियाना दिसणारे दृश्य विश्व हे मिथ्या आहे, असे पटले म्हणजे ते जसे दिसते तसे नाही अशी खात्री पटली की  दृश्याकडे धावणारी दृष्टी आपोआप मागे फिरते अशा रीतीने वृत्ती उलटून हृदयातील आत्मस्वरूपाकडे धाव घेवू लागते. आणि त्याला दृश्य असूनही नसल्या सारखे होते. ते असून अनुभवास येत नाही, अशारीतीने वृत्ती अंतर्मुख होऊन स्वस्वरूपापर्यंत पोहोचली की सहजच आत्मनिवेदन होते.(५१) जो शिष्य आपल्या गुरूंशी अनन्य असतो त्याला आत्मनिवेदनाची काळजी करण्याची गरज नसते. अभक्त ज्याप्रमाणे भगवंता पासून वेगळा राहतो. तसा शिष्य सदगुरुंपासून वेगळा राहता कामा नये. शिष्याचे आणि सदगुरुंचे मनोमिलन झाले पाहिजे. शिष्याचे जीवन सदगुरूंनी भरून गेल्यावर आत्मनिवेदनासाठी वेगळे कांही करावे लागत नाही. (५२)असे आत्मनिवेदन एकदम साधत नाही. ते दृढ होऊन अनुभवास येण्यासाठी सदगुरुंचे चरित्र, गुण,महिमा, रूप इत्यादींचे वारंवार चिंतन करावयास हवे. त्यांच्या वचनांची आठवण करून त्याचा अर्थ पुन्हा,पुन्हा मनात घोळवावा. अशा प्रकारे सदगुरु भजन केले तर निश्चितपणे समाधान मिळते. (५३) श्रीसमर्थ पुढे म्हणतात हे शिष्या यालाच आत्मज्ञान असे म्हणतात. याने समाधान मिळते. संसारातील चिंता,भयं बंधने यांचे निरसन होते. (५४) मी देहच आहे असे ज्या माणसाला वाटते, तो आत्मघातकी असतो. त्याला जन्म मरणाच्या चकरा  वारंवार घालाव्या लागतात.(५५) वास्तविक खरा मी आत्मस्वरूपाच आहे. म्हणून मी स्थूल, सूक्ष्म, कारण, आणि महाकारण या चारी देहाहून वेगळा आहे. मी ला जन्म -मरण नाही. कर्मांचा स्पर्श होत नाही. या समस्त दृश्याच्या खिचडीला, अठरा धान्याच्या कडबोळ्यास  मी  आत बाहेर व्यापून आहे.. तो मी म्हणजे आत्मा. तो, हे शिष्या, तूच आहेस. (५६) खर्या ज्ञानदृष्टीने पहिले असता कोणत्याही जीवाला बंधन नाही. मी बांधलेला आहे असे
 अज्ञानाने वाटते. तो भ्रम आहे आणि लोक त्यास भुलले आहेत.(५७)या भ्रमातून सुटण्यासाठी एक उपाय करावा. आपण एकांतात बसावे, स्वस्वरुपात लीन व्हावे, तेथे विसावा घ्यावा, हा अभ्यास करीत गेल्याने परमार्थ स्थिर होतो. आत्मज्ञानाचा उत्कर्ष होतो. (५८) परमार्थाचे अखंड श्रवण, मनन करीत राहिल्यास समाधान मिळते. अज्ञान पूर्णपणे नाहीसे होऊन ब्रम्हज्ञान पूर्णतेस  पोहोचले की अंगात वैराग्य भरून जाते. दृश्याबद्दलची वासना अंत:करणात यत्किंचितही रहात नाही,(५९) कोणत्याही प्रकारचे बंधन न घालता इन्द्रियाना मनसोक्त भोग भोगू दिले तर त्याची वख, वख अधिकच वाढते. म्हणून मोकाटपणे भोग भोगून मनाची तळमळ शांत होत नाही.(६०) इंद्रियांचे भोग समाधान देत नाहीत हे उमजून ज्याचे मन त्यांच्या बद्दल विरक्त  बनते त्यालाच संपूर्ण आत्मज्ञान प्राप्त होते. उदा. एका माणसाने मणी  टाकला त्यावेळी त्याला गेलेले राज्य पुन्हा मिळाले.(६१) इंद्रियांचे भोग दिसण्यास सुंदर दिसतात परंतु त्यांच्या पायी आपण आपले स्वराज्य, स्वानंद साम्राज्य अथवा आत्मज्ञान गमावून बसतो. त्यांचा नाद सोडला तर गमावलेले स्वस्वरूप पुन्हा मिळते. (६२) श्री समर्थ, शिष्यांना  म्हणाले मी तुम्हाला एक निश्चित भविष्य सांगतो. ते लक्ष देवून ऐका. माणसाला ज्या गोष्टीचा ध्यास लागतो तीच त्याला मिळते. (६३) म्हणून आपण अविद्या त्यागावी सदविद्येचा स्वीकार करावा. भगवंताच्या किंवा आत्मस्वरूपाच्या नादि  लागावे. आत्मज्ञान प्राप्त  झाल्यावर आपण जगाला वंद्य होण्यासाठी लागणारी योग्यता येण्यास वेळ लागत नाही. (६४) सन्निपात ज्वर मोठा दोषी असतो. त्यामध्ये रोग्यास भ्रम होतो आणि नंतर कांहीतरी भयंकर दृश्ये दिसू लागतात. परंतु योग्य  उपचार करून त्याचा ताप उतरला की भ्रम नाहीसा होतो आणि तो खरा आनंद भोगतो. (६५) त्याच प्रमाणे अज्ञानरूप सन्निपाताने जीवाला भ्रम होतो आणि त्याला कांही तरीच भलतेच दृश्य दिसू लागतात त्यावर आत्मज्ञानाचे औषध घेतले असता अज्ञान नष्ट  होवून मग आपणास जे दृश्य दिसत होते ते मुलत:च नव्हते असा प्रत्यक्ष अनुभव येतो.(६६) एका झोपलेल्या मनुष्यास भयंकर स्वप्न पडले तो घाबरून ओरडू लागला. परंतु त्यास जागे करताच तो आपोआपच आपल्या निर्भय स्थितीस आला. (६७) त्याला पडलेले स्वप्न हे खोटे होते, परंतु त्याला ते खरे वाटून दुःख झाले. जे खोटे असते त्याचे संपूर्ण निरसन कधीच होत नाही, त्याचा थोडा तरी परिणाम उरतोच.(६८) जो जागा असतो त्याला स्वप्न खोटे असते. जो झोपलेला असतो त्याला ते सर्व बाजूनी वेढून टाकते. परंतु तोच माणूस जागा होताच भीती उरत नाही.(६९) ज्यावेळी अविद्यारूपी झोप जीवाला अगदी झापड घालते त्यावेळी दृश्याची वाईट स्वप्ने पडतात. त्यामुळे तो घाबरतो आणि त्याचे शरीर भयाने कापू लागते. या अविद्यारूपी झोपेतून संपूर्णपणे जाग येण्यास सतत श्रवण आणि मनन करावे. (७०) जागेपण कसे ओळखावे याची खूण श्रीसमर्थ सांगतात जो अगदी मनापासून इंद्रियभोगा विषयी विरक्त असतो त्याला जागा आहे असे ओळखावे. (७१) ज्याला संपूर्ण विरक्ती साधली नाही त्यास साधक असे म्हणतात. विश्वातील आपले मोठेपण सोडून त्याने साधन करीत रहावे.(७२) ज्याला साधन करावेसे वाटत नाही तो सिद्धपणाच्या अभिमानाने बांधला जातो. अशा अहंकारी सिद्धापेक्षा मुमुक्षु केंव्हाही चांगला कारण त्याला ज्ञानाची तळमळ असल्याने तो ज्ञानाचा अधिकारी असतो.(७३) हे ऐकून शिष्याने प्रश्न केला गुरुदेव, बद्ध आणि मुक्त यांची लक्षणे काय? साधक आणि सिद्ध कसे ओळखावे? (७४) सदगुरु म्हणाले या प्रश्नाचे उत्तर पुढील समासात दिले आहे. ते श्रोत्यांनी लक्षपूर्वक ऐकावे.(७५)
         || इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे शुद्ध ज्ञान निरुपण नाम समास सहावा.||

       

                    दशक सहावा समास २रा ब्रम्हपावन निरुपण

सदगुरुंपाशी ब्रम्हविद्या अभ्यासावयाची असते. सदगुरु शिष्यास प्रथम शाश्वत काय आणि अशाश्वत काय याचा निवाडा करण्यास शिकवितात. नंतर शाश्वत जे ब्रम्ह त्याचे अनुसंधान ठेवण्याच्या कलेचा अभ्यास करवून घेतात. साररूप ब्रम्ह सर्व दृश्य सृष्टीला व्यापून राहते, दृश्य सृष्टी पंच महाभूतांपासून बनलेली आहे. तिचे नाम आणि रूप सतत बदलते. परंतु ब्रम्ह मात्र अचल आणि अढळ असते. आपण इंद्रियांच्या कक्षेत वावरतो. त्यामुळे आपणास जे दिसते ते खरे वाटते. परंतु हा अज्ञानातून जन्म पावलेला भ्रम आहे. तो बाजूस सारून सूक्ष्म ब्रम्ह कसे पहावे ही विद्या सदगुरु आपणास शिकवितात. खरे म्हणजे सूक्ष्म, अदृश्य अतींद्रिय आणि अविनाशी सदवस्तू पहाण्याचे सामर्थ्य आपल्या अंगी आणणे हे समस्त परमार्थ साधनांचे वर्म आहे. जी सदवस्तू विश्वात व्यापून आहे तीच आत्मरूपाने आपल्या अंतर्यामी वास करते.आपले शरीर पंचमहाभूतांचे गाठोडे आहे. ते विचाराने बाजूस सारले तर स्वस्वरूप शिल्लक राहते. म्हणून श्रीसमर्थ म्हणतात विवेकाने देहबुद्धीचा बंध
उकलावा आणि स्वरुपासंधान ठेवावे म्हणजे दृश्य आपोआप ओसरू लागेल आणि मोक्ष प्राप्ती होईल. सारांश प्रथम अध्यात्म श्रवण नंतर सदगुरुवचन पालन, मग, सदगुरु चरणी शरणागती आणि अंती त्यांच्या कृपेने स्वरुपानुभव, असा हा परमार्थ साधनाचा मार्ग आहे. या मार्गाने जाऊन आत्मसाक्षात्कार झाल्यावर देह प्रारब्धावर टाकावा आणि स्वानंदात रहावे. श्रीसमर्थ पुढे म्हणतात शिष्यानो, जो उपदेश आचरणात आणला  असता सायुज्यमुक्तीची   प्राप्ती होते त्याची लक्षणे ऐकावीत. या बाबतीत अनेक मत-मतांतरे आहेत
त्यांचे ज्ञान मुळीच उपयोगी पडत नाही.(१) धान्य काढून घेतलेले भुस जसे खाता येत नाही, तसे ज्या उपदेशात ब्रम्हज्ञान नाही ते अर्थहीन आहे असे समजावे. (२)  रसरहित कडबा कुटावा, अथवा लोणी काढून घेतलेले ताक घुसळावे, किंवा तांदुळाचे धुवण प्यावे. (३) किंवा फळांच्या सालीच खाव्यात, किंवा रसहीन  चोईट्या चोखाव्या, किंवा खोबरे टाकून नरोट्या  खाव्या हे जसे  व्यर्थ श्रम होतात (४)त्याच प्रमाणे ज्यात ब्रम्हज्ञान नाही तो उपदेश विनाकारण श्रम असतात. शहाणा माणूस सार सोडून असाराचे सेवन करीत नाही. (५)आता गुणातीत असणारे जे ब्रम्ह त्याचे वर्णन सांगतो. श्रोत्यांनी आपले अंत:करण  ऐकण्यास तत्पर करावे.(६)  हे संपूर्ण विश्व पंच महाभूतांपासून बनलेले आहे. परंतु ते कायम टिकणारे नाही. पृथ्वी, आप, तेज, वायू, आणि आकाश ही पंच महाभूते आहेत. सारखा बदल होत राहणे हा विश्वाचा मुळ  स्वभाव आहे. (७) हे विश्व निर्माण होण्याच्या पूर्वी आणि ते निर्माण झाल्यावर गुणातीत ब्रम्ह जसेच्या तसे राहते. हीच खरी शाश्वतपणाची खुण आहे. पंच महाभूतांपासून निर्माण झालेले जे इतर कांही आहे  ते नाशवंत समजावे. विश्व आले आणि गेले तरी जिच्यामध्ये किंचितही फरक होत नाही तीच सदवस्तू होय. गुणातीत ब्रम्ह तेच आहे. (८) नुसत्या साध्या मानवी दृष्टीने  जरी विश्वाकडे पाहिले तरी ते भूत आहे असे आढळते. भूत शब्दास दोन अर्थ आहेत. भूत म्हणजे झालेले आणि दुसरा अर्थ भूत म्हणजे पिशाच्च. पहिल्या अर्थानुसार जे झालेले आहे ते बदलते, म्हणून त्यास देव म्हणता येत नाही. दुसर्या अर्थाप्रमाणे जे पिशाच्च आहे त्याला देव म्हणता येत नाही. भूत या नांवाने कोणास हाक मारल्यास त्यास वाईट वाटते. (९) मग जो एव्हढा थोर आहे की ज्याचा महिमा ब्रम्हादिकाना सुद्धा कळत नाही आणि जो एव्हढे विश्व निर्माण करतो त्या परमात्म्यास भूत म्हणणे अगदीच अयोग्य आहे. (१०) या जगाचा नियंता पंच महाभूतांसारखा आहे असे म्हणणे फारच सदोष आहे. आत्मज्ञानी महापुरुष हे सर्व बरोबर जाणतात.(११) मुळ शुद्ध, निर्मळ आणि गुणातीत परब्रह्माला या विश्वाचा पत्ताही नसतो. परंतु  सच्चीदानंद हा त्या परब्रहाचा स्वभाव आहे त्यातील आनंदाला जे स्फुरण असते त्यास माया म्हणतात. मायेमुळे परमात्मा ईश्वरस्वरूपाने मनुष्याच्या आटोक्यात येतो. मायेमध्ये अनेक शक्ती वास करतात. त्या पैकी प्रकृती ही एक शक्ती आहे. ती हे दृश्य विश्व निर्माण करते. ती स्वतः अव्यक्त असून सर्व व्य्क्तांचे मुळ आहे. तिच्यामध्ये आठ अंगे वास करतात. सत्व,रज, आणि तम हे हे तीन गुण आणि पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंच महाभूते मिळून अष्टधा प्रकृती बनते. प्रकृती सर्वविश्वव्यापी असल्याने व्यक्त अवस्थेस येताना तो सर्वव्यापिपणा सामान्य रुपाने कायम ठेवते. म्हणून जगातील यच्चावत वस्तुना दोन अंगे असतात, एक सामान्य अंग आणि दुसरे विशेषांचे  अंग. विशेषाला व्यक्ती किंवा रूप असे म्हणतात. तर सामान्याला जाती किंवा नाम असे म्हणतात. सामान्य अव्यक्त असते परंतु बुद्धीला आकलन होते. अव्यक्तामधून व्यक्त रूप धारण करते. कांही काल येथे वावरते पुन्हा अव्यक्तात नाहीसे होते. प्रकृतीच्या या खेळास दृश्य असे नांव आहे. हे अंतिम सत्य नाही. म्हणून प्र्त्यक्ष दिसत असले तरी भ्रमरूपच आहे.ते बाजूस सारून परमात्मा स्वरूपाचा अनुभव घ्यावा लागतो. पृथ्वी, आप, तेज, वायू, आणि आकाश याना परमात्मा आत बाहेर व्यापून आहे. पंच महाभूतांचा नाश होतो परंतु परमात्मा मात्र अविनाशिपणाने  तसाच राहतो. (१२)जे जे रूप आणि नाम आहे ते, ते  सर्व भ्रमरूप आहे. नामरूपांच्या पलीकडे असणारे जे परमात्मस्वरूप रहस्य आहे ते स्वानुभवाने ओळखावे (१३) पंच महाभूते आणि तीन गुण मिळून अशा आठ प्रकारांनी प्रकृती व्यक्त होते. या अष्टधा प्रकृतीला दृश्य असे दुसरे नांव आहे. (१४) वेद आणि श्रुती असे सांगतात की हे दृश्य नाशवंत आहे. निर्गुण ब्रम्ह तेव्हढे शाश्वत आहे. (१५) ते ब्रम्ह शस्त्राने तोडता येत नाही, विस्तावाने जळत नाही, पाण्यात काल्विले जात नाही.(१६) ते गतिमान वायुने  उडत नाही, ते पडत नाही, झडत नाही, ते घडविता येत नाही आणि ते छपत नाही.(१७) त्याला कोणताही रंग नाही, ते सर्व पदार्थापेक्षा वेगळेच आहे. ते सदा सर्वकाळ असते.ते निरंतर टिकते.(१८) ब्रम्ह दिसत नसले तरी ते सर्वत्र  भरून राहिले आहे. ते सूक्ष्म पणाने  प्रत्येक ठिकाणी व्यापालेले आहे. (१९) आपल्या दृष्टीला अशी सवय झालेली असते की जे दिसेल ते पहावे आणि खरे मानावे.परंतु जे रहस्य असते ते नेहमी गुप्त असते हे समजून घ्यावे.(२०) जे इन्द्रियाना दिसणारे आणि उघड असते ते असार असते मिथ्या असते. जे गुप्त असते, सूक्ष्म असते, ते सार असते, सत्य असते. गुरुदेवाकडून प्रत्यक्ष ऐकलेल्या उपदेशाने हे विवेचन बरोबर कळू लागते. (२१) जे बुद्धीला उकलत नाही ते उकलुन घ्यावे, जे इन्द्रियाना  दिसत नाही ते पहावे, जे कळत नाही ते विवेकाच्या जोरावर समजून घ्यावे. (२२) साधना करून सूक्ष्म ब्रम्ह पहाण्याचे, अनुभवण्याचे सामर्थ्य अंगी आणावे. त्यासाठी देहाचे कष्ट लागत नाहीत. मनाचे कष्ट मात्र लागतात. जे गुप्त आहे ते स्वतःच प्रकट करून घ्यावे, जे असाध्य आहे, कष्ट साध्य आहे ते आत्मस्वरूप साध्य करून घ्यावे, जे अवघड आहे त्याचा चिकाटीने सतत अभ्यास करावा.(२३) वेद,ब्रम्हदेव आणि भगवान शेष ज्या ब्रम्हाचे वर्णन करीता,करीता थकून गेले, अगदी पराभूत झाले ते परब्रम्ह आपण विशेष प्रयत्न करून साधावे. आपण त्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा. (२४) ते परब्रम्ह कसे अनुभवावे असे विचाराल तर त्याचे स्वाभाविक साधन सांगतो. अध्यात्म श्रवणाने ते परब्रम्ह प्राप्त करून घ्यावे. (२५) ते पृथ्वी नव्हे, की, आप नव्हे, की,  तेज नव्हे, की. वायू नव्हे, की कोणत्या एका रंगाचे नाही. ते व्यक्त नाही, इन्द्रियाना दिसणारे नाही,ते अव्यक्त आहे, अतींद्रिय आहे (२६)जे व्यक्त आहे त्यास देव म्हणावे असा वर, वर  पहात असलेल्या  अज्ञानी  लोकांचा स्वभाव असतो. म्हणून सामान्य जनतेला जितकी गांवे, तितुके देव असतात. (२७) अशा प्रकारे खरा देव कोणता हे निश्चितपणे कळले पाहिजे. देव निर्गुण आहे असा प्रत्य्क्ष अनुभव आला म्हणजे मग आपण आपल्या अंतर्यामी शोध करावा. (२८)माझे शरीर असे आपण म्हणतो, याचा खरा अर्थ मी देहाहून वेगळाच आहे. माझे मन अशी जाणीव आपल्याला असते. याचा अर्थ मी मनही नाही. (२९)  आपल्या देहाचा विचार केला तर तो पंच महाभूतापासून बनलेला आहे.एका भूतामध्ये दुसरे भूत विलीन करीत गेल्यास सर्व भुते नाहीशी होऊन शेवटी सार रूप अविनाशी आत्मा तेव्हढा उरतो. (३०) देहबुद्धीचा मी कोठे राहतो याचा शोध केल्यास त्याला स्थानच नाही असे दिसून येते. मग त्याला पहाण्याचे कारणच उरत नाही. ज्या पंच महाभूतांचा देह बनला आहे ती भुते आपापल्या ठिकाणी विभागून नष्ट होतात. (३१) आपले शरीर म्हणजे पंच महाभूते एकत्र बांधून तयार केलेले एक गाठोडे आहे. जर कोणी विचारांच्या साधनांनी ते सोडू लागला तर ते गाठोडे न सापडता विलीन होऊन जाते आणि मी पणाने वावरणारे आपण उरत नाही. केवळ निरंतर टिकणारा आत्मा तेव्हढा उरतो.(३२.३३) जेथे मी पणाला जागाच उरत नाही तेथे जन्म कोणाचा आणि मृत्यू कोणाचा? खरे पाहिले असता परमात्म वस्तूला पाप,पुण्याचा स्पर्श होत नाही. (३४) पाप,पुण्य आणि यम यातना यांचा निर्गुणाशी कांहीच संबंध नसतो. आपला खरा मी निर्गुण आहे त्यामुळे त्याच्या ठिकाणी जन्म-मरणास स्थानच नाही. (३५) मी देहच आहे ही धृढ भावना आपल्या बंधनास कारण होते. विवेकाने ती उकलावी”” मी निर्गुण आत्मा आहे, असे विवेकाने ध्यानात आल्यानंतर त्याचे अखंड अनुसंधान ठेवावे, त्यातून स्वस्वरूपानुभव उदय पावतो. आत्मज्ञान प्राप्त करून आत्मस्वरूप  झाल्यावर देह प्रारब्धावर सोडून आनंदात रहावे. अशा रीतीने देव आणि भक्त यांचे ऐक्य घडून येते. मी देहाच आहे या भावनेने जीव बांधलेला असतो. विवेक केल्याने त्या बंधनातून तो मोकळा होतो. देहबुद्धी सोडून तो देहाच्या पलीकडे गेला म्हणजे मोक्षपदास जावून पोहोचतो. (३६)निर्गुण आत्माच हा खरा मी आहे असा साक्षात अनुभव येणे म्हणजेच जीवनाचे सार्थक होय. हा अनुभव येण्यास पुन्हा,पुन्हा विवेक करावा लागतो. (३७)झोपेतून जागे झाल्यानंतर स्वप्न जसे आपोआप विरते, तसे सारखा विवेक केल्यामुळे दृश्य ओसरू लागते. संधानाच्या मागे.मागे राहणे याचे नांव अनुसंधान. स्वस्वरूप अथवा आत्मस्वरूप हे आपले संधान आहे. त्याच्या मागे राहणे म्हणजे त्याचे सतत चिंतन करीत राहणे. सतत केलेल्या चिंतनाने मन तदाकार होते. अखेर मी आत्मस्वरूप आहे असा साक्षात्कार होतो. (३८) आपण स्वतःला स्वस्वरुपात लीन करावे. विवेकाच्या अभ्यासाने आपण स्वस्वरूपाहून वेगळे राहूच नये. स्वस्वरुपात लीन होण्याच्या अवस्थेस आत्मनिवेदन असे म्हणतात. (३९) स्वस्वरुपाच्या अनुसंधानाने  जीव  तरतो. प्रथम अध्यात्म श्रवण करावे, मग सदगुरुंच्या चरणांची सेवा करावी, पुढे सदगुरुंच्या कृपाप्रसादाने आत्मनिवेदन साधावे. (४०) आत्मनिवेदन झाल्यावर केवळ शाश्वत आत्मावस्तू तेव्हडी उरते. मी आणि आत्मा एकच आहोत असे ज्ञान होते. श्रवण, मनन, निदिध्यास, आणि साक्षात्कार ही चार मार्गांची  उपनिषद सिद्ध परमार्थ साधनाच श्रीसमर्थांनी निराळ्या शब्दात येथे सांगितली आहे.(४१)  त्या आत्मज्ञानाने जीव ब्रह्मरूप होतो. त्याची संसारातील समस्त दुःखे नाहीशी होतात. नंतर देह प्रारब्धावर सोडून तो मनाने स्वस्थ राहतो. ज्ञानी माणसाची काय किंवा अज्ञानी व्यक्तीची काय जीवन यात्रा प्रारब्धगतीनेच चालते. आत्मज्ञानी पुरुषास ते कळते आणिअज्ञानी पुरुषास ते समजत नाही. म्हणून ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर ज्ञानी पुरुष आपला देह प्रारब्धाच्या स्वाधीन करतो. (४२) सारांश याला आत्मज्ञान असे म्हणतात. याने समाधान मिळते. जीव परब्रह्मामध्ये  विलीन होऊन एकरूप होतो.तो खरा भक्त बनतो. (४३) श्रीसमर्थ पुढे सांगतात आता जे व्हावयाचे असेल ते होऊ दे, जे जावयाचे असेल ते जाऊ दे, अशी मनाची निर्भय आणि निश्चिंत अवस्था होते.जन्म, मरणाचे भयच मुळी मनातून नाहीसे होते.(४४) संतांच्या संगतीचा लाभ झाला की मुख्य देवाची ओळख होते. ती झाली की देव आणि भक्त एकरूप होतात. त्यांच्या संसारातील हिसका-हिसकी  विराम पावते. (४५)
           ||  इति  श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे ब्रम्हपावन नाम समास दुसरा ||


                    दशक सहावा समास तीसरा मायोदभव निरुपण
परमात्मस्वरूप अत्यंत व्यापक, सूक्ष्म, आणि शाश्वत आहे. दृश्य विश्व एकदेसी, मर्यादित,स्थूल आणि अशाश्वत आहे. तरीपण ते सर्व दृश्य परमात्मस्वरूपातच उत्पन्न झालेले आहे. त्यामध्येच ते तगते आणि आणि त्यातच विलीन होऊन जाते. माया नावाची परमात्मस्वरुपाची शक्ती, दृश्याचा हा सगळा खेळ घडवून आणते. परमात्मा  निव्वळ चैतन्यमय आहे, तर दृश्य विश्व पंच महाभुतांनी  भरलेले आहे. परमात्मा केवल, निर्गुण आहे. विश्व मात्र सगुण आणि निर्गुणाचे सुंदर मिश्रण आहे. आपला देह पंच महाभूतांनी बनलेला आहे, कारण तो विश्वाचा एक भाग आहे. विवेकाने देहाचा शोध घेतला तर तो तत्वांचे गाठोडे आहे असे प्रत्ययास येते. मग देहबुद्धी नाहीशी होऊन शुद्ध आत्मस्वरूप उरते. तेच  आत्मस्वरूप मी आहे असा अनुभव आला की आत्मज्ञान होते आणि त्याने समाधान लाभते. श्रीसमर्थ प्रथम ब्रह्मस्वरूप कसे आहे ते सांगतात. ते सांगताना नाहीपणाची पद्धत अवलंबावी लागते. याचे कारण असे की आपल्या आजच्या अवस्थेत दृश्याचे गुणधर्म आपणास माहीत आहेत. दृश्य आपले ज्ञात आहे परंतु परमात्मस्वरूप
अज्ञात आहे. ज्ञातावरून  अज्ञाताकडे जावे लागते. म्हणून दृश्याचे गुणधर्म परमात्म्याच्या ठिकाणी नाहीत, असे नकारात्मक वर्णन करावे लागते. गुणमय प्रकृतीच्या पलीकडे असलेला आत्मा अत्यंत निर्मळ आहे. आकाशाची पोकळी ज्याप्रमाणे सदोदित भरीव,
मल रहित,  आणि चलन रहित असते तसे आत्मस्वरूप सदा-सर्वकाळ घनदाट, निर्मळ, निश्चल असते (१) ते अखंड आहे, कारण त्याचे भाग करता येत नाहीत. विश्वामध्ये जे,जे विशाल आहे त्याहून ते अतिविशाल आहे. ते आकाशाहून सुद्धा विशाल,व्यापक आणि अधिक सूक्ष्म आहे. (२) इन्द्रियाना ते दिसत नाही, मनाला ते भासत नाही, ते कोठे जात नाही अथवा येत नाही. ते परब्रम्ह असे आहे (३) चळणे, ढळणे म्हणजे बदल होणे., हे दृश्याचे गुण त्याच्यात नाहीत. अर्थात ते चळत नाही,  ढळत नाही. ते तुटत नाही, कि फुटत नाही,त्याच्या मध्ये विभाग नाहीत. त्यामुळे त्याची रचना करता येत नाही. ते अक्षय असल्याने त्याचा नाश होत नाही. ते परब्रम्ह आहे. (४) ते सगळीकडे असल्याने सर्वकाळ समोरच असते. ते अत्यंत निर्दोष आणि अगदी निव्वळ आहे. ते आकाश पाताळ व्यापून असल्याने सर्वांच्या अंतर्यामी निवास करते. (५) कधीहि नाश नसलेले ते ब्रम्ह निर्गुण आहे. जे नाश पावते ती माया आहे. ती सगुण असते. मायेमध्ये सगुण आणि निर्गुण यांचे मिश्रण असते. (६) या सगुण निर्गुणाच्या मिश्रणा बरोबर विचार करण्याची रीत थोर पुरुष जाणतात. राजहंस ज्याप्रमाणे दुधात मिसळलेले पाणी वेगळे करून शुद्ध दुधाचे सेवन करून पाण्याचा त्याग करतो त्याप्रमाणे, ज्ञानी पुरुष मायेतील सगुण निर्गुणाच्या मिश्रणातून सगुण बाजूस काढून निर्गुण तेव्हढे सेवन करतात.(७) पंच महाभूतांपासून जे,जे निर्माण होते ते,ते मिश्रित आणि जड असते. व्यापक आत्मा त्यामध्ये अंतर्यामीपणाने असतो. शाश्वत काय आणि अशाश्वत काय याचा विवेक केल्याने ते समजते (८) उस खाताना त्याचा रस घेऊन चोईट्या टाकून द्यावयाच्या असतात. विश्व हे उस आहे अशी कल्पना केली तर, परमात्मा हा त्यातील रस आहे असे समजावे. साधकाने विवेक करावा आणि विश्वातील विश्वात्मा ओळखावा आणि बाकीचे दृश्य चोईट्याप्रमाणे टाकून द्यावे. (९)  आत्मा रस आहे अशी कल्पना केली खरी परंतु ती अगदी अपूर्ण आहे. कारण रस पातळ, नाशिवंत असतो, तर आत्मा निश्चळ आणि शाश्वत आहे. शिवाय रस अपूर्ण असतो तर आत्मा सर्व दृष्टीने परिपूर्ण आहे हे ओळखावे. (१०)  या दृश्यामध्ये अदृष्यासारखी एखादी वस्तू असती तर तिच्यावरून आत्मा कसा आहे ते बरोबर सांगता आले असते. परंतु या विश्वात तशी वस्तू नाही. म्हणून दृश्याच्या निमित्ताने आत्मा कसा आहे हे कसे तरी समजून घ्यावे.(११) अशा रीतीने निव्वळ आत्मस्वरूप सगळीकडे भरून राहिले असता त्या मध्ये माया कशी उत्पन्न झाली असा प्रश्न पडतो. त्याचे उत्तर असे की आकाशात वायूची झुळूक उठावी तशी शुद्ध आत्मस्थिती मध्ये स्फुरण रुपाने माया उत्पन्न झाली. (१२) वायू पासून अग्नी झाला, अग्नीपासून पाणी झाले, पाण्यापासून पृथ्वीने आकार घेतला.(१३) पृथ्वी पासून जीव सृष्टी निर्माण झाली. जीव किती झाले याची गणना करता येत नाही. परंतु सर्वांच्या आरंभी आणि अंती ब्रम्ह मात्र व्यापून राहिले आहे. (१४) जे,जे कांही उत्पन्न होते ते,ते सगळे नाश पावते. परंतु विश्वाच्या मुळाशी असलेले ब्रम्ह सर्वाना व्यापून असल्याने जसेच्या तसे राहते. (१५) समजा कुंभाराने एक घडा तयार केला. तो घडा तयार होण्या पूर्वी आकाश असतेच. घट तयार झाल्यावर त्याच्या पोटातील पोकळीत ते असतेच. परंतु घट फुटल्यावर सुद्धा मुळचे  आकाश नाश पावत नाही ते जसेच्या तसेच राहते.(१६) त्याच प्रमाणे निव्वळ एकच एक असलेले परब्रम्ह जसेच्या तसे राहते. त्याच्यामध्ये एव्हढे चराचर विश्व उत्पन्न होते आणि नाश पावते. तरी ते ब्रम्ह अगदी निश्चळ आणि स्थिर असते. (१७)  जे, जे कांही निर्माण होते ते पूर्वीपासून ब्रम्हाने व्यापलेले असते आणि उत्पन्न झालेले सर्व नाश पावल्यावर शाश्वत ब्रम्ह पुन्हा जसेच्या तसे शिल्लक राहते (१८) असे कधीही नाश न पावणारे ब्रम्ह आहे. त्याचा ज्ञाते पुरुष आश्रय करतात. दृश्याचा पूर्ण निरास झाला की मग आपल्या खरे असलेल्या  मी चा लाभ आपणास होतो.(१९) देहबुद्धीच्या नादाने आपण देहाला भलतेच महत्व देतो. विवेकाने देहाकडे पाहिले तर पंच महाभूतांचे निरसन होऊन देह अहंता आपोआप विरते. ती विरली की खरा मी अनुभवास येतो आणि निर्गुण ब्रह्माशी असलेले आपले मुळचे ऐक्य अनुभवास येते. या अनुभवामध्ये सोहंभाव उदय  पावतो आणि देवा-भक्ताचे ऐक्य होते. तत्वाला तत्व मिसळून जो आकार होतो त्याला देह असे म्हणतात. जाणते, विचारी पुरुष एका तत्वाचा आधार घेतात आणि त्यातून इतर तत्वे शोधून काढतात.(२०) विनाशी तत्वे एकदा का सगळी विरली की देहच मी आहे ही भावना सुद्धा पार विरून जाते. अशा रीतीने निर्गुण ब्रह्माशी केवळ विवेकाने जीवाला ऐक्य प्राप्त होते. (२१) विवेकाने जर देहाचा शोध घेतला तर एका विनाशी तत्वाने दुसरे विनाशी तत्व मावळते आणि देहबुद्धीचा मी मुळीच नाही असा प्रत्यक्ष अनुभव येतो.(२२)  आपण आपला शोध घेवू लागलो तर आपण अगदी भ्रमात्मक आहोत किंवा मिथ्या आहोत हे समजते. अशा रीतीने तत्वांचा निरास झाला की अखेर शुद्ध आणि निर्गुण ब्रम्ह तेव्हढे उरते.(२३) देहअहंता किंवा मिथ्या मी विराम पावून जे उरते ते निर्गुण ब्रम्ह होय. हेच आत्मसमर्पणाचे खरे रहस्य समजावे. कारण विनाशी तत्वे विरली की मी, तू पणाचा द्वैतभाव सुद्धा नाहीसा होतो.(२४)  मी म्हणून वावरत असलेल्या अहंकाराचा शोध केला तर तो सापडत नाही. निर्गुण ब्रम्ह जसेच्या तसे राहते. आपण अगदी तेच आहोत परंतु सदगुरुंच्या मार्गदर्शनाशिवाय हे कळत नाही (२५) या सगळ्या विश्वामध्ये तत्व कोणते आणि भ्रम कोणता किंवा   अस्सल   कोणते आणि नक्कल कोणती याचा शोध घेतला म्हणजे, जे भ्रमरूप आणि नकली असते ते नाहीसे होते, नंतर अस्सल  तत्व जे निर्गुण ब्रम्ह तेव्हढे  शिल्लक राहते.(२६) आरंभी ज्या ब्रम्हाचे वर्णन सांगितले तेच सगळ्या विश्वाला व्यापून आहे. संपूर्ण विश्व नष्ट झाले तरी जे शिल्लक उरते ते निव्वळ ब्रम्ह होय,(२७) विवेकाने जगाचा शोध करू लागले म्हणजे दृश्याचा निरास होतो. त्यामधून टिकणारे कोणते आणि तात्पुरते कोणते याचा निवाडा होतो मग आपण खरे कोण याचा बोध आपल्या ठिकाणी आपल्याला होतो. (२८) आपल्याच कल्पनेने आपण आपला मी पणा निर्माण केलेला असतो. विवेकाने त्याचा शोध केला तर तो उरत नाही. हा काल्पनिक मी पणा गेला की शुद्ध मी उरतो. तेच निर्गुण आत्मस्वरूप होय.(२९) विनाशी तत्वे विवेकाने नाहीशी केली की निर्गुण आत्मा तोच मी आहे असा साक्षात्कार होतो. विनाशी तत्वे ओसरल्या नंतर देहाचा मी पणा वेगळेपणाने दाखविता येत नाही.(३०) तत्वे आणि मीपणा दोन्ही विनाशी आणि दृश्य असल्याने तत्वांचा निरास झाला की मी पणा त्याबरोबरच जातो. मग निर्गुण आत्मा तेव्हढा शिल्लक उरतो. त्या ठिकाणी सोहम म्हणजे मी तोच आहे असा आत्मनिवेदनाचा साक्षात अनुभव येतो.(३१) हे आत्मनिवेदन घडले म्हणजे देव आणि भक्त एकरूप होऊन जातात. खरोखरच वेगळेपणा बाजूस सारून भक्त देवाशी एकरूप बनतो.(३२) निर्गुण स्वरूपाला जन्म-मरण नाही, पाप-पुण्या नाही, जो निर्गुणाशी समरस होतो, तो मुक्त होतो.(३३) जीव विनाशी तत्वांनी वेढलेला  असतो. त्यामुळे तो संशयाच्या चक्रात अडकतो. मग स्वतःचे  स्वस्वरूप विसरतो आणि कोहम मी कोण आहे असे विचारतो. विवेकाने शोध घेवून तत्वांचे निरसन झाले की मी तोच आहे असा जीवाला अनुभव येतो. अखेर आत्मस्वरुपाशी एकरूप होऊन मी आणि तू हा भेद उडाला की अहं सोहम या भूमिका उरत नाहीत.(३५) अशा रीतीने सर्व अवस्थांच्या पलीकडे जे निव्वळ स्वरूपात असतात, ते संत बनून राहतात. ते जरी देहामध्ये दिसत असले तरी ते देहाच्या पलीकडे राहणारे आहेत असे आपण जाणले पाहिजे.(३६) साधकांची संशयी वृत्ती एकदम नाहीशी होत नाही म्हणून वारंवार ते सांगावे लागते. हा विषय सांगण्याच्या प्रसंगाने मला असे करावे लागले. या बद्दल श्रोत्यांनी क्षमा करावी. (३७)
           || इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे मायोद्भव नाम समास तिसरा ||


                  दशक सहावा- समास पहिला देवशोधन नाम
श्रीसमर्थ संपूर्णपणे अद्वैतवादि तत्वज्ञानी होते. त्यांचे वारंवार सांगणे असे की आपल्या देहासकट हे सारे दृश्य विश्व सतत बदलत असते. म्हणून ते सर्वस्वी खरे नाही.त्याच्या मागे कधी न पालटणारी  आणि सर्वस्वी खरी अशी एक सदवस्तू असते. ती स्वतः अचल असून सर्व विश्वाला आधार देते. ती ज्ञानमय आणि आनंदमय आहे. म्हणून तिचा साक्षात्कार झाला की संपूर्ण समाधान मिळते. मायाही सदवस्तूची एक विलक्षण मोठी शक्ती आहे. तिच्यामुळे  दृश्याचा हा देखावा दिसतो. अज्ञानामुळे जीव त्यात गुरफटतो. स्वरुपत: मिथ्या असलेले दृष्य इन्द्रियाना प्रत्यक्ष दिसते परंतु ते सर्वस्वी खरे वाटणे हे
अज्ञानाचे लक्षण आहे. स्वस्वरूपाच्या आड येत असलेल्या  दृश्याचे जंजाळ दूर करण्यास जीवाचे अज्ञान दूर करण्या शिवाय अन्य मार्ग नाही. विवेकाने दृश्याचा शोध घेऊ लागले म्हणजे दृश्य हे विनाशी तत्वांचा तात्पुरता डोलारा आहे हे पटते मग सहजच जीव देहाच्या अहंकारास बाजूस सारतो आणि उरलेल्या निर्गुण आत्मरुपाशी समरस होतो. या अनुभवास आत्मज्ञान म्हणतात. जो पर्यंत मी देह आहे अशी भावना असते तोपर्यंत दृश्य खरे वाटते. म्हणून आत्मानात्म आणि सगुणोपासना या दोन चाकावर जर साधनेचा रथ चालविला तर अनात्म दृश्याचे निरसन होत जाते, अज्ञानाचे झाकण पातळ होत जाऊन अंती आत्मदर्शन घडते.म्हणून जागोजागी श्रीसमर्थ विवेक आणि उपासना यांच्यावर भर देतात. बुद्धीने विवेक करावा आणि श्रद्धेने उपासना करून स्वस्वरूपाशी तन्मय होऊन जावे. अशी श्रीसमर्थांची शिकवण आहे. आत्मज्ञानी सिद्ध पुरुष हा समर्थांचा उत्तम पुरुष होय.  देवाच्या ज्ञानाने त्यास अत्यंत समाधान लाभते.आत्मरूप हाच खरा देव त्याचा शोध घेवून प्रत्यक्ष पहाणे हे मनुष्याचे प्रथम कर्तव्य आहे. तो शोध कसा करावा हे शिकण्यासाठी आत्मज्ञानी पुरुषाचा अनुग्रह घ्यावा.ज्याचा आपण अनुग्रह घेतो त्याना आपण आपले सदगुरुपद देतो.ते आपल्याला शिष्य या नात्याने स्वीकारतात. स्वस्वरूपाचा मार्ग अंतरीचा आणि सूक्ष्म आहे. तेथे  स्वानुभवीच मार्गदर्शक हवा. सदगुरु आपले सदैव मार्गदर्शन करतात. आपल्या पाठीशी उभे असतात. अनुग्रह म्हणजे एक प्रकारचा शक्तिपातच असतो. अनुग्रहित शिष्य कोठेही असला तरी सदगुरुकडून निघालेला कृपाशक्तीचा सूक्ष्म प्रवाह त्याच्यापर्यंत पोचतो. त्याच्या भोवती रक्षण वलय करून साधनामध्ये त्यास सतत मदत करतो. सामान्य जीव अल्प असून त्याची शक्ती आणि साधना अल्पच असते. केवळ स्वप्रयत्नानी सुक्ष्मत्वाच्या वरच्या पातळीवर आणणे जीवाला अवघड असते.तेथे ब्रम्हज्ञानी सदगुरु आपली शक्ती साधकाला  देतात आणि त्यास वर उचलतात. दृश्याच्या कक्षेतुन सुक्ष्माच्या साम्राज्यात नेतात. त्यामुळे जीवाचा अहंकार कमी होतो आणि साधना त्वरित फलद्रूप होते.
श्रीसमर्थ म्हणतात प्रथम मन एकाग्र करावे.  या समासात जे सांगितले आहे ते अगदी हृदयात ठेवावे, बोलणे सावध होऊन ऐकावे.(१) ज्या गावात आपणास वास्तव्य करावयाचे तेथील राजा, अधिकारी याना भेटून ओळख करून घ्यावी, म्हणजे इतर लोक त्रास देत नाहीत.(२,३,४) याच प्रमाणे ब्रम्हांडनायकाची भेट घेतल्या वाचून जीवन सुखी होणे शक्यच नाही. श्रीसमर्थ म्हणतात गावात ग्रामाधिपती वरिष्ठ असतो, त्याच्याहून देशाधिपती वरिष्ठ, त्याहून राजा वरिष्ठ, असतो.(५,६,७,८) एका राष्ट्राचा अधिपती तो राजा, अनेक राष्ट्रांचा अधिपती तो महाराजा आणि अनेक महाराजांचा अधिपती असतो तो  सम्राट चक्रवर्ती.(९) या सगळ्यांच्या निर्माता ब्रम्हदेव आहे. परंतु ब्रह्मदेवास कोण निर्माण करतो? (१०,११) ब्रम्हा. विष्णू, आणि महेश्वर याना जो निर्माण करतो तो खरा परमेश्वर होय. अनेक प्रयत्न करून त्यास ओळखावे. (१२) तो देव जर ओळखला नाही तर यमयातना चुकत नाहीत ब्रम्हांड नायक परमात्मा ओळखता येत नाही हे कांही बरे नव्हे.(१३)  ज्या परमात्म्याने आपणास या संसारात जन्मास घातले, ज्याने हे अवाढव्य विश्व निर्माण केले त्याला जो ओळखून काढीत नाही, तो पतित होय. या व्याख्येनुसार देहबुद्धीमध्ये  जीवन जगणारी माणसे किंवा आत्मज्ञान नसणारी सगळी माणसे पतितच असतात. आत्मज्ञानी तेव्हढा पावन असतो.(१४) म्हणून प्रत्येकाने खरा देव ओळखावा. आणि आपल्या जन्माचे सार्थक करून घ्यावे. देव कसा ओळखावा हे माहीत नसेल तर संतांची संगती करावी, म्हणजे ते आपोआप कळून येईल.(१५) श्रीसमर्थ संतांची लक्षणे सांगताना म्हणतात ज्याला भगवंताचे ज्ञान असते त्याना संत म्हणतात. शाश्वत काय आणि अशाश्वत काय हे त्यांनी बरोबर निवडलेले असते. (१६) खरा देव कधी बदलत नाही आणि आपल्या स्थानावरून भ्रष्ट होत नाही, अशी प्रचीती आपल्या अंतर्यामी झालेली असते. तो थोर साक्षात्कारि संत अथवा साधू असे जाणावे. (१७) जो देहाने लोकांमध्ये वावरतो परंतु सामान्य जनास जे डोळ्याने दिसत नाहीत अशा प्रकारच्या दृश्यांच्या अतीत असलेल्या  स्वरुपाबद्दल वारंवार सांगतो आणि ज्यांच्या अंतर्यामी आत्मज्ञान सदैव जागे असते  तोच खरा साधू असतो.(१८) परमात्मा तिन्ही गुणांच्या पलीकडे आहे, असा प्रत्यक्ष अनुभव येणे यास ज्ञान असे म्हणतात. या अनुभवाशिवाय अन्य सर्व कांही अज्ञान समजावे. (१९)पोट भरण्यासाठी लोक अनेक विद्यांचा अभ्यास करतात. लोक त्याला ज्ञान म्हणतात खरे,  परंतु त्याने जीवनाचे सार्थक होत नाही. (२०)  एका देवाचा साक्षात्कार करून घ्यावा. तेच खरे ज्ञान आणि त्यानेच जीवनाचे सार्थक होते. बाकीच्या विद्या पोट-विद्या असून त्या जीवनाचे सार्थक करु शकात नाहीत.(२१) पोटविद्या शिकून जन्मभर पोट भरले आणि देहाचे संरक्षण केले तरी, अंतकाळी हे सगळे वाया जाते.(२२)श्रीसमर्थ म्हणतात पोट भरण्याच्या विद्येला आत्मविद्या म्हणू नये. सर्वव्यापक परामात्मवस्तू ज्या ज्ञानाने प्राप्त होते ते खरे ज्ञान होय.(२३) परमात्मवस्तूचे ज्ञान ज्याच्या जवळ  असते तो खरा संत. किंवा सज्जन होय. समाधान मिळविण्याचा मार्ग त्याना विचारावा. (२४)एक अज्ञानी अन्य अज्ञानी व्यक्तीकडे गेला त्याच्यापाशी ज्ञानप्राप्ती होणार नाही. करंट्या अथवा दैवहीन माणसाच्या दर्शनाने आपले दैव उदयाला येणे अशक्य आहे. (२५) अशा अनेक उदाहरणांनी श्री समर्थ समजाऊन सांगतात की एका प्रापंचीकाकडे दुसरा प्रापंचिक गेला तर तो सिद्ध होऊ शकत नाही. (२५-२९) त्याच प्रमाणे एका देहबुद्धीच्या माणसाकडे दुसरा देहबुद्धीचा मनुष्य गेला तर तो विदेही होऊ शकत नाही. म्हणून आत्मज्ञानी गुरुवाचून आत्मज्ञानाचा मार्ग सापडत नाही. (३०) या कारणाने आत्मज्ञानी शोधून काढावा आणि त्यांचा अनुग्रह घ्यावा. त्यांचे शिष्यत्व विधीपूर्वक स्वीकारावे, मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली सारासार विचाराने जीवास मोक्ष प्राप्त होतो.(३१)
     ||  इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे देवशोधन नाम समास पहिला ||                               
           
            दशक सहावा समास पाचवा माया,ब्रम्ह निरुपण       

या समासामध्ये श्री समर्थांनी माया आणि ब्रम्ह यांचा संबंध कसा आहे, त्यांची लक्षणे कशी आहेत ते सांगितले आहे. माया हा शब्द मा धातूपासून तयार होतो. या म्हणजे मोजणे, मावणे, समावेश होणे. माया म्हणजे विश्वमती यस्याम जिच्या मध्ये विश्व मावते, जी  परब्रह्माला  मोजमापात आणते, ती शक्ती होय. वेदांतात ही महामाया शिरली कोठून? या प्रश्नाचे उत्तर देताना  बृहदारण्यक उपनिषदात याज्ञवल्क ऋषीनि सांगितले आहे इदं सर्व यदयात्म  जे आहे ते सर्व आत्मरूप आहे. श्रीसमर्थांचे सुद्धा सांगणे असेच आहे. विश्वाचे मूळ तत्व एकच एक आत्मा आहे. त्याच्या ठिकाणी अनेकपणा नाही. येथे यत्किंचीतही अनेकपणा नाही. आत्म्यावाचून अन्य वस्तूच नाही. मी खरोखर आत्माच आहे.परंतु अज्ञानामुळे देहबुद्धीचा उदय झाला आणि सत्यस्वरूप मी चा जीवाला विसर पडला. तो स्वतःला देहरूप मानू लागला. त्यामुळे त्याला सगळे दृश्य विश्व खरे वाटू लागले. एकीकडे आत्मस्वरूप झाकले गेले आणि दुसरीकडे अनेकपणाने  भरलेले आणि सतत पालटणारे विश्व त्याला सर्वस्वी सत्य वाटू लागले. शुद्ध, निर्मळ, निर्गुण परब्रम्हामध्ये अक्षरश: अनंत शक्ती आहेत त्यापैकी दृश्य किंवा नामरूपे किंवा आकार निर्माण करणारी एक अति विलक्षण शक्ती आहे. संपूर्ण निराकार आणि स्वतंत्र परमात्म वस्तूला अनंत आकार देणारी आणि दृश्याच्या कक्षेत कोंडणारी  अशी ही शक्ती प्रथम आत्मरुपावर झाकण घालते. या शक्तीचे नांव आहे माया आणि झाकणाचे नांव आहे अज्ञान किंवा अविद्या.  भ्रम, अध्यास. देहबुद्धी  ही सगळी मायेचीच प्रजा  आहे. आत्मज्ञानी पुरुषाला परमात्मवस्तू जशी आहे तशीच अनुभवास येते. अनंत नामरुपानी भरलेले आणि क्षणोक्षणी बदलणारे चराचर विश्व त्याला परब्रह्माची स्वानंद लीलाच आहे असे वाटते. मायेच्या प्रभावाने फसून जाऊन तो आत्मस्वरूपाला विसरत नाही आणि दृष्याला खरेपणा देत नाही. परंतु अज्ञानी व्यक्ती मायेच्या अधीन होऊन अज्ञानामध्ये जगणारा जीव स्थळ,काळ निमित्तांच्या  बंधनात वावरतो. त्यामुळे आत्मस्वरूप तर विसरतोच परंतु त्याबरोबरच विश्व संपूर्ण सत्य मानतो. आत्मज्ञानाच्या  भूमिकेवरून पाहिले तर ब्रम्ह आणि त्याची शक्ती दोन्ही अगदी एकरूपच आहेत. परंतु अज्ञानाच्या भूमिकेवरून पाहिले तर ब्रम्ह आणि माया वेगळी वाटतात. म्हणून मानवी बुद्धीच्या पद्धतीने ज्ञानमय ब्रम्ह आणि अज्ञानमय माया  यांची तुलना श्री समर्थांनी या समासात केली आहे. यात उपनिषदाचे सार ओतले आहे. तत्वज्ञानाच्या दृष्टीने हा समास अति महत्वाचा आहे.
श्रोत्यांनी असा प्रश्न विचारला होता की माया आणि ब्रम्ह कशी असतात? श्रोता आणि वक्ता यांच्या संवादाच्या मिषाने माया आणि ब्रम्ह याचे विवेचन ऐकावे असे श्री समर्थ सांगत आहेत.(१) ब्रम्ह निर्गुण निराकार तर माया सगुण साकार आहे. ब्रम्ह अनंत आहे तर माया परिमित आहे. (२) ब्रम्ह निर्मल, निश्चल तर माया  चंचल, चपळ आहे. ब्रम्ह   निव्वळ, अमर्यादित, आहे. तर माया मर्यादारूपच आहे.(३) ब्रम्ह दिसत नाही  तर माया दिसते. ब्रम्ह भासत नाही परंतु माया भासते. ब्रम्ह कल्पांतकाळी सुद्धा नाश पावत नाही परंतु माया नाश पावते. (४) ब्रम्ह निर्माण होत नाही तर माया निर्माण होते. ब्रम्ह क्षय पावत नाही तर माया क्षय पावते. ब्रम्ह अज्ञानी जीवाला आवडत नाही परंतु माया अज्ञानी जीवाला आवडते. (५) ब्रम्ह जन्मत नाही तर माया जन्मते. ब्रम्ह मरत नाही तर माया मरते. ब्रम्ह धारणेत धरता येत नाही परंतु माया धारणेत धारणेत धरता येते.(६) ब्रम्ह फुटत नाही तर माया फुटते. ब्रम्ह तुटत नाही तर माया तुटते. ब्रम्ह अविनाशी असल्याने अवीट असते. तर माया विनाशी असल्याने विटते. (७) ब्रम्ह विकारापासून मुक्त आहे. ब्रम्ह कांहीच करीत नाही तर माया सर्व कांही करते. ब्रम्ह रूप रहित तर माया नाना रूपे धारण करते. (८) ब्रम्ह शाश्वत आणि एकच आहे परंतु  माया पंच महाभूतात्मक, अशाश्वत आणि अनेकपणाने  भरलेली आहे. जे आत्मानात्म विवेकी असतात तेच ब्रम्ह आणि माया यांचे खरे स्वरूप जाणतात.(९) ब्रम्ह विशाल तर माया लहान आहे. ब्रम्ह सार सर्वस्व तर माया साररहित आहे. ब्रम्ह स्थलातीत आहे तर माया स्थलयुक्त आहे. तिच्याकडे अलीकडे आणि पलीकडे असा स्थलभेद आहे. (१०) विश्वामध्ये जिकडे तिकडे माया पसरलेली आहे. त्यामुळे ब्रम्ह झाकले गेले आहे. परंतु साधू पुरुष मायेच्या विस्तारातून  शुद्ध ब्रम्हस्वरूप निवडून घेतात. (११) पाण्यावर जमलेले शेवाळे बाजूस सारून खालचे स्वच्छ पाणी घ्यावे, किंवा दुध आणि पाणी मिसळले असता पाणी बाजूस सारून त्यातील दुध प्यावे त्याप्रमाणे या विश्वामधील माया-ब्रह्माच्या मिश्रणातून माया बाजूस सारून शुद्ध ब्रह्माचा अनुभव घ्यावा.(१२)ब्रम्ह आकाशाप्रमाणे निर्मळ तर माया पृथ्वी प्रमाणे मलीन आणि गढूळ आहे. ब्रम्ह अत्यंत सूक्ष्म तर माया आत-बाहेर स्थूल आहे. (१३) ब्रम्ह  अतींद्रिय तर माया इंद्रियांच्या कक्षेत आहे. ब्रम्ह सगळीकडे सम अथवा सारखे आहे तर माया सगळीकडे विषम किंवा कमी-अधिक प्रमाणात आहे. (१४) ब्रम्ह ध्यानाचा विषय होऊ शकत  नाही परंतु माया ध्यानाचा विषय होऊ शकते. ब्रम्ह पुराव्याने सिद्ध करता येत नाही. परंतु माया पुराव्याने सिद्ध करता येते. ब्रम्ह तर्काच्या पलीकडे असल्याने तेथे वादाची बाजूच नाही. माया मात्र तर्काच्या कक्षेमध्ये येत असल्याने तिच्यात पुर्वपक्ष आणि उत्तर पक्ष अशा वादाच्या दोन बाजू असतात. (१५) ब्रम्ह एकमेव सिद्धांत तर  मायेमध्ये अनेक पुर्वपक्ष आहेत. ब्रम्ह शाश्वत आणि सत्य तर माया अशाश्वत आणि असत आहे. ब्रम्ह कर्मरहित आणि हेतूरहित तर माया कर्ममय आणि हेतुयुक्त आहे. (१६)ब्रम्ह अखंड तर माया खंडीत होणारी आहे. ब्रम्ह सगळीकडे भरगच्च भरलेले आहे तर माया पंचभूतात्मक पोकळ आहे. ब्रम्ह कायमचे पूर्ण रूप आहे तर माया जुनाट, कुचकी, नाशवंत आहे. (१७) ब्रम्ह स्वयंभू आहे म्हणून ते कोणी घडवीत नाही, परंतु माया घडविली जाते, निर्माण करता येते, ब्रम्ह पडत नाही, स्थान भ्रष्ट होत नाही.तर माया पडते, स्थान भ्रष्ट होते. तिचे मायापण नाहीसे होते. परंतु ब्रम्हाचे ब्रह्मपण कधीच नाहीसे होत नाही. ब्रम्ह कधी बिघडत नाही, बाधित होत नाही तर माया बिघडते, बाधित होते. ब्रम्ह जसेच्या तसे राहते. परंतु मायेमध्ये बदल घडून येतो, (१८) ब्रम्ह नाही असे कधीच होत नाही परंतु मायेचा निरास केल्यास नाहीशी होते. ब्रम्ह प्रलय रहित आहे, त्यास अंत नाही माया मात्र प्रलय युक्त आहे, तिला शेवट, अंत आहे. ब्रम्ह अनंत तर माया अंतवंत आहे .(१९) ब्रम्ह अत्यंत कोमल, मृदू, नाजूक आहे तर माया अत्यंत कठीण आहे. ब्रम्ह अति विशाल तर  माया आकुंचित आहे. ब्रम्ह सर्वकाळ टिकते तर माया नाश पावणारी आहे. (२०) ब्रम्ह वाणीने वर्णन करून सांगता येत नाही. तर माया जसे तिचे वर्णन करावे तशी असते. ब्रम्ह काळाच्या सत्तेच्या पलीकडे आहे तर माया काळाचे भक्ष्य आहे. (२१) ब्रम्ह अभंग असल्याने मोडत नाही. जसेच्या तसे राहते. परंतु माया मोडते. माया अनेक प्रकारचे रंगरूप निर्माण करते. हा सारा मायेचा खेळ आहे. (२२)  माया,ब्रह्माच्या लक्षणांचा विस्तार आता पुरे झाला. या विश्वामध्ये जेव्हढे कांही सचेतन आणि अचेतन दिसते आणि बदलत जाऊन नाश पावते. ते सर्व मायेचे स्वरूप आहे. या समस्त चराचर विश्वाला परमात्मा आतबाहेर व्यापून आहे. (२३) दृश्य विश्वाच्या समस्त बंधनांच्या सीमांच्या पलीकडे परमात्मा निराळे पणाने राहतो. आकाशाचे प्रतिबिंब पाण्यात पडले तरी आकाश पाण्यापासून अलिप्त असते तसाच परमात्मा सर्वांमध्ये व्यापलेला असून अलिप्त राहतो.(२४) विवेक वापरून माया आणि ब्रम्ह एकमेकांपासून वेगळे केले तर जन्म-मरण चुकते. संताना शरण गेल्याने मोक्ष मिळतो. (२५) अहो या संतांचा मोठेपणा सांगावा तेव्हढा थोडाच आहे. त्या सांगण्याला सीमाच नाही. कारण जगात भरून राहिलेला परमात्मा संतांच्या कृपेने आपल्या अंतर्यामी प्रकट होतो.(२६)
       || इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे माया-ब्रम्ह निरुपण नाम समाप्त  पाचवा ||

               दशक सातवा- समास पहिला ओवी क्रमांक ३७, ३८, ३९, ४०

श्री समर्थ या ओवीमध्ये म्हणतात विद्या मिळविण्याचे श्रम न करता, केवळ संतसमागम केला तर सगळा शास्त्रार्थ  सहजपणे समजतो. संतसमागमाचे हे असे रहस्य आहे.(३२) केवळ विद्वतेने जे कळत नाही ते संत समागमाने कळते, इतकेच नव्हे तर सगळा शास्त्रार्थ आपल्या अनुभवाच्या कक्षेत येतो.(३९) परमार्थात खरा लाभ पदरात पडण्यास संतसमागम उपयोगी पडतो. ते विद्या मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या श्रमाची येथे गरज नसते. ज्याने जन्माचे सार्थक होते ते रहस्य कांही वेगळेच आहे.(४०)
                                                            

                      दशक सातवा समास दुसरा ब्रम्हनिरुपण


संत साधू असे सांगतात की, ब्रम्ह गुणरहित, आकाररहित, रंगरहित, विकाररहित आणि मर्यादा रहित आहे.(१) ब्रम्ह सर्वाना व्यापून आहे. अनेकांमध्ये एकपणाने आहे. ते शाश्वत आहे असे त्याचे वर्णन शास्त्रात आढळते.(२)ब्रम्ह कधी न ढळणारे अंत नसणारे आहे. ते सदा सर्वकाळ स्थिर असते. ब्रम्हाबद्दल कल्पना करता येत नाही. ते कल्पना रहित आहे. (३) ब्रम्ह दृश्याहून अगदी निराळे आहे. दृश्य लय पावल्यावर शून्य उरते. त्याहून सुद्धा ब्रम्ह वेगळेच आहे. ते अतींद्रिय असल्याने सर्व इंद्रियांनी मिळून प्रयत्न केला तरी ते त्याना आकलन होणारे नाही.(४) ब्रम्ह डोळ्याना दिसत नाही त्यामुळे इंद्रिय दृष्टीने पाहू इच्छित  मूढ  लोकाना ते नसल्या प्रमाणे वाटते. साधूंच्या मार्गदर्शनाशिवाय ब्रम्ह अनुभवास येत नाही. (५)  ब्रम्ह सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. ब्रम्हासारखे चांगले दुसरे कांहीच नाही. ब्रम्ह इतके सूक्ष्म आहे की ब्रम्हदेवाना सुद्धा ते जाणणे कठीण पडते.(६)  ब्रम्ह असे आहे ब्रम्ह तसे आहे असे कितीही वर्णन केले तरी ते त्या वर्णनाहून निराळेच असते. श्रवण करून साधनाभ्यास करणे हा एकच उपाय ब्रम्हदर्शन करून देतो.(७) ब्रह्माला असंख्य नांवे आहेत हे खरे परंतु ब्रम्ह त्या सर्व नांवाच्या पलीकडे आहे. कोणतेही  नाम त्याचे स्वरूप जसे आहे तसे सांगू शकत नाही. दृश्यामधील वस्तूंचे साम्य ब्रह्मास लागू पडत नाही. (८) या ब्रह्मांडात ब्रम्हासारखे दुसरे कांहीच नाही, त्यामुळे दृष्टांत देऊन ब्रम्हाचे वर्णन करण्याचा प्रयत्न वाया जातो. (९) या संदर्भात श्रुती म्हणते यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य माणसा सह””||छ || वाणी आणि मन ते अप्राप्य आहे असे म्हणून परत येतात. ब्रम्हापाशी वाणी माघार घेते. मनाला ब्रह्मप्राप्ती होत नाही. असे अंतिम सत्य श्रुती बोलली आहे (१०) सारख्या कल्पना करीत  राहणे  हे मनाचे स्वरूप आहे.परंतु ब्रम्हामध्ये कल्पनेला  वाव नाही. म्हणून श्रुतीने सांगितलेला सिद्धांत मुळीच खोटा नाही. आपल्या इंद्रियांचा बाह्य पदार्थांशी संबंध आला की त्या पदार्था बद्दल थोडीशी माहिती मनासमोर येते. परंतु केवळ तितक्याच माहितीवर पदार्थ विज्ञान होऊ शकत नाही. मन आपल्या कल्पनेने त्यात भर घालते आणि मग आपल्याला त्या पदार्थाचे ज्ञान होते. अशा प्रकारे इंद्रिये जागृत आहेत तोपर्यंत मन सारखी कल्पना करीत राहते. स्वप्न पडत असताना सुद्धा मनाच्या नुसत्या कल्पनाच चालू असतात. अशा प्रकारे तीन अवस्थांपैकी दोन अवस्थांमध्ये कल्पनेचे प्राधान्य पाहून मन कल्पना रूप आहे असे वेदांतात म्हटले आहे. कल्पना, स्मृती, विचार,लक्ष, इच्छाशक्ती, भावना, इत्यादी मनाची विविध अंगे स्वस्वरूपाच्या कक्षेत लटकी पडतात. तेथे जीवपणा नाहीसा व्हावा लागतो. जीवपण द्वैतमय असते. ते नाहीसे होण्यास सदगुरुना शरण जाणे हाच एक राजमार्ग आहे. (११) श्री समर्थ म्हणतात आता मनाला जे प्राप्त करून घेता येत नाही ते कसे प्राप्त करून घ्यावे असा प्रश्न  विचाराल तर त्याचे उत्तर असे की सदगुरु वाचून हे कार्य सिद्ध होणार नाही. (१२) समजा कोठारे धान्यादिक वस्तूंनी पूर्ण भरलेली आहेत. परंतु ती सर्व कुलुपे लाऊन बंद केली आहेत. त्यांची किल्ली जर आपणा जवळ नसेल तर त्यातील वस्तू आपणास अप्राप्यच असतात. (१३)हे बोलणे ऐकून श्रोता म्हणाला गुरुदेव ती किल्ली कोणती ते मला सांगा.(१४) गुरुदेव म्हणाले सदगुरु कृपा हीच ती किल्ली आहे. तिच्यामुळे बुद्धीमध्ये आत्मज्ञानाचा प्रकाश पडतो, आणि द्वैताची दारे एकदम उघडतात. सदगुरु कृपेने देहबुद्धी जाऊन आत्मबुद्धी प्रकट होते. देहबुद्धीमध्ये अज्ञानाचा अंधकार असतो, तर आत्मबुद्धीमध्ये ज्ञानाचा प्रकाश असतो. देहबुद्धीमुळे देह हा द्वैताच्या कोंडीत, भेदांच्या  बाजारात कैदी असतो. आत्मबुद्धी निर्माण झाली की जीवाचे वेगळेपण चटकन गळून पडते. त्यास भेदातील अभेदाचे साक्षात ज्ञान होते. (१५) आत्मबुद्धीमध्ये सुखाला कांही कमतरता नसते. तेथे अमाप सुखाची प्राप्ती होते. तेथे मनाचा शिरकाव होत नाही.परंतु मनावाचून साधना चालू राहते. जोपर्यंत जीवपणा असतो तोपर्यंत मन पणाने मन असते. सुख भोगण्याची मनाची शक्ती ठरलेली आहे. त्यामुळे जीवाचे सुख सुद्धा मापलेले आहे. त्याचप्रमाणे  जोपर्यंत मन, मनपणाने असते तोपर्यंत मी साधना करतो या भूमिकेवरून साधक अनुसंधानाचा अभ्यास करतो.परंतु आत्मबुद्धी प्रकाशल्यावर  जीव शिव बनतो. तेथे सुखाला वाण नसते. आणि अनुसंधानरूप झाल्याने वेगळे पणाने साधना नसते. (१६) स्वस्वरूपाच्या प्राप्तीसाठी मन लागत नाही.तेथे वासना तृप्ती लाभते. अशा त्या अवस्थेची कल्पना करून ती आकलन होणे अशक्यच असते. सध्याच्या अवस्थेत आपणास मनावाचून अनुभव घेता येत नाही. वासना तृप्त केल्यावाचून समाधान मिळत नाही. परंतु स्वरुपसाक्षात्कारा मध्ये मन नसून सुद्धा अनुभव येतो. आणि वासना नसून समाधान मिळते. (१७) सध्याच्या अनुभवा प्रमाणे जे आपण अखेरचे समजतोत्याच्याही पलीकडे ब्रम्हस्वरूप आहे. म्हणूनच ते आपल्या मनाच्या आणि बुद्धीच्या आटोक्याबाहेराचे आहे. परंतु  माणसाने जर नर-देहाचा संबंध सोडला तर  ते ब्रम्ह् ताबडतोप प्राप्त होते. (१८) आपण आपल्या देहबुद्धीचा संबंध सोडला मग ब्रह्मस्वरूप पहाता  येईल. जे स्वानुभवी आहेत ते माझ्या सांगण्याने आनंदित होतील.(१९) ज्याचा संग सोडावयाचा तो म्हणजे मीपणा. परंतु मीपणा म्हणजे जीवपण होय. स्वरूपाला
अज्ञानाचा संबंध येणे म्हणजे जीवपण येणे असे समजावे. वास्तविक स्वस्वरूपच स्वयंप्रकाशित आहे परंतु अज्ञानाशी सबंध आल्याने त्याचे ज्ञान झाकले जाते. आणि त्याचे विश्वव्यापित्व लोपते. मी जीव आहे, अज्ञानी आहे, देहापुरताच मर्यादित आहे अशी देहबुद्धी बळावते. त्या देहाबुद्धीस बाजूस सारणे  म्हणजेच संग सोडणे होय. (२०) जीवपणाचा संबंध सोडला की संबंध रहित ब्रम्हस्वरूपाशी तादात्म्य पावण्याचा अधिकार येतो, सामर्थ्य प्राप्त होते. (२१) मी खरा कोण आहे ते न कळणे याचे नांव अज्ञान आहे. ते अज्ञान नाहीसे झाले की परब्रम्ह हस्तगत होते. (२२)  देहबुद्धीच्या मोठेपणाला ब्रम्हस्वरूपाच्या ठिकाणी मुळीच किमत नसते. कारण तेथे देहाचा अहंभाव साफ नाहीसा करून टाकावयाचा असतो.(२३)  ब्रम्हस्वरूपामध्ये उच्च,नीच असा  भेदभाव नाही. तेथे राजा आणि रंक दोघेही सारखेच असतात. स्त्री, असो की पुरुष असो सर्वाना ब्रह्मपद सारखेच प्राप्त होते.(२४) ब्राम्हणांचे ब्रम्ह  सोवळे आणि शूद्राचे ओवळे असे वेगळेपणाचे, लहान-मोठे भेद तेथे नसतात. (२५) राजाला उत्तम ब्रम्ह आणि त्याच्या परिवारातील नोकर-चाकराना कमी प्रतीचे  अथवा हलके ब्रम्ह असा भेद तेथे मुळीच नसतो. (२६) अगदी सगळ्या जीवाना ब्रम्ह एकच आहे. तेथे अनेकपणा नाही. अगदी रंक असो अथवा ब्रह्मादिक देव असो सर्वजण  एकाच परब्रह्मास जाऊन मिळतात. श्री समर्थांची तत्वदृष्टी किती व्यापक, भेद रहित, सूक्ष्म, आणि अतिमानवी आहे याची येथे कल्पना येते. मानवी जीवन भेदांनी भरलेले आहे. तर स्वस्वरूपानुभव अभेदाने परिपूर्ण आहे. या दोघांची सांगड घालण्यात श्री समर्थांचे खरे चातुर्य प्रकट होते.(२७)  स्वर्ग, मृत्यू, आणि पाताळ या तिन्ही लोकातील सर्व आत्मज्ञानी पुरुषाना  विश्रांतीचे स्थान एकच आहे आणि ते म्हणजे परब्रम्ह होय.(२८) सदगुरुना जे परब्रम्हपद मिळते तेच शिष्याला सुद्धा  प्राप्त होते. तेथे भेदभाव नसतो. परंतु कोणीही असला तरी ब्रह्मपद प्राप्त होण्यास शरीराच्या आपलेपणाचा संबंध सुटला पाहिजे. (२९) ज्याच्या देहबुद्धीचा अंत घडून येतो त्या सर्वाना एकच ब्रम्ह प्राप्त होते. ब्रह एकच एक असे अद्वितीय आहे हे श्रुतीचे वचन प्रसिद्ध आहे. (३०) साधूपुरुष देहाने वेगवेगळे दिसतात परंतु अंतरंगाच्या दृष्टीने ते एकाच आत्मस्वरुपात मिसळून जातात. स्वरूपात मिसळले की सगळे मिळून एकच देहाच्या पलीकडील ब्रम्हवस्तू बनून जातात.(३१) ब्रम्ह नवे नाही जुने नाही. नवे-जुने हा कालभेद सदवस्तुचे ठिकाणी नाही. ब्रम्हामध्ये उणेपण आहे असे ज्याला वाटते तो देहबुद्धीचा कुत्रा असतो. सदवस्तूमध्ये अपूर्णता पहाणारा मनुष्य स्वतः अज्ञानी असतो. (३२) देहबुद्धीमध्ये 
अज्ञानाचा  विलास असतो. अविद्या ही अनेक संशयाना  जन्म देते.  ते संशय समाधानाचा नाश करतात. खरे सांगावयाचे म्हणजे देहबुद्धीच्या योगाने समाधान प्राप्तीची संधी हुकते. (३३) मी देहच आहे ही धृढ भावना म्हणजे देहबुद्धी होय. मी आत्माच आहे अशी धृढ भावना म्हणजे आत्मबुद्धी होय. देहबुद्धी हे अज्ञानाचे प्रधान लक्षण आहे तर आत्मबुद्धी हे आत्मज्ञानाचे प्रधान लक्षण आहे.देहबुद्धीच्या योगाने जीव आकुंचित होऊन दृश्याच्या नादि लागतो, तर आत्मबुद्धीच्या प्रभावाने जीव विशाल होऊन स्वस्वरूपाशी समरस होऊन जातो. देहबुद्धी ही जुनाट आहे ती सुटता सुटत नाही. इतकेच नव्हे तर ती आत्मबुद्धी निर्माण होण्यास वारंवार आड येते. म्हणून  वाटेल ते करून देहबुद्धी नाहीशी करावी. असे श्री समर्थ आर्जवून सांगत आहेत. सर्वस्व आहे असे वाटणे हेच देहबुद्धीचे मुख्य लक्षण आहे. परंतु सुज्ञ लोक देहाचे खोटेपण, त्याचे अशाश्वतपण बरोबर ओळखतात आणि त्याचे दोष पहातात.(३४)  देहबुद्धी देहाला पुरून उरते ती कशी ते पहा. देह जीवित आहे तोपर्यंत जीव देहाच्या मी पणाने अभिमान धरतो. देह मरणाधीन झाल्यानंतर हीच देहबुद्धी जीवास पुन्हा जन्म घ्यावयास लावते.(३५) देहाबुद्धीमुळे देहास भलतेच महत्व येते, परंतु त्या कारणानेच समाधानाला उणेपणा येतो.  बरे, ज्या देहाला एव्हढे महत्व दिले जाते तो कधी पडेल, कसा पडेल हे सांगता येत नाही. (३६) देहाच्या पलीकडे जाण्यात जीवाचे कल्याण आहे, असे साधू,संत सांगतात. म्हणून देहबुद्धी वाढविण्याने आपले नुकसान होते हे उघडच आहे. (३७) या देहबुद्धीमध्ये विलक्षण शक्ती असते. योगी लोकाना सुद्धा ती त्रास देते. आपल्या आधीन करते. सिद्धींचा  उपयोग करून  व्याप वाढविणे हा देहबुद्धीचाच प्रभाव आहे. (३८) म्हणून देहबुद्धी क्षीण होईल तरच परमार्थ लाभेल नाहीतर नाही. देहबुद्धीमुळे ब्रह्माशी समरसता होऊ शकत नाही. (३९) आत्मानात्म विवेक जीवाला परमात्मवस्तुकडे खेचतो. परंतु देहबुद्धी त्याला मागे खेचते. तो तेथपर्यंत पोहोचू शकत नाही. देहबुद्धीतून अहंकार निर्माण होतो आणि जीवाला सदवस्तुपासून वेगळे करतो.आणि निवडून वेगळे काढतो. याचा अर्थ असा की मूलतः जीव ब्रह्मस्वरूप असून सुद्धा केवळ अहंकाराने त्यास सदवस्तुमध्ये मिसळून जाता येत नाही.(४०) हे सगळे नीट  ध्यानात आणून सुज्ञ साधकाने अध्यात्म श्रवण करावे आणि आपली देहबुद्धी संपूर्णपणे सोडावी. अशा रीतीने ब्रम्हस्वरूपात खरोखरीच मिसळून जावे. त्याच्याशी ऐक्य पावावे. (४१) ही सदवस्तू कशी आहे असा प्रश्न उत्पन्न करून श्रीसमर्थ सांगतात परमात्मवस्तू अगदी एकच आहे. परंतु तिच्या अनुभवामध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. पहिली ही की ब्रम्ह सर्व दृष्टीने अनंत आहे. त्याच्या ठिकाणी अनंत गुण आहेत आणि शक्ती अनंत प्रमाणात वास करतात. प्रत्येक माणसाची मनोरचना भिन्न भिन्न असल्याने निरनिराळ्या व्यक्तीना ब्रह्माच्या वेगवेगळ्या अंगाचा विशेषपणे अनुभव येतो. कोणाला त्याच्या अनंतपणाची  तर कोणाला त्याच्या अलिप्तपणाची तर कोणाला त्यांच्या निवांत पणाची तर कोणाला त्यांच्या सर्वज्ञ पणाची तर कोणाला त्यांच्या सत्तारुपाची जबरदस्त प्रचीती येते. मग तो ते नांव ब्रह्माला देतो. दुसरी गोष्ट अशी की अत्यंत शुद्ध आणि केवळ ब्रम्हरूपामध्ये ब्रह्माचा अनुभव येणारे थोडेच असतात. ज्यांचा अनुभव ज्या पातळीवर स्थिर होतो त्या पातळीवरून तो साधक ब्रम्हाचे वर्णन करतो. म्हणून कोणी ज्योतिरूप तर कोणी कोणी साक्षिरुप, तर कोणी चैतन्यरूप आहे आहे असे सांगतात. वास्तविक पहाता ब्रम्ह एकच एक आहे. ते एकच ब्रम्ह अनेक प्रकाराने भासते. निरनिराळ्या व्यक्तींची मनोरचना निरनिराळी असते. त्यामुळे ब्रम्ह भिन्न,भिन्न प्रकारांनी अनुभवास येते. (४३)
साधकाला ज्याप्रकारे ब्रम्ह अनुभवास येते तोच प्रकार त्यास खरा वाटतो. त्या स्वरुपाबद्दल त्याच्या मनात खात्री निर्माण होते.  (४४)  वस्तुतः ब्रम्ह नाम-स्वरूपाच्या पलीकडे आहे. असे असले तरी त्याला अनेक नांवे आढळतात. उदा, निर्मळ, निश्चल इत्यादी ते अत्यंत शांत आणि स्वतःच्या आनंदात रममाण असते. (४५) ब्रम्ह अरूप आहे कारण त्याला आपण पाहू शकत नाही. ते अगोचर आहे. ते इन्द्रियाना  आकलन होत नाही. ते अच्युत आहे. आपले स्थान सोडीत नाही. अनंत आहे कारण त्याचा आदी आणि अंत कळत नाही. ते अपरंपार आहे कारण त्याला कसल्याही मर्यादा नाहीत. ते अदृश्य, अतर्क्य आणि अपार आहे, ब्रह्माची अशी नांवे आहेत. (४६) ब्रम्ह नादरूप आहे, ज्योतिरूप आहे, चैतन्यरूप आहे, सत्तारूप आहे,साक्षीरुप आहे, स्वस्वरूप आहे.(४७)  ते शून्य आहे, सनातन आहे, सर्वज्ञ आहे, सर्वात्मा आहे, सर्वेश्वर आहे, जगाचे जीवन आहे (४८) ते सहज आहे,  सदोदित आहे, शुद्ध,बुद्ध आहे. सर्वातीत आहे, शाश्वत आहे, शब्दांच्या पलीकडे आहे. (४९) ते विशाल आहे विस्तीर्ण आहे, विश्वाला भरून आहे. ते आकाशा सारखी मलहीन  वस्तू आहे, आत्मा, परमात्मा आणि परमेश्वर आहे.(५०) ब्रम्ह परमात्मा आहे, आत-बाहेर ज्ञानाने भरलेले आहे,अगदी एकरूप आहे, ते फार पुरातन आहे, चिद्रूप आहे, चिन्मात्र आहे, ज्या ब्रह्माला नांव देता येत नाही अशा अनाम ब्रह्माची ही नांवे आहेत हे ध्यानात ठेवावे. (५१)ब्रह्माला अशी असंख्य नांवे आहेत. हे जरी खरे असले तरी तो परमेश्वर नामांच्या पलीकडे आहे. त्याच्या स्वरुपाची कांहीतरी निश्चित कल्पना यावी म्हणून ही इतकी नांवे त्याला ठेवली आहेत. (५२) येथे विश्रांतीला विसावा मिळतो, असा तो आदिपुरुष आहे, आत्माराम आहे. ही नांवे भिन्न दिसली तरी एकच एक परब्रम्ह आहे तेथे दुसरे कांही नाही. (५३) हे समजण्यासाठी आता चौदा ब्रह्माची लक्षणे सांगतो.त्याच्या श्रवणाने नांवे अनेक असली तरी ब्रम्ह एकच एक आहे हे तत्व मनामध्ये ठसेल.(५४) जेव्हढे  खोटे  आहे तेव्हढे बाजूस काढले. जे उरले  ते सारे खरे आहे. चौदा ब्रम्हाचे वर्णन शास्त्राच्या आधारानेच करू. (५४)
           || इति श्री दासबोधे गुरु-शिष्य संवादे ब्रम्ह निरुपण नाम समास दुसरा ||


                    दशक आठवा समास सहावा  ओवी स. ४१ ते ४६
श्रोत्यांनी प्रश्न विचारला होता गुरुदेव, सत्समागम केला असता मुक्ती मिळण्यास किती दिवस लागतात?. (४१) या प्रश्नाचे उत्तर समर्थ आता देत आहेत ते ऐकावे. या उत्तराने  प्रश्न विचारणारा पूर्णपणे समाधान पावेल. सत्समागमाचा विचार पुढील प्रमाणे आहे (४२) लोखंड परीसाला लागले, पाण्याचा थेंब समुद्रात पडला, एक नदी गंगेला येऊन मिळाली, ज्या क्षणीच हे घडते त्याच क्षणी लोखंड सोने बनते, थेंब सागर बनतो, आणि नदी गांगारूप बनते.(४३) त्याच प्रमाणे जो अत्यंत सावध आहे, कष्टाळू आहे आणि तत्पर आहे त्यास सत्समागमा मध्ये ताबडतोप मोक्ष प्राप्त होतो. ज्याच्या अंगी हे गुण नाहीत त्याना अत्यंत सूक्ष्म ब्रम्हस्वरूप पाहू म्हटले तरी पहाता येत नाही. (४४) परमार्थाच्या अनुभवामध्ये शिष्याची बुद्धीच तयार व्हावी लागते, अत्यंत सूक्ष्म बनावी लागते. अशी तयार बुद्धी ज्याच्या जवळ असते. त्यास मुक्तीच्या प्राप्तीसाठी अधिक वेळ लागत नाही. जो अनन्य होऊ शकतो त्यास ताबडतोप मोक्ष मिळतो.(४५) ज्याची बुद्धी सूक्ष्म आहे आणि जो अनन्य होऊ शकतो त्यास स्वस्वरूप साक्षात्कार होण्यास एक क्षण सुद्धा लागत नाही. अनन्य श्रद्धा असल्याशिवाय नुसती सूक्ष्म बुद्धी कामास येत नाही (४६)

                दशक आठवा समास सातवा ओवी संख्या १८ ते २८
पुष्कळ जन्म घेवून झाल्यानंतर मानव देहाची प्राप्ती होते. मानवाचा जन्म येवून जर आत्मज्ञान करून घेता आले नाही तर जीवनाला सदगती मिळत नाही. त्याचा जन्म-मरणाचा फेरा चुकत नाही. (१८) या जन्मात आत्मज्ञान न होता मृत्यू आला तर पुन्हा  गर्भवासामध्ये मानवदेह  मिळेल असे घडणे फारच विरळ असते. उलट त्या जीवाला खालच्या योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो. (१९) अनेक शास्त्रकारांनी त्यांच्या विविध शास्त्रात हीच गोष्ट अनेक प्रकारे निश्चयात्मक रीतीने सांगितली आहे, सारांश हा की या संसारामध्ये पुन्हा नरदेह मिळणे फारच कठीण आहे, (२०) पाप आणि पुण्य यांचे प्रमाण सम झाले म्हणजे मानवदेह प्राप्त होतो. ते प्रमाण सम नाही तो पर्यंत हा मानव देह मिळत नाही. असे  श्रीमद भागवतात महर्षी व्यासांचे वचन आहे. (२१) महर्षी व्यास म्हणतात   हा  आद्य मानव देह सुलभ आहे परंतु तसाच दुर्लभ आहे. चांगला संकल्प हा त्याचे सुकाणू आणि गुरु हा सुकाणू धरणारा कर्णधार आहे. भगवंताची अनुकूलता अथवा कृपा हाच वारा होय. त्या गतिमान वायुने ढकलले जाणारे हे जहाज आहे. अशी सर्व मदत असताना जो माणूस भवसागर तरुन  जात नाही तो आत्मघातकी होय. नरदेह दुर्लभ आहे हे उघडच आहे. परंतु देहबुद्धीने केलेल्या अल्प संकल्पाने कांही तरी वासना असल्याने त्याचा लाभ होतो. तो प्राप्त झाल्यावर सदगुरुना कर्णधार करावे. सदगुरु स्वतःसिद्ध नावाडी किंवा मार्ग दर्शक असतात. त्यांच्या वचनांना अनुसरून वागले तर सुखप्राप्ती होते. (२२) देवाची अनुकूलता ज्याला नाही तो प्राणी स्वतः पापी असतो. हा भवसागर त्याला तरुन  जाता येत नाही. म्हणून तो आत्मघातकी समजावा. (२३) ज्या प्राण्यास आत्मज्ञान नसते त्याला चौर्यांशी लक्ष वेळा जन्म घ्यावे लागतात आणि मरावे लागते. जितक्या वेळेस तो ज्ञानहीन मरतो तितक्या वेळा त्यास आत्महत्त्या घडते. म्हणून तो आत्मघातकी समजावा. (२४) मानव देह प्राप्त झाल्यावर सुद्धा जो आत्मज्ञान करून घेत नाही त्याची जन्म-मरण परंपरा कांही चुकत नाही. त्याला अत्यंत हलक्या योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो. (२५) अस्वल, माकड, कुत्रा, घोडा, बैल, रेडा, गाढव, मांजर,.सरडा, बेडूक, माशी (२६) इत्यादी अगदी हलक्या योनीमध्ये, आत्मज्ञान नसेल तर जन्म घ्यावा लागतो. असे असून सुद्धा मुर्ख माणसे पुढील जन्माची आशा बाळगतात. याला काय म्हणावे? (२७) सध्याचा मानव देह मृयू पावल्यावर पुन्हा तसाच मानव देह मिळेल असा भरवसा धरणाऱ्यास लाज कशी वाटत नाही?(२८)

                  दशक आठवा समास सातवा- ओवी ५७ आणि ५८

जन्म-मृत्युच्या कचाट्यातून जो सुटला त्यास मोक्ष मिळाला असे समजावे. तत्वांचा शोध घेता, घेता माणूस सदवस्तू म्हणजे ब्रम्ह अनुभवतो. (५७) आपण स्वतः प्रत्यक्ष परब्रम्ह आहोत, असा महावाक्यांचा खरा अर्थ आहे. साधू, संत, आपल्या मुखाने हा अर्थ समजाऊन सांगतात (५८)

         दशक ९ वा समास २ रा  ओवी संख्या ३३ आणि ३४
श्रीसमर्थ म्हणतात या दृश्य विश्वातील तत्वांचे विवरण करावे, निर्गुण ब्रह्माचा शोध घ्यावा, आपण कोण हे नीट पहावे, म्हणजे स्वरूप कसे ते कळू लागते. (३३) स्वरूपाविषयी बोलणे थांबवून त्याचे अखंड मनन करावे. मनन करता, करता त्यातच लीन होऊन जावे. अशा रीतीने स्वरूपाशी अनन्य झाल्यावर माणूस महापुरुष बनतो. त्या महापुरुषाला मौन फार शोभून दिसते. (३४)

                     दशक ११ वा समास २ रा ओवी क्रमांक ८
मनुष्याच्या मनावर मायेचे दाट आवरण असते, त्यामुळे त्यास संशय, कल्पना, भ्रम, वगैरे पछाडतात. या विश्वातील सगळा सचेतन, अचेतन, पसारा मायेतून बाहेर पडतो. तो अशाश्वत आहे, अमर्याद आहे. संशय येणे, कल्पना करीत सुटणे भ्रम होणे, या समस्त गोष्टी अशाश्वता मधील कष्टप्रद  घटना आहेत. शाश्वतामध्ये त्याना स्थान नाही.परंतु हे रहस्य माणसाला समजले मात्र पाहिजे.(८)

  
    दशक १८ वा समास ८ वा ओवी क्रमांक ६. ७. ८, ९, १०)

देव शोधायला जावे तर देवाचा पत्ता लागत नाही. क्षेत्रातील देव, प्रतिमा, अवतार, या सर्वांवर एका अंतरात्म्याची सत्ता चालते. तोच खरा कर्ता आणि भोक्ता आहे. विचाराने त्याचा शोध घ्यावा. माणसाच्या अंतर्यामी जी शुद्ध जाणीव असते तोच खरा देव होय. क्षेत्रातील देव पाषाणाचा केलेला असतो. तो कसा झाला याचा विचार केला तर त्याचे मूळ एखाद्या अवतारापर्यंत पोचते. (६) अवतारी देव तर संपले. ते देहात आले आणि मोठे कार्य करून गेले. ब्रम्हा, विष्णू, आणि महेश्वर हे तीन देव त्यांच्याहून थोर असल्याची कल्पना केली. (७) परंतु या तिन्ही देवांवर अंतरात्म्याची सत्ता चालते. खरे पाहिले तर तोच प्रत्यक्ष  कर्ता आहे. आणि भोक्ता आहे.(८) माणसाच्या अंतर्यामी  जी जाणीव असते तेच अंतरात्म्याचे स्वरूप होय. त्याची प्रचीती येण्यास माणूस अंतर्मुख पाहिजे. विवेकाने जो अंतर्यामी शोध घेत जातो, त्याला देव सापडतो. हा अंतरात्मा अनेक युगे तिन्ही लोक चालवीत आहे. वेदशास्त्रात असा निश्चयपूर्वक निर्णय केलेला आढळेल. (९) अंतरात्मा शरीर चालवितो. त्याचा शोध केला तर जाणीवेच्या रुपाने आणि विवेकाने तोच देव शरीर चालवितो, अशी प्रचीती येईल (१०)

                        दशक ९ वा समास ८ वा देहांत निरुपण  

   माणसाला जसा स्थूल देह असतो तसाच त्याला एक सूक्ष्म देह असतो. हा सूक्ष्म देह स्थूल देहाच्या आधाराने राहतो, त्याला व्यापून असतो. सूक्ष्म देह स्थूल देहाला चिकटून असतो. तोपर्यंत मनुष्य जिवंत असतो. सूक्ष्म देह स्थूल देहाच्या बाहेर पडून त्याच्याशी कायमचा संबंध सोडतो. त्यावेळी मनुष्य मृत्यू पावतो. त्वचा, स्नायू, रक्त, अस्थी, ग्रंथी, मज्जातंतू, नाड्या हे  स्थूल देहाचे घटक आहेत. प्राण, मन, अहंकार, वासना हे सूक्ष्म देहाचे घटक आहेत. या सर्व घटकात वासना सर्वात प्रधान घटक समजली जाते. त्यामुळे सूक्ष्म देहाला वासनात्मक देह असे अत्यंत सार्थ असे  दुसरे नांव आहे. वासना वायुरूप असतात. त्या इन्द्रियाना दिसून येत नाहीत. परंतु त्याच वासना जीवाला नवीन,नवीन जन्म घ्यावयास लावतात. उपनिषदात या संदर्भात एक श्लोक आहे. त्याचा अर्थ असा आहे मरणासन्न मनुष्याच्या हृदयाचे बाहेर जाण्याचे द्वार प्रकाशित होते. त्या प्रकाशाने जीव डोळ्यातून किंवा शरीराच्या इतर द्वारातून बाहेर निघतो. जीव किंवा सूक्ष्म देह  शरीर सोडून जाऊ लागला असता प्राण त्याच्या मागोमाग जातो. प्राणांच्या मागोमाग सारी इंद्रिये जातात त्यासमयी सूक्ष्म देह विज्ञानमय बनतो. त्याचे सर्व संस्कार एके ठिकाणी गोळा होतात. हे सगळे संस्कार घेऊन तो शरीर सोडतो.  आपले ज्ञान, कर्म. पूर्व प्रज्ञा सर्व बरोबर घेऊन तो निघून जातो.वासना जशी सात्विक, राजसी, किंवा तामसिक असेल त्याप्रमाणे त्याला पुढील जन्म प्राप्त होतो. अभ्यासाने सत्वगुणांचा  उत्कर्ष होऊन जीव वैराग्यसंपन्न झाला की वासना क्षय पावते आणि त्यास आत्मज्ञान प्राप्त होते. वासना क्षय पावली की पुन्हा जन्म येत नाही. आत्मज्ञान प्राप्त न होता मनुष्यास मृत्यू आला तर त्याची वासना शिल्लक राहते. अर्थात त्याला पुन्हा जन्म घेतल्याशिवाय गत्यंतर नसते. ज्ञानी मनुष्य आत्मज्ञानाच्या प्राप्तीमुळे जन्म-मरणाच्या चक्रातून सुटतो हे अगदी खरे आहे.परंतु अज्ञानी मनुष्याला जन्म कसा येतो? बद्ध मनुष्य मृत्यू पावल्यानंतर त्याचे काय उरते आणि ते त्यास पुन्हा जन्मास घालते. (१) या प्रश्नास उत्तर देताना श्री समर्थ म्हणतात वर,वर पाहिले तर बद्ध व्यक्ती मरण पावल्या नंतर त्याचे कांहीच उरत नाही मृत्यू अगोदर त्याची जाणीव सुद्धा संपूर्ण नाहीशी होते. (२) श्रोत्यानी अशी शंका काढली त्या शंकेचे निरसन ऐकावे. मनात व्यग्रता येवू देवू नये.(३) मनुष्याचा सूक्ष्म देह वासनात्मक असतो. वासना वायुरूप असते. ती दिसत नाही परंतु असते. स्थूल देह सुटला तरी वासना जशीच्या  तसी राहते. ती पुन्हा, पुन्हा, जन्म घ्यावयास लावते. ती जाणीवरूप असल्याने अगदी मुळमाये पर्यंत पोहोचते. पाचही प्राण शरीरातील आपले स्थान सोडतात. त्यावेळी वासना त्यांच्या मागोमाग जाते. कारण वासना प्राणरूप असते. मृत्युच्या वेळी वासना कालविलेला प्राण देह सोडून जातो.(४) प्राण वायुरूप असतो वायुबरोबर वासना देह सोडते. ती वायुरुपच शिल्लक राहते आणि मृत्युसमयी जसा हेतू असेल त्याप्रमाणे पुन्हा जन्म घेऊन येते. (५) कांही वेळा एखादा माणूस संपूर्णपणे मृत्युमुखी पडतो. त्याचा देह प्रेत होतो. परंतु पुन्हा त्याचा जीव देहात येतो. प्रेत म्हणून ढकलून दिल्यास त्याच्या हाता-पायांना आणि इतर अवयवाना मार लागतो. (६) एखाद्याला सर्पाच्या नजरेचे विष बाधते त्यामुळे तो मृत्युमुखी पडतो. परंतु तीन दिवसांनंतर मोठा मांत्रिक त्याचे विष उतरवितो आणि त्याला उठवितो. मृत्युसमयी देहातून बाहेर पडलेली वासना पुन्हा देहात येते. म्हणून तो जिवंत होऊन उठतो.(७) कांही माणसे प्राण निघून गेल्याने प्रेत होऊन पडतात, त्याना कांही लोक जिवंत करतात. म्हणजे यामालोकातून परत घेऊन येतात. (८) आपण ऐकतो की पूर्वी कांही ऋषी मुनींनी लोकाना शाप दिले होते, त्यामुळे त्याना नवीन देह घ्यावे लागले. परंतु उ:शापाच्या योगाने योग्य काळी ते पुन्हा पहिल्या देहात परत आले. (९) कांही लोकांनी पुष्कळ जन्म घेतले. कांही लोकांनी परकाया प्रवेश केला. अशा रीतीने कितीतरी लोक जन्मास आले आणि मृत्यू पावले. (१०)मूलतः वायू स्तब्ध असतो, फुंकले की त्यास गती मिळते, तो हालचाल करू लागला की प्राण निर्माण होतो. प्राण वासानारूप असतो आणि वासना जन्म  घ्यावयास लावते. (११) मूळ वासना अतिसूक्ष्म असते पहायला गेले तर ती आढळत नाही. परंतु ती असते यात शंका नाही. आपल्या मनामध्ये ज्या अनेक वृत्ती निर्माण होतात त्यांचे मूळ वासनेत असते. वासनेतून वृत्ती निर्माण होतात आणि वृत्तीमधून वासना पोसली जाते. (१२) देहबुद्धीमध्ये वावरणारी जाणीव हेतुसहित असते. अमुक हवे, अमुक नको असे वाटणे हे जाणिवेचे स्वरूप असते. हे स्वरूप म्हणजेच वासना होय. पिंडामध्ये असलेल्या जाणीवेचा संबंध अगदी मूळमाये पर्यंत पोहोचतो. जाणीवेचा तंतू मूळ मायेमध्ये पंच महाभूते आणि तीन गुण याच्याबरोबर मिसळलेला असतो. मूळ मायेमध्ये मी ब्रम्ह आहे असे जाणिवेचे अत्यंत शुद्ध, निर्मळ अनंत अपार आणि निश्चल स्वरूप आहे. त्या ज्ञानमय  स्वरूपाला पुरुष, इश्वरकिंवा शिव  असे म्हणतात. परंतु त्याच बरोबर मूळ मायेमध्ये गुण मायेचे अधिष्ठान आहे. हे वायुरूप किंवा शक्तिरूप आहे. त्यास प्रकृती माया अथवा शक्ती असे म्हणतात. वायू आणि जाणीव प्रकृती आणि पुरुष शिव आणि शक्ती मिळून मूळ माया असते. ईश्वराचा जसा सत्य संकल्प तशी, जीवाची वासना समजावी. वासना प्राणरूपी असते. प्राण वायुपुत्र म्हणून वायुरूप असतो आणि मूळ मायेमध्ये वायू  जाणीवे सहित असतो. अर्थात वासना जाणीवयुक्त असते. याच कारणाने जाणीवेचा धागा अगदी मूळ मायेपर्यंत पोहोचतो. (१३) ब्रम्हांडामध्ये असणारी जाणीव कारणरूप आहे. पिंडामध्ये  ती कार्यरुपाने  वावरते. तिचे रूप आकलन होण्यास वेळ लागतो. ईश्वराने विश्व निर्माण करण्याचा संकल्प केला तो बीजरूप असल्याने समस्त दृश्य घटनांचे मूळ कारण आहे. त्या संकल्पामध्ये जे,जे गुप्त आणि सुप्त आहे ते ते सगळे दृश्य रूप घेऊन जगात प्रकट होते. म्हणून दृश्य घटना या कार्यरूप आहेत. त्या कारणरूप जाणीवेचे अथवा संकल्पाचे आकलन होण्यासाठी आपली बुद्धी अत्यंत  सूक्ष्म असावी लागते (१४) वासना वायुसारखी सूक्ष्म आहे, म्हणजे देव सुद्धा वायुरूप आहेत. पंचभूतात्मक सृष्टीचाच ते एक भाग आहेत. (१५) वायूमध्ये कितीतरी प्रकार होतात. असे असूनही तो दिसत नाही. त्याच प्रमाणे जाणीवरूप वासना अतिसूक्ष्म आहे तिच्यामध्ये नाना प्रकारचे बदल होतात परंतु ती दिसत नाही. (१६) तीन गुण आणि पंच महाभूते अशी ही आठ तत्वे  वायू मध्ये मिसळलेली आहेत. परंतु त्यांची कल्पना येत नाही. म्हणून ते तसे नाहीत असे मानू नये. (१७)  वारा सहज वाहिला तर त्यामुळे सुगंध आणि दुर्गंध कळून येतो, गरम पदार्थ थंड होतात. उष्णतेने तापलेले प्राणी निवतात, थंड होतात. असा प्रत्यक्ष अनुभव  येतो. (१८) वायुने ढग हालचाल करतात आणि पावसाचा वर्षाव करतात. वायुने नक्षत्रे फिरतात. विश्वामध्ये सगळीकडे वायुमुळे गती मिळते. अशा रीतीने विश्वामध्ये वायू सर्व कार्य करतो भुते, दैवते किंवा हलक्या देवता वायुरूप असतात. त्या एका एकी अंगात संचारत मंत्र-तंत्राचे कांही प्रकार केले असता प्रेते सुद्धा जिवंत होतात. (२०) राहाणे म्हणजे मंत्र वापरून अंगात देवतेचा संचार करणे. अशा  प्रकारच्या संचाराने ब्रम्ह समंधास काढून टाकता येते. जमिनीत पुरून ठेवलेले धन शोधून काढता येते. तसेच अनेक संकटात सापडलेल्या लोकाना त्यातून मुक्त करता येते. (२१)अंगात संचारणारे वारे देहाशिवाय बोलू शकत नाही. ते कोणत्यातरी देहात संचार करून प्रकट होते. अशा प्रकारची वासना घेऊन कित्येक जीव जन्मास येतात. (२२) वायूचे असे हे प्रकार आहेत. सागण्याचे तात्पर्य असे की वायुचा विस्तार कळणे  अति कठीण आहे. समस्त  चराचर विश्वामधील सर्व व्यवहार वायुमुलेच चालतात. (२३)  वायूचे जे स्थिर रूप आहे ते विश्व धारण करते आणि टिकविते. वायूचे जे गतिमान रूप आहे विश्व निर्मिती करते. श्री समर्थ पुढे म्हणतात श्रोत्यानो माझे हे म्हणणे कळत नसेल तर सखोल विचार करावा म्हणजे ते समजेल.(२४) विश्वाच्या  आरंभा पासून ते अंता पर्यंत सगळे कांही वायू घडवून आणतो. तेथे वायुशिवाय अन्य कोणाचे कतृत्व आहे ते शहाण्या माणसाने दाखउन द्यावे (२५) श्री समर्थ वायू हा शब्द शक्ती या अर्थाने वापरतात. मूळमाया जाणीवरूप आहे. स्वस्वरूप हे जाणिवेचे खरे मूळकारण आहे. तेथे ती सहज जाते. स्वरूपी लीन असणारी जाणीव स्तब्ध असते. विश्वामध्ये  गतिमान होऊन ती कर्तृत्व गाजाविते. कोठे प्रगटपणे तर कोठे अप्रगटपणे  तिचे कार्य चालू असते.(२६) ज्या प्रमाणे पाणी जमिनीतून उफाळून येते, कधी आटून जाते. आटल्यानंतर कांही दिवसांनी पुन्हा तो प्रवाह जमिनीवर जोराने वाहू लागतो.त्याच प्रमाणे जाणीव कोठे गुप्त तर कोठे प्रगटपणे दिसते, तर कोठे प्रगट असलेली गुप्त होते. (२७)  वायूमध्ये असलेल्या जाणीवेचा प्रकार असाच आहे. कोठे  ती प्रगटपणे दिसते तर कोठे ती गुप्त होते. कोठे तिच्यात बदल घडून आलेला दिसतो तर कोठे वायू नुसताच कार्य करतो. (२८)  वारे अंगावरून गेल्याने हात-पाय सुकतात. वारा अति जोरात वाहिल्याने कित्येक वेळा चांगली भरत आलेली पिके करपून जातात. (२९) अनेक प्रकारच्या वायुमुळे  अनेक प्रकारचे रोग होतात. पृथ्वी वरील लोकाना त्याच्यापासून पीडा होते. वायुमुळेच वीज कडाडते. (३०) वायुमुळेच गायनातील अनेक राग गाता येतात. वायुमुळेच श्रोत्याना राग निश्चितपणे कळतो. दीप रागाने दिवे लागणे मेघमल्हार रागाने पाउस पडणे हे रागाचे चमत्कार वायुमुळेच घडतात(३१) वायू फुंकल्याने माणसाना भुरळ पडते. वायू फुंकल्याने अंगावरील गळवे कोरडे पडतात. वायुमुळेच अनेक प्रकारचे मंत्र परिणाम करतात. (३२) मंत्राने देवता प्रकट होतात. मंत्राने भुते समोर आणता येतात. एक वस्तू बदलून दुसरी वस्तू करणे, निरनिराळी रूपे घेवून लोकाना चकित करणे अशा जादूच्या करामती मंत्र सामर्थ्याने करता येतात. (३३) देवादिकांना सुद्धा न कळणारी राक्षसाची मायामय रचना मंत्रांच्या सहायाने करता येते. एखाद्यास एकाच ठिकाणी  खिळवून  टाकणे किंवा त्याला भुरळ पाडणे, माणसाला संपूर्णपणे वश करून घेणे अशा प्रकारचे विचित्र सामर्थ्य मंत्रांच्या ठिकाणी असते, (३४) चागल्या धडधाकट मनुष्यास वेडे करावे आणि वेड्या माणसाला नीट करावे असे वायूचे (मंत्रांचे) अनेक विकार आहेत. ते सांगावे तितके कमीच आहेत (३५) मंत्रांच्या सहायाने देवांच्या लढाया चालतात. ऋषींचा दरारा त्यांच्या मंत्र सामर्थ्यावर अवलंबून असतो. मंत्र सामर्थ्याचा महिमा कोणासही संपूर्णपणे सांगता येत नाही. मंत्रांनी पक्षी ताब्यात ठेवता येतात. मंत्राने धनलाभ करून घेता येतो. (३६,३७) आता हा विषय पुरे श्रोत्यांच्या प्रश्नाला उत्तर दिले. बद्धाला जन्म कसा येतो याचे श्रोत्याना उत्तर मिळाले. (३८)
        || इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे देहांत निरुपण नाम समास आठवा ||

                      दशक १२वा समास ३रा भक्त निरुपण
मनुष्याने आपल्या जीवनात इहलोक आणि परलोक  किंवा प्रपंच आणि परमार्थ दोन्हीचा विचार करणे योग्य आहे. प्रपंच नीट होण्यासाठी त्याने जाणत्याची संगती धरावी आणि परमार्थ उत्तम होण्यासाठी त्याने सदगुरुंची शरणागती पत्करावी.  देव कोण आणि मी कोण हे दोन प्रश्न सदगुरुना अनन्यपणे विचारावे. संपूर्ण शाश्वत असलेले परब्रम्ह ओळखणे हेच परमार्थाचे खरे रहस्य असल्याने त्याचा अनुभव यावा म्हणून सारासार विचार करावा. हा विचार केला तर असे आढळते की  या विश्वात दृश्य आणि अदृश्य असे दोन पदार्थ आहेत. सर्व जड पदार्थ दृश्य असतात. परंतु अदृष्यामध्ये चंचळ आणि निश्चळ  असे दोन प्रकारचे पदार्थ आहेत. या पैकी जड आणि चंचळ पदार्थ मायिक असल्याने अशाश्वत असतात आणि निश्चळ वस्तू म्हणजे परब्रम्ह तेव्हढे शाश्वत असते. विवेकाने त्रैलोक्य हिंडावे आणि शाश्वत आणि अशाश्वत यांचा निवाडा करावा. शाश्वत निर्विकारी परब्रह्मामध्ये विकार निर्माण होऊन मूळमाया आणि अंतरात्मा उदय  पावले. त्यापासून पिंड-ब्रम्हांडाचे आठ देह होऊन सगळे विश्व दिसू लागले. विवेकाने मायिक आहे ते खंडावे आणि परब्रम्ह धुंडून काढावे. अशा रीतीने शाश्वत देव कळल्यावर मी कोण याचा शोध घ्यावा. या मी चा शोध अंतरंगात घ्यावयाचा असतो. त्याचा शोध घेऊ लागले असता खोटा मी पणा गळून जातो.  आपण केवळ आत्मा आहोत असा अनुभव येतो. खोटा मीपणा गळाला की वेगळेपण जाते आणि वृत्तीची निवृत्ती होऊन उन्मनी अवस्था साधते. या अवस्थेत ज्ञानाचे विज्ञान होते. ध्यानाचे ध्येय बनते, सगळे पाप विलयास जाऊन जन्माचे सार्थक होते.  या पदाना पोहोचलेले भगवंतांचे दासच इतर लोकाना तारतात.
या जगात पुष्कळ माणसे आहेत. त्या सर्वानी विवेकपूर्ण  वागावे. इहलोक आणि परलोक दोन्हीचा विचार करावा. (१) या विश्वात यश मिळविण्यासाठी जाणत्यांची संगती धरावी. परमार्थात यश येण्यासाठी सदगुरु आवश्यक असतात. (२) सदगुरुना काय विचारावे हे अनेकांना कळत नाही. सदगुरुंशी अनन्य होऊन अगदी मनापासून  पुढील दोन गोष्टी त्याना विचाराव्या. (३) त्या दोन गोष्टी अशा आहेत (अ) देव कोण (आ) आपण किंवा मी कोण? विवेकाने या गोष्टींचे वारंवार मनन करावे.(४) प्रथम देव तो कोणता? आणि नंतर आपण, मी कोण आहे हे दोन प्रश्न आहेत. यांची उत्तरे शोधण्यासाठी पंचीकरण आणि महावाक्यांचा विचार वारंवार करावा. (५)शाश्वत आणि निश्चळ  परब्रम्ह ओळखावे. हेच सर्व परमार्थ केल्याचे फळ आहे. केवळ शुद्ध मी कोण आहे याचाही शोध घ्यावा (६) शाश्वत काय आणि अशाश्वत काय याचा सूक्ष्म विचार केला तर, असे प्रत्ययास येते की या दृश्या विश्वात निश्चल, चंचल, आणि जड असा विविध भेद आढळतो. परंतु हा सारा  मायेचा पसारा आहे. शाश्वत ब्रम्हवस्तू याच्या पलीकडे राहते. (८) परब्रम्ह धुंडून काढावे त्यासाठी विवेकाच्या बळावर त्रैलोक्य हिंडून यावे आणि जे मायानिर्मित आहे ते विचाराने बाजूस सारावे हेच सुज्ञ परिक्षावन्ताचे कार्य समजावे. (९) जो खरी परिक्षा करणारा आहे त्याने खरे, खरे तपासावे. खोटे बाजूस सारून खरे तेव्हढे स्वीकारावे. मायेने निर्माण केलेले सर्व पदार्थ दिसण्यास खरे दिसले तरी ते खरे नाहीत हे पक्के समजावे.(१०) मायेचा पसारा पंच महाभूतानि  भरलेला आहे. पांचभौतिक वस्तू समस्त नाशवंत असतात. या दृष्टीने पिंड, ब्रम्हांड आणि त्याचे आठ देह सारे नाशवंत आहे, (११) जे, जे इन्द्रियाना  दिसते ते सर्व नाश पावते. जे,जे जन्म घेते ते ते याथासमयी मरण पावते. जे,जे बनविलेले असते ते,ते सारे कालांतराने मोडते. असे हे मायेचे स्वरूप आहे. (१२) देह धारण करणारे प्राणी कालांतराने नाश पावतात. हे तर प्रत्यक्ष अनुभवास येते, मनुष्याशिवाय मनुष्य उत्पन्न होत नाही. वीर्यावाचून  उत्पत्ती होत नाही.(१३) जे ,जे वाढते ते सारे मोडते जे,जे येते ते सारे जाते. कल्पन्ताच्या शेवटी एक महाभूत अन्य महाभूतास  गिळून टाकते.(१४)अन्नावाचून वीर्य उत्पन्न होत नाही, वनस्पतीवाचून अन्न निर्माण होत नाही. पृथ्वीवाचून वनस्पती निर्माण होत नाहीत. (१५) पाणी नाही तर पृथ्वी नाही, तेज नाही तर पाणी नाही. वायू नाही तर तेज नाही असा क्रम जाणावा. (१६) अंतरात्मा नसेल तर वायू उत्पन्न होउ शकत नाही. मुळमायेचा विकार  नसेल तर अंतरात्मा असत नाही परंतु, निर्विकार परब्राम्हात दिसणारा विकार खरा आहे काय? याचा नीट विचार करावा.(१७) निर्विकार परब्रह्मामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू. अंतरात्मा आणि मूळमाया यापैकी एकही आढळत नाही. (१८) निर्गुण निराकार वस्तू हीच शाश्वताची खूण आहे. अष्टधा प्रकृती संपूर्णपणे नाशवंत आहे.(१९)  सगळे दृश्य नाशवंत आहे हे ओळखून राहिले पाहिजे. ते असून नसल्या सारखे होते. सारासार विचाराने समाधान काय आहे ते बरोबर आकलन होते.(२०) शाश्वत शोधून काढण्यासाठी विचार करू लागल्यावर, सार कोणते आणि असार कोणते याचा मनात निश्चय होतो. हा निश्चय झाला की आत्मानात्म विचार बलवान होतो. विचार करण्याने विचार करण्याचे सामर्थ्य वाढत जाते. विचारात सूक्ष्मात शिरण्याची शक्ती येते. विचार ज्या प्रमाणात सूक्ष्म बनतो त्या प्रमाणात तो अशाश्वताचे  कवच भेदून शाश्वता पर्यंत पोहोचतो. तेथे तो नाहीसा होऊन सदवस्तु दर्शन होते. (२१) देव शाश्वत आहे, निर्गुण आहे, अशी खूण स्वानुभवाने पटली, देव कोण ते कळले. आता मी कोण ते कळणे आवश्यक आहे. (२२) मी कोण याचा शोध  घेता,घेता मी शुद्ध निर्मळ  निरुपाधिक आत्मा आहे असा अनुभव येतो. मी कोण हे कळावयास हवे असेल तर देहामधील तत्वे शोधली पाहिजेत. ती शोधून पाहिली तर असे समजते की मनात उत्पन्न होत   असलेल्या  वृत्तीमध्ये मी, तू पणाचे मूळ आहे. (२३) स्थूल, सूक्ष्म आणि कारण या सर्व देहांचा शोध घेतला तर हा खोटा मी पणा कोठे दिसत नाही. त्या शोधामध्ये सारे मी ,तू; पण पंचतत्वांमध्ये विलीन होते.(२४) त्याच शोधात दृश्य पदार्थ मीथ्यापणाने बाजूस सरतात. एक तत्व दुसऱ्यामध्ये लय पावते. या ठिकाणी मी तू पण उरण्यास जागाच रहात नाही.  केवळ ब्रम्हवस्तू तेव्हढी शिल्लक राहते. (२५) पंचीकरण काय, तत्वविवरण काय, महावाक्य चिंतन काय, या सर्वांचा भावार्थ असा आहे की आपण परमार्थ स्वरूप आहोत. तसा अनुभव येण्यासाठी आपण अनासक्त होऊन आत्मवस्तुशी  तदाकार झाले पाहिजे. (२६) तात्पर्य असे की देव आणि भक्त यांचे मूळ शोधून पाहिले तर सर्व उपाधी रहित असा केवळ आत्मा शिल्लक उरतो. (२७) अशा प्रकारे मी पण नाहीसे झाले , आत्मानात्म विवेकाने वेगळेपण नाहीसे झाले, म्हणजे वृत्ती रहित अवस्था येऊन उन्मनिपद प्राप्त होते. (२८) ज्ञानाचे रुपांतर विज्ञानात होते. ध्यान ध्येयमय बनते, कार्यकारण भावामध्ये अंतर्भूत होणारे सारे द्वैतमय दृश्य बाजूस सारले जाते. (२९) जन्म-मरणाचे चक्र संपते. सर्व पाप विलयास जाते. यमयातनांच्या  तावडीतून सुटका होते. (३०) सर्व प्रकारची बंधने शिथिल होतात, ब्रम्ह विचाराने मोक्ष प्राप्त होतो. जन्माचे संपूर्ण सार्थक झाले असे वाटते. (३१) नाना प्रकारचे संशय नाहीसे होतात. सर्व संकटे नाहीशी होतात. अशा रीतीने आत्मज्ञान आणि आत्मानात्म विवेक यांच्या सहायाने अनेक लोक पावन झाले, (३२) पतिताना पावन करणार्या परमात्म्याचे दास सुद्धा या विश्वाला पावन करतात. असा प्रत्यक्ष अनुभव अनेक लोकाना आला आहे. (३३)
         || इति  श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे भक्त निपुपण नाम समास ३रा ||

                        दशक १५ समास १५- ओवी क्रमांक १५
खरे विचारवंत महावाक्यांचा विचार करून नि:संग बनतात. परब्रम्ह अंतरी  ठसल्यावर माया विलीन होते. अद्वैतानुभवाची अवस्था, मन, बुद्धी, शब्द, कल्पना या सर्वांच्या पलीकडे असते. जो संन्यासी आहे त्यालाच महावाक्यांचा विचार करण्याचा अधिकार आहे. ईश्वरी कृपा ज्याच्यावर असते असा भाग्यवान पुरुष सुद्धा महावाक्यांचा विचार करू शकतो. (१५)

                     दशक १६ =समास ७- ओवी क्रमांक १ आणि २  
श्री समर्थ म्हणतात एक परब्रम्ह तेव्हढे निश्चळ  आहे. बाकीचे सर्व चंचळ म्हणजे विकारी, बदलणारे आहे. निश्चळामध्ये बदलण्याच्या क्रियेचा जो आरंभ झाला तो प्रथम स्फुरणाने झाला. तो स्फुरणरूप संकल्प हेच अंतरात्म्याचे शुद्धस्वरूप होय. सर्वात ज्येष्ठ भूत म्हणून या स्फुरणास महदभूत असे म्हणतात. भूत याचा अर्थ झालेला असा आहे. पृथ्वीचे मूळ पाणी, पाण्याचे मूळ अग्नी, अग्नीचे मूळ वायू, हे पूर्वी सांगितले आहे. आता वायूचे मूळ ऐका. अंतरात्मा हे वायूचे मूळ आहे. सर्व सगुणामध्ये तो चंचळ आहे. अंतरात्मा येतो आणि जातो, परंतु तो दिसत नाही. तो कधीही स्थिर होऊन बसत नाही. वेद,श्रुतीना त्याच्या रुपाची कल्पना करता येत नाही. मूळ परब्रह्मामध्ये अगदी पहिले जे स्फुरण झाले तेच अंतरात्म्याचे लक्षण होय. तोच जगदीश्वर असून त्याच्यापासून पुढे तीन गुण झाले. या तीन गुणांपासून पंच महाभूते झाली आणि पुढे त्याना व्यक्त दशा प्राप्त झाली. सर्व भूतामध्ये परम श्रेष्ठ असणारा अंतरात्मा पिंड-ब्रम्हांडाचा सारा कारभार घडवून आणतो. विश्वाला जीवन देणारे चैतन्य म्हणजे अंतरात्मा होय. मानवी जीवनात जे,जे अनुभवास येते, ज्या,ज्या कांही खटपटी होतात त्यांची प्रेरणा अतरात्म्यातूनच यते, (१,२)
                        दशक १६वा समास १०वा ओवी ९वि
ज्या भूतांचे जे वर्म असते ते अन्य भूतांच्या वर्माने सौम्य होते, मंदावते. म्हणून तर दृश्याचा एव्हढा मोठा पसारा वाढला. याच युक्तीने प्राणीमात्रांचे देह तयार झाले उदा. अग्नीने उष्णता निर्माण केली तर पाण्याने ती सौम्य केली. पाण्याने निर्माण केलेला गारवा सूर्याने कमी केला. परस्परांच्या अशा समतोल गुणधार्मानी जिवंत पिंड तयार होतो. जिकडे तिकडे नुसता गाराठाच असता तर सर्व प्राणीमात्र मरून गेले असते. तसेच नुसती उष्णताच असती तर सर्व कांही करपून गेले असते. (९,१०)

                    दशक १७ वा समास १ ला ओवी २५,२६,२७.
प्रपंच आणि परमार्थ दोन्ही साधण्यामध्ये मानवी जीवनाचे सार्थक आहे. अंतरात्म्याचे सतत अनुसंधान असलेल्या  चिंतनशील माणसापाशी (साधाकाजवळ) परमात्मा सदैव राहतो.  असा पुरुषच योगी होय. त्याने अनेकांना भगवंताच्या मार्गास लावावे. स्थूल आणि सूक्ष्म तत्वांचा शोध घेऊन आत्मप्रचीती घेणारी माणसे थोडीच असतात आपण सत्संगामध्ये सत शास्त्राचे श्रवण करावे आणि अंतरात्म्याचे अखंड चिंतन करून संगत्याग साधावा. जो स्थूल आणि सूक्ष्म तत्वांचा संपूर्ण शोध घेतो आणि पिंड व ब्रम्हांड यांचे बरोबर विवरण करतो त्याला आत्मप्रचीती येते. परंतु जगात अशी माणसे थोडी असतात. (२५) ही माणसे वेदान्तामधील संपूर्ण पंचीकरण, अखंड विवरित असतात. त्याच प्रमाणे आपल्या अंत:करणात महावाक्यांचे रहस्य शोधतात (२६) जगात अशी जी माणसे आहेत त्यांची संगती लाभणे खरोखरी धन्य होय. त्यांच्याकडून परमार्थ नुसता श्रवण करूनच सामान्य लोकाना उत्तम गती प्राप्त होते.(२७)

              दशक १७वा समास-२ रा ओवी ६. ७      
शुद्ध ब्रह्मस्वरूप अत्यंत भेदरहित आणि निश्चल आहे. त्याच्या ठिकाणी संकल्प स्फुरतो तो शिवशक्ती रूप असून त्याच्या मध्ये असलेल्या  गुप्त गोष्टी पुढे प्रगट होतात. अशा त्या निश्चल ब्रह्मामध्ये स्वतःचे स्मरण स्फुरते. ते चितस्वरूप आहे अशी कल्पना केली, त्या मुळ संकल्पात गुणांचा समतोलपणा असल्याने गुणसाम्य असते. (६) आकाशात ज्याप्रमाणे अभ्र येते आणि आकाश झाकते, त्याच प्रमाणे ब्रम्हामध्ये स्मरणरूप महामाया उत्पन्न झाली. ती निर्माण होण्यास आणि लयास जाण्यास वेळ लागत नाही.(७)

           दशक १५ वा समास ३ रा श्रेष्ठअंतरात्मा निरुपण
सर्व विश्वामध्ये पंच महाभूतांचा पसारा असला तरी त्यामध्ये अंतरात्मा ओवलेला असतो. तो तत्वांच्यापैकी असला तरी त्यांच्या सत्तेने सर्व कांही घडून येते. ज्यांच्या ठिकाणी अंतरात्म्याची जाणीव फार मोठ्या प्रमाणात प्रकट होते त्याना अवतारी पुरुष असे म्हणतात. या दृश्य विश्वामध्ये पंचभूतांच्या मिश्रणा पासून झालेला भरमसाट पसारा दिसतो. त्याचे मूळ अगदी मूळमायेमध्ये आहे. परंतु या सगळ्या विस्तारा मध्ये  साक्षी पणाने अथवा दृष्टे पणाने रहात असलेल्या  अंतरात्म्याचा अखंड तंतू आहे. अर्थात अंतरात्मा तत्वांपैकीच एक आहे. (१) एखादा राजा उंच सिंहासनावर बसतो, त्याच्या दोन्ही बाजूस सैन्य दाटीवाटीने उभे असते. त्याच प्रमाणे या जगात आढळणारी तत्वे फौजे सारखी आहेत, त्याच्यामधील साक्षी अंतरात्मा राजासारखा आहे. याचा विचार मनात करून ते समजून घ्यावे. (२) सैनिकांचा देह जसा हाडामासांचा बनलेला असतो,  तसाच राजाचा सुद्धा देह हाडांमासांचाच बनलेला असतो.त्याच प्रमाणे पंचभूतात्मक जगत आणि त्याचा साक्षी अंतरात्मा दोन्ही तत्वरूप आहेत (३) राजाच्या सत्तेने सैन्य चालते परंतु राजा आणि त्याचे सैनिक दोन्ही पंचभूतात्मक असतात. फरक इतकाच की राजाच्या ठिकाणी सत्तेचे अधिष्ठान अधिक असते, अंतरात्म्याच्या ठिकाणी मुळातच जाणिवेचे अधिष्ठान अधिक असते. या कारणाने तो दृष्टा साक्षी बनतो. विश्व नाहीसे झाले की साक्षीपण संपते. या दृष्टीने दृष्टेपण तात्पुरते आहे.(४) मी देह नसून आत्माच आहे या विवेकाने जे अतिविशाल झाले त्याना अवतारी पुरुष असे म्हणतात. याच नात्याने महाराज मनू चक्रवर्ती झाले. (५) ज्याच्या ठिकाणी अतिविशाल जाणीव असते तो तितका भाग्यवान असतो. ज्याच्या ठिकाणी अल्प जाणीव असते ते लोक दुर्दैवी असतात. (६) जी माणसे व्याप वाढवितात, खटाटोप करतात, जीवनातील धक्के आणि भार सोसतात ती माणसे पहाता, पहाता भाग्यवान होतात. (७) मानवी जीवन आजसुद्धा असेच आहे. परंतु मुर्ख लोकाना ते कळत नाही.जो विवेकी आहे त्याला मात्र हे चांगले समजते. जगातील खरे थोरपण आणि लघुपण माणसाच्या विवेकशक्ती मध्ये असते. परंतु सामान्य लोकाना  हे कळत नाही. जो अगोदर जन्मास हेतो त्यास लोक थोर म्हणतात.(८,९) राजा वयाने लहान असला तरी वृद्ध त्याला नमस्कार करतात. विवेक शक्ती अशी विचित्रपणे काम करते हे कळणे आवश्यक आहे. (१०)  सामान्य  लोकांचे ज्ञान हे सर्व अनुमानांवर आधारलेले असते. संप्रदाय दिक्षा आणि लोकपरंपरा दोन्ही अनुमानांवरच चालतात.(११) परंतु हे खरे नाही असे किती लोकाना सांगावे? सामान्य जनतेला त्यातील फारसे कांही कळत नाही. आणि सामान्य लोकांचीच संख्या अधिक  असल्याने कोणा,कोणाला सांगत बसायचे त्याला अंतच नाही.(१२)  आपल्या पेक्षा वयाने लहान माणूस भाग्याला चढला तर लोक त्याला तुच्छ लेखतात. त्याचा मत्सर करतात. त्याला महत्व देत नाहीत. म्हणून आपल्याशी सलगी करू इच्छित  आणि सलगी असलेल्या माणसाना दूर ठेवावे. (१३) बोललेल्या शब्दांचा अर्थ ज्याना निश्चितपणे कळत नाही. त्याना राजकारण योग्यपणे करता येत नाही असे कांही लोक मुर्खपणाने उगीच आपले मोठेपण मिरवितात. (१४) ज्या माणसाला निश्चितपणे कांहीच कळत नाही, ज्याला खरे कोणी मानीत नाही, असा माणूस केवळ आधी जन्मला म्हणून वडील बनतो. त्या वडील पणाला कोणी विचारीत नाही. (१५)  वयाने लहान परंतु ज्ञानी माणसाने कांही सांगितले तर वृद्ध माणसे म्हणतात आता वडिलांचे वडीलपण उरले नाही. लहानांनी लहानपण सोडले. असे जे बोलतात त्याना शहाणपण नसते. (१६) गुणावाचून वडिलपण येते असे मानणे हेच खोटे आहे. खर्या थोरपणा वरून याची प्रचीती येते. गुणावाचून खरे थोरपण असू शकत नाही. असा अनुभव येतो.(१७) हे जरी खरे असले तरी वयाने वडील असलेल्यांना मान द्यावा. त्यानी सुद्धा आपले वडिलपण खरे नाही हे समजून वागावे. असे केले नाही तर आपल्या वृधापकाळी आपणास त्रास होईल (१८) हे सगळे सांगण्याचा इत्यर्थ असा की अंतरात्मा खरा वडील आहे. तो ज्याच्या अंत:करणात जागा झाला तेथे मोठेपण येते. ही गोष्ट उघड आहे. ती सांगितल्या बद्दल माझ्याकडे दोष नाही. (१९) म्हणून माणसाने विवेकाच्या बळावर शहाणपण शिकावे जो माणूस विवेक करण्यास शिकत नाही त्याला समाजात कांही महत्व उरत नाही. (२०) ज्या माणसाची लोकांमध्ये कांही किमत उरत नाही. त्याचा जन्म फुकटच गेला. असा मनुष्य आपणहून आपणास हीन दशा प्राप्त करून घेतो. (२१) सगळ्या स्त्रीयासुद्धा त्याला वाटेल तशी नांवे ठेऊ लागतात. तो अडगळीत जाऊन पडला असे म्हणतात. अशाप्रकारे मुर्खपणा पदरात पडतो. (२२) माणसाने असे करू नये. आपल्या जीवनाचे सार्थक करून घ्यावे. ते कळत नसेल तर ग्रंथांचा अभ्यास करून त्यातून शिकावे. (२३) सुज्ञ माणसाला लोक आपणहून बोलावतात. मुर्ख लोकाना  बाजूला सारतात. ज्याला संपत्ती आवडते आणि हवी असेल त्याने शहाणे व्हावे. (२४) अहो हे शहाणपण शिकण्यासाठी पुष्कळाचे कष्ट करावे लागतात. हे खरे परंतु  कष्ट करून शहाणपण शिकावे. कारण त्यासारखी उत्तमात उत्तम गोष्ट अन्य नाही. (२५)  जो खूप लोकाना मान्य होतो तो शहाणा झाला असे समजावे. शहाण्या लोकाना कांहीच कमी पडत नाही.(२६) जो मनुष्य आपले हित करून घेत नाही तो आत्मघातकी समजावा. त्याच्याइतका पापी कोणी नाही. (२७) तुम्ही श्रोते फार तत्पर आहात. तुम्ही अलक्षाकडे  लक्ष लावता. परमार्थ स्वरूपाचे ध्यान करता. मी जे सांगितले ते हे अगदी सामान्य आहे, दृश्यामधील  आहे.(२८)                     
          ||इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे श्रेष्ठ अंतरात्मा निरुपण नाम समास३रा||

                       दशक १४वा समास ९वा शाश्वत निरुपण

साधकाने आत्मानात्म विवेक करून जीवाचे कौतुक पहावे. मी आत्माच आहे  असा प्रत्यक्ष अनुभव त्याच्यात येतो. मग सारासार विचाराने ब्रम्हांड रचनेचे कौतुक पहावे. त्यात नाशवंत असार निघून जाते आणि शाश्वत सार तितके  उरते. तेच परब्रम्ह होय. अंतरात्मा सगुण आहे तोच देव समजावा. त्याचे ज्ञान झाले की साधक नंतर  निर्गुणापर्यंत पोहोचतो. निर्गुणाच्या साक्षात्काराने ज्ञानाचे विज्ञान  होते. अज्ञान, विपरीत ज्ञान आणि ज्ञान या तिन्हीचा लोप होतो. तेव्हांच विज्ञान उदय पावते. निरंतर निर्विकारपणे असणारे ब्रम्ह ज्ञानदृष्टीने पहावे आणि त्याच्याशी अनन्य व्हावे. अशा अनन्यतेला आत्मनिवेदन असे म्हणतात. मायेची भीड न धरता जे भ्रमरूप आहे ते सारे बाजूस सारावे म्हणजे परब्रह पावते.
आपण जीवाचे कौतुक पाहिले. आत्मानात्म विवेकाने पिंडरचना शोधून पाहिली. त्यात असे प्रत्ययास आले की देह अनात्मा आहे आणि आत्मा एक आहे. तोच सर्व कार्यकर्ता आहे..(१) मी आत्माच आहे असे वेदांत शास्त्र सांगते. विवेकाने त्याचा अनुभव घ्यावा. आता ब्रम्हांड रचना समजाऊन घेणे आवश्यक आहे.(२) पिंडाची रचना समजण्यास आत्मानात्म विवेक लागतो. तसेच ब्रम्हांड रचना समजण्यास सारासार विचार लागतो. सतत असा विचार करीत गेले म्हणजे त्याची गोडी चाखायला मिळते. (३)  पंचभूतात्मक ब्रम्हांड हे देहाचे मुख्य कारण आहे. ब्रम्हांड कारण तर देह त्याचे कार्य आहे. याचे विवरण करण्यासाठी या समासात हाच विषय सांगितला आहे. (४) असार ते नाशवंत तर शाश्वत ते सार होय. ज्याचा आज ना उद्या नाश होणार ते सार नव्हे. (५) पाण्यापासून पृथ्वी बनली परंतु पुढे ती पाण्यात विरली. तेजापासून पाण्याची उत्पत्ती झाली.(६) तेज पाणी शोषून टाकते. महातेजाने सारे पाणी आटून  गेले. पुढे तेज तेव्हढे राहिले. (७) वायू पासून तेज झाले. वायू तेजाला विझवून टाकतो. नंतर तेज जाऊन जिकडे तिकडे वायू गच्च भरून राहतो. (८) वायू आकाशा पासून झालेला आहे आणि फिरून तो आकाशात विरतो. वेदांत शास्त्रात कल्पांत कसा होतो याचे हे वर्णन आहे. कल्पांता नंतर गुणमाया आणि मूळमाया या परब्रम्हामध्ये लय पावतात. त्या ब्रह्माची कल्पना येण्यासाठी विवेक आवश्यक आहे.(९,१०)  सर्व उपाधींचा शेवट झाला म्हणजे तेथे दृश्याचा मागमूसही उरत नाही. त्याठिकाणी सगळीकडे गच्च भरलेले निर्गुण परब्रम्ह असते. (११) मोठा कल्पांत होऊन सारे विश्व नाहीसे झाले तरी परब्रम्ह नाश पावत नाही. मायेचा त्याग करून अशा त्या शाश्वताला ओळखावे. (१२) अंतरात्मा हा खरा देव. तो सगुण आहे. त्याच्या आधाराने निर्गुणापर्यंत पोहोचता येते. निर्गुणाचे ज्ञान झाले की विज्ञान प्राप्त होते. (१३) मानवी कल्पनेच्या पलीकडे असणारे ब्रम्ह अत्यंत निर्मळ आहे. त्याचे ठिकाणी मायेचा मळ  नाही. त्याचे ठिकाणी सारे दृश्य निर्माण होते आणि जाते परंतु ते खोटे पणाने घडते.(१४) जे होते आणि कालांतराने नाहीसे होते ते दृश्य अनुभवाला येते परंतु परब्रम्हामध्ये होणे नाही जाणे नाही. ते विवेकाने अनुभवास आणावे. (१५) एक ज्ञान दुसरे अज्ञानआणि तिसरे विपरीत ज्ञान अशी त्रिपुटी आहे. ही त्रिपुटी क्षीण झाली की विज्ञान प्रगट होते. विपरीत ज्ञान  भ्रमरूप असते, ते अज्ञानाचा स्वाभाविक परिणाम आहे. प्रथम विपरीत ज्ञान नाश पावते,  परंतु अज्ञान शिल्लक राहते. आत्मज्ञानाने ते नाश पावते. पुढे अज्ञान नाहीसे करणारे ज्ञान सुद्धा शांत होते. अखेर विज्ञान कायमपणे राहते. (१६) वेदांत सिद्धांत म्हणजे शास्त्र प्रचीती आणि धादांत म्हणजे आत्मप्रचीती. या सत्य प्रचीती ताडून पहाव्या. निर्विकार परब्रम्ह निरंतर जसेच्या तसेच असते. हेच प्रचीतीस येईल. (१७) परब्रम्ह ज्ञानदृष्टीने पहावे. ते तसे पाहून त्याच्याशी तदाकार व्हावे. यालाच आत्मनिवेदन म्हणतात. (१८) दृष्याला दृश्य दिसते, मनाला भास होतो.परंतु परब्रम्ह दृश्य आणि भास याच्या पलीकडे अविनाशीपणे राहणारे आहे.  हेच परब्रम्ह होय. (१९) दृश्याच्या दृष्टीने पहायला गेले तर ते परब्रम्ह कोठल्या कोठे दूर आहे असे वाटते. परंतु ते सर्वठिकाणी आत-बाहेर भरलेले आहे. ते अनंत आहे त्याला कोठेच अंत नाही. त्याची बरोबरी करणारी अन्य वस्तूच या विश्वात नाही. (२०) जे चंचल असते ते कधीच एके ठिकाणी स्थिरपणे रहात नाही. जे निश्चल असते त्यात कधीच अस्थिरपणा येत नाही. आकाशात आभाळ (ढग) येते आणि जाते तरी आकाश जसेच्या तसे राहते. तसेच परब्रम्ह निश्चल आहे. (२१) ज्याच्यामध्ये विकार होतो, आणि त्यामुळे जे वाढते, मोडते त्याच्या बाबतीत शाश्वत पणाची अपेक्षा करता येत नाही. कल्पांत समयी विकारशील सारे नाश पावते. (२२) ज्यांच्या अंतर्यामी भ्रमाचे ठाण आहे, मायेच्या अमलाने जे गोंधळून गेले आहेत त्याना हे विलक्षण चक्र उलगडणे शक्य नाही. भ्रमाने भ्रमित झालेल्या मनुष्याना  ही अवघड  समस्या सुटत नाही. (२३) दृश्याच्या भ्रमात रहात असलेल्या  माणसाला व्यवहाराचे रूप कळत नाही. त्याच दडपणाने शास्त्र सिद्धांत काय आहे ते त्यास समजत नाही. तसेच अंतर्यामी नांदणारा अंतरात्मा त्यास आकलन होत नाही.(२४) समजा एखादा रोगी एका वैद्याकडे औषध घेत आहे परंतु त्यास त्या औषधाची प्रचीती येत नाही. औषधांने रोगात कांहीच कमी होत नाही अशी परिस्थिती आहे .परंतु रोग्यास वैद्याची भीड कांही मोडवत नाही. त्यामुळे तो अन्य वैद्याकडे जात नाही. असा रोगी कांही वाचत नाही असे समजून चालावे. (२५) जो मनुष्य राजास बरोबर ओळखतो तो भलत्याच मनुष्यास राजा म्हणणार नाही. त्याच प्रमाणे जो देवाला ओळखतो तो भलत्यालाच देव म्हणणार नाही. तो स्वतः देवरूप बनून जातो. (२६) ज्याला मायिक अशास्वताची भीड पडते, तो दृश्याच्या बंधनात   असतो. तो देवाबद्दल बरोबर सांगू शकत नाही. आपण विचार केला तर या समस्त गोष्टी उघडपणे कळतात.(२७) मायेचे दडपण अलीकडे आहे आणि परब्रम्ह मात्र मायेच्या पलीकडे आहे. माया अलीकडे आणि परब्रम्ह पलीकडे असा हा कायमचा प्रकार आहे. (२८) जे खरे नाही त्याची भीड धरावयाची, मायेच्या भ्रमाने भलतेच कांही करावयाचे, ही कांही विवेकाची लक्षणे नाहीत. (२९) जे मायिक आहे, खोटे आहे, ते सगळेच्या सगळे सोडावे. स्वतः अनुभव घेवून खरे काय ते ओळखावे. मायेचा त्याग करून परब्रह्माचे दर्शन घावे. (३०) त्या मायेचे लक्षण पुढील समासात नीटपणे  सांगितले आहे. शांत मनाने त्याचे श्रवण

करावयास हवे. (३१)
              || इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे शाश्वत निरुपण नाम समास ९वा ||

                    दशक १२वा समास ७ वा विषयत्याग
या समासाचा प्रारंभ एका महत्वाच्या प्रश्नाने होतो आहे. शिष्य गुरुदेवाना विचारतात  गुरुदेव विषयांचा त्याग म्हणजे इंद्रिय सुखाचा संपूर्ण त्याग केल्याशिवाय परमार्थ साधत नाही. हे जर खरे तर प्रापंचिकाला परमार्थ कसा साधणार? श्रीसमर्थ या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणतात विषय त्यागाशिवाय किंवा वैराग्या वाचून कोणासही परमार्थ  साधत नाही. हे निर्विवाद आहे.विषय त्याग म्हणजे काय हे जाणून घेणे आवश्यक आहे. प्रापंचिकाला किंवा परमार्थी साधकाला खाणे,पिणे, निजणे, बसणे, जाणे, येणे वगरे देहधर्म व्यवस्थित करावे लागतात. ते न  करीता कोणासही जगता येणे शक्य नाही. परंतु प्रापंचिकाच्या  आणि पारमार्थिकाच्या अंतरंगात मोठा फरक असतो. प्रापंचिक व्यक्ती अनुताप न करीता केवळ प्रपंचासाठी जगतो. तो खाण्या-पिण्यासाठी, देहाला सुख देण्यासाठी जगतो तसेच तो मत्सराने वाया जातो. परमार्थी पुरुष साधना करण्यासाठी, देह उपयोगी पडावा या उद्देशाने देहाला खाऊ-पिऊ घालतो. आणि आचार, विचाराने पवित्रता पाळतो. वैराग्य ही मनाची अवस्था आहे, प्रापंचिकाचे  वैराग्य असे  की भगवंता साठी देह व्यवस्थित जगविणे आवश्यक  आहे. त्यासाठी अत्यंत प्रमाणशीर देहसुख भोगावयास काहींच हरकत नाही. अत्यंत माफक सुख भोगणे हाच प्रापंचिकाचा त्याग आहे. तेच त्याचे वैराग्य. वैराग्यवान  पुरुष म्हणजे ईश्वरी पुरुषच. अगदी तर्कशुद्ध असलेले स्पष्ट बोलणे पुष्कळ  लोकाना आवडत नाही. परंतु ज्याप्रमाणे पोटात मळ, मळ असताना जेवणे चांगले नाही त्याच प्रमाणे मनांत शंका ठेवून श्रवण करणे हिताचे नाही (१) ती शंका अशी.- अनेक लोक विषयांची, देहासुखाची निंदा करतात परंतु आपण स्वतः त्याचे सेवन करतात. खरे म्हणजे विषयांचा त्याग केला तर देहच चालणार नाही.(२)  बोलण्या-चालण्यात मेळ नसणे याला हीन विवेक म्हणतात. असा हीन विवेक मनुष्याचे हसे करतो. (३) विषयांचा त्याग केल्या शिवाय परमार्थ साधत नाही असे सगळीकडे सांगितलेले आढळते.(४) परंतु प्रश्न असा की प्रपंच करणारे तेव्हढे खातात, पितात, आणि परमार्थ करणारे काय उपाशी राहतात? विषय सेवनाच्या बाबतीत दोघेही सारखेच दिसतात. (५) मनुष्य जिवंत आहे तोपर्यंत विषय सुटणे अशक्य आहे. असा कोणी मनुष्य जगात आहे काय? याचे समाधानकारक उत्तर गुरुदेवांनी द्यावे. (६) विषयांचा संपूर्ण त्याग केला तरच परमार्थ करता येतो असे म्हणाल  तर मोठा गोंधळ होतो.(७) श्रोत्यांनी आपली शंका सविस्तर मांडली. गुरुदेवांनी त्याचे समर्पक उत्तर दिले. ते श्रोत्यांनी एकचित्ताने आणि त्या विषयात लक्ष घालून ऐकावे. (८) वैराग्याच्या पार्श्वभूमीवर विषयांचा त्याग केला तरच परमार्थ साधण्याचा योग येतो. प्रपंचाचा  त्याग केल्यानेच सर्वांगीण परमार्थ घडतो.(९) पूर्वी जे महान ज्ञानी होऊन गेले त्यांनी परमार्थासाठी पुष्कळ कष्ट सोसले. त्यानंतर ते जगात विख्यात झाले.(१०) बाकीचे प्रापंचिक लोक आपापसात मत्सर करीत राहिले. कांही अन्नान्न दशा होऊन मरण पावले.तर कांही पोटासाठी भ्रष्ट झाले. (११) ज्या लोकाना अंगाचे खरे वैराग्य नाही, स्वतःच्या अनुभवाचे ज्ञान नाही, शुद्ध आचार नाही, भजन पूजन नाही अशा प्रकारची माणसे सज्जन म्हणून मिरवितात.परंतु हा सज्जनपणा काल्पनिक असतो. खरा नसतो. (१२,१३)  आपले आजपर्यंतचे आयुष्य वाया गेले असा अनुताप न होणे हे त्या मनुष्याचे महापापच आहे. दुसर्यांचा उत्कर्ष पाहून मनुष्याच्या मनांत मत्सर उत्पन्न होतो. (१४)  जे मला नाही ते तुलाही शोभत नाही हा मत्सराचा दृष्टीकोन सर्वांच्या परिचयाचा आहे. ज्याला खाण्यास अन्न नाही तो अन्न खाणार्यास निर्मल मनाने पाहू शकत नाहीत.(१५) भाग्यवंत अशा निरनिराळ्या थोर पुरुषांची टवाळखोर लोक निंदा करतात. सज्जन माणसास पाहून चोर चरकतात तशातलाच हा प्रकार (१६) वैराग्या सारखे भाग्य नाही.वैराग्य नसेल तर ते  दुर्भाग्य. वैराग्याच्या अभावी परमार्थ योग्य प्रकारे होत नाही.(१७) ज्याच्या जवळ अनुभवाचे ज्ञान आहे, ज्याची आसक्ती सुटलेली आहे, विवेकाच्या जोरावर ज्याने सर्वस्वाचा त्याग केला आहे असा पुरुष म्हणजे महायोगी समजावा. तो ईश्वरी पुरुष असतो. (१८) श्री शंकर हे वैराग्याचे आदर्श आहेत. आठ मोठ्या सिद्धीना बाजूस सारून श्रीमहादेवानी योगदिक्षा घेतली आणि ते घरोघरी भिक्षा मागत फिरतात. (१९) महादेवा प्रमाणे वेश धारण करणारा त्यांची बरोबरी करू शकणार नाही. म्हणून बाहेरून सारखेपणा दिसला तरी सर्वांची योग्यता सारखी नसते. (२०) जो अंतरी वैराग्य संपन्न आणि विवेकी असतो अशा पुरुषाला लोक शोधीत येतात. याच्या उलट जो लोभी, आसक्त विवेकहीन असतो, अशी भाग्यहीन माणसे दीनवाणे जीवन जगतात (२१) जी माणसे उच्च विचारांपासून खाली घसरलेली असतात, जी आचाराने भ्रष्ट असतात ती माणसे विषयांच्या लोभाने आत्मानात्म विचार करू शकत नाहीत. सारासार विचारांचा त्याना विसर पडतो. (२२) त्याना भजन पूजन आवडत नाही. त्यांच्या हातून पुरश्चरण कधी घडत नाही. याच कारणाने त्यांचे संत सज्जनांचे जमत नाही. (२२) वैराग्य संपन्न असून जो भ्रष्ट होत नाही, ज्ञानी असून जो भगवंताचे भजन सोडीत नाही  स्वतः विद्वान असून जो वादात कधी शिरत नाही. अशी माणसे फार थोडी आढळतात (२४)   कष्ट केले तर शेतात उत्तम पीक येते. भारी वस्तू असेल ती बाजारात तत्काळ विकली जाते. त्याच प्रमाणे जो विवेक आणि वैराग्याने संपन्न आहे त्याच्याकडे जाणत्या लोकांच्या उड्या पडतात. पडतात.(२५)  हे ज्याच्या जवळ नसते ते निस्तेजपणाने मागे पडतात. मनांत आशा वागविल्याने ते  खोटे पडतात वैराग्य भ्रष्ट झाल्याने त्यांचे ज्ञान मिंधे बनते, कानकोंडे होते (२६) समस्त विषयांचा त्याग करणे, शुद्ध कार्य कारण भावाचा स्वीकार करणे. शरीर धारण करण्यासाठी आवश्यक तेव्हडेच शरीर सुखाचे सेवन करणे, ही विषय त्यागाची लक्षणे आहेत. हे ओळखून वागावे. (२७) हे झाले वैराग्य, आता विवेकाची लक्षणे ऐकावीत. जे जे कांही घडते त्याचा कर्ता ईश्वर आहे. प्रकृतीच्या पासार्याला खरे अस्तित्व नाही. असा निश्चय अंतर्यामी स्थिर होणे हा विवेक होय. जे खरे विवेकी असतात त्यांनाच वरील विवेकाचा अर्थ बरोबर कळतो.(२८) सर्व प्रसंगी जो शौर्य दाखवितो त्यालाच लहान थोर सर्व शूर समजतात. जो खरे कष्ट करणारा आहे आणि तो जो अंगचोर आहे या  दोघांची बरोबरी करता येत नाही. (२९) कशाचा त्याग करावा आणि कशाचा करू नये हे जो शुद्ध तर्काने जाणतो, आपण जसे बोलतो तसे वागण्याचा प्रयत्न करतो, पिंड,ब्रह्माची रचना जो यथा-योग्यपणे जाणतो, असे सर्व जाणणारा असून जो उत्तम गुणांनी संपन्न असतो त्याच्या संगतीने आपल्या आयुष्याचे सार्थक होते.(३०,३१)
      || इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे विषय त्याग निरुपण नाम समास ७ वा ||                                         दशक ७वा समास ७ वा ओवी १, १५, ४३    
सध्याचे आपले दृश्य विश्वाचे ज्ञान आहे पणाचे आहे. वस्तू अशी आहे तशी आहे असे ज्ञान सांगते. परंतु ब्रम्हवस्तू अशी दिव्य असल्याने तिचे वर्णन नाही पणाने करावे लागते. सध्याचे आपले मन कल्पना करीत राहते. दृश्य विश्वाला कल्पनेची मर्यादा आहे. परंतु ही कल्पना ब्रम्हवस्तुला आकलन करू शकत नाही. कल्पना तेथे शून्यवत होते, लटकी पडते कारण ब्रम्ह स्वभावतःच निर्विकार आहे (१) मनाला जशी सवय लावावी तशी लागते. ब्रम्ह चिंतनाची सवय जर मनाला लावली तर कालांतराने ब्रम्हसाक्षात्कार होईल. त्याच्या जोडीला नित्या-नित्य विचार ठेवला तर समाधान प्राप्त होईल. दृश्य चिंतन सोडून  ब्रम्हचिंतन मनाकडून करवून घ्यावे. हाच राज मार्ग आहे (१५) देहबुद्धीच्या पोटी जन्म घेणारा मी पणा सगळी भानगड उत्पन्न करतो आणि खोट्याचे खरे करतो. तो नाना प्रकारचे संदेह निर्माण करतो. तो प्रपंच करू देत नाही आणि परमार्थ बोलू देत नाही. पुष्कळ प्रयत्न करून सुद्धा तो नाहीसा होत नाही. तो नाहीसा करण्यात साधूंची खरी कमाल असते. मी पणा सोडून राहतो तोच खरा समाधानी असतो. आपल्या मनाला उगीच कल्पना करण्याची सवय लागली आहे. परंतु मन जी जी कल्पना करते  ते, ते ब्रम्हस्वरूप नव्हे. अशा रीतीने कल्पना लटकी पडली की मी पणा जोर करतो. नंतर नाना संशय मनांत धुमाकूळ घालतात. (४३)

                      दशक ५ वा समास ६ वा ओवी ४५    
तू स्वतः परमात्मा स्वरूप आहेस असे सांगून श्री समर्थ आत्मज्ञानाचे सर्व बाजूनी वर्णन करतात. सदगुरुंशी अनन्य होऊन ते ज्ञान प्राप्त होते आणि पूर्ण समाधान मिळते. दृश्य विलीन होऊन आत्मनिवेदन होणे मात्र आवश्यक आहे. अहम ब्रह्मास्मि हे महावाक्य आहे. मी ब्रम्ह आहे असा याचा अर्थ आहे. या अर्थाचे रहस्य तर्काने समजणार नाही. ते मी समजाऊन सांगतो. त्या अर्थामध्ये गुरु आणि शिष्य दोघे एकरूप होऊन जातात (४४) शिष्या, या महावाक्यातील मर्म ऐक  तू स्वतःच ब्रम्हरूप आहेस याबद्दल किंचितही संदेह बाळगू नकोस. (४५)
         दशक ४ था समास -९ वा- आत्मनिवेदन भक्ती

भक्ती आणि ज्ञान यांची फारकत करता येत नाही. भगवंताच्या सामर्थ्याची, सौंदर्याची, महिम्याची किमत कळली पाहिजे. या कळण्यातूनच किंवा भगवंताबद्दलची जी श्रद्धा, भावना, मदियता, आपलेपणा निर्माण होतो त्याच्या पोटी भक्ती उदय पावते. म्हणून ज्ञानामध्ये भक्तीचा जन्म होतो. त्याच प्रमाणे भगवंताच्या दिव्य मंगल, मधुर मूर्तीचे, लीलांचे, कथांचे आणि नामाचे श्रवण, कीर्तन, स्मरण करीत गेल्याने मन तदाकार होऊन भगवंताच्या अंतरंगात शिरते. ज्या मानाने मनाच्या तादाकारतेची  खोली वाढते त्या मानाने भगवंताचे अधिकाधिक ज्ञान होते. म्हणून भक्ती ही ज्ञानाची जननी आहे. भगवंत परमानंद स्वरूप आहेत, रसस्वरूप आहेत. त्यांच्या चिंतनात मग्न होऊन भक्त स्वतःला संपूर्णपणे विसरतो. त्यावेळी तो आनंद सागरात बुचकळ्या मारतो. म्हणून स्वानंदानुभव हे भक्तीचे चरम फळ आहे. भगवंत शाश्वत आहे, सत्तारूप आहे, सूक्ष्माहून अतिसूक्ष्म आहे. त्याच्या शोधाला लागल्यावर विवेकाच्या जोरावर  अशाश्वत, स्थूल दृश्य मनातून बाजूला सरते. वैराग्याचा उदय होऊन देहबुद्धी नष्ट होते आणि आत्माबुद्धीचा उदय होतो. मी तोच आहे(तत्वमसी) हा विलक्षण साक्षात्कार होउन ज्ञानी आनंदाच्या सागरात स्वच्छंदपणे बुडून जातो. म्हणून स्वानंदानुभव हेच ज्ञानाचे सुद्धा चरम फळ आहे. ज्ञानात काय अथवा भक्तीत काय  अविद्या संपूर्णपणे नाश पावते. फरक इतकाच असतो की ज्ञानमार्गात परमात्मा सत्तारुपाने सारखा स्फुरतो आणि भक्तीमार्गात तो आनंद रुपाने सारखा स्फुरतो. दोघांच्या ब्रम्ह साक्षात्कारामध्ये थोडासुद्धा फरक नाही. एकाचा भर वीतरागप्रधान शांत रसावर तर दुसर्याचा भर अनुराग प्रधान सख्य रसावर असतो. ज्ञानमार्गात स्वस्वरूपाच्या निरुपम अनंतपणाचे स्वानन्दाश्चर्य वाटते, तर भक्ती मार्गात तो आनंद रुपाने स्फुरत असतो. दोघांच्या ब्रम्हसाक्षात्कारामध्ये यत्किंचीतही फरक नसतो.
श्रीसमर्थ म्हणतात श्रोत्यानो मागील समासात आठवी भक्ती कशी करावी याचे विवरण केले आता नववी भक्ती कशी असते ते लक्षपुर्वक ऐका (१) निवेदनाला नववी भक्ती म्हणतात. आत्मनिवेदन कसे  करावे ते सोपे आणि स्पष्ट करून सांगतो. निवेदन म्हणजे समर्पण करणे, ताब्यात अथवा हातात देणे.  कोणाकडे सोपविणे, या धातूपासून निवेदन हा शब्द बनतो. आत्मनिवेदन अर्थात आपण भगवंताला सर्वस्वी समर्पण करणे, त्याच्या हाती सोपविणे. (२) आपण स्वतःला देवास वाहणे हे निवेदनाचे लक्षण आहे. तत्वांचे स्पष्ट विवेचन केले म्हणजे निवेदन काय ते कळते. देवाला वाहणे म्हणजे  देवाला देवून टाकणे या देण्यात तीन गोष्टी असतात.(अ) देवास समर्पण करताना आपण अत्यंत आदराने आणि प्रेमाने देतो. (आ)एकदा दिल्यावर त्या वस्तूवरील ममत्व, माझेपणाचा हक्क आसक्ती आणि प्रीती आपण सर्वस्वी सोडतो. (इ) त्या वस्तूला आपण विसरून जातो. पुढे तिचे काय झाले याचा विचार मनातून काढून टाकतो. तत्त्वविवरण म्हणजे काय? आजचा आपला मी कशाचा बनलेला आहे., हा शोध करीत जाऊन अखेर कोणती तत्वे उरतात ते पहावे. ही तत्वे कळली की आपण देवाला वहावे म्हणजे काय करावे ते समजते. (३) एकीकडे मी भक्त आहे असे म्हणावयाचे आणि दुसरीकडे वेगळेपणाने भगवंताची भक्ती करावयाची. हे सारे कांही विलक्षण वाटते, भगवंताहून जो वेगळा उरत नाही तो भक्त बनतो. जो वेगळा राहतो तो  भक्त नसतो. म्हणून भक्त आहे आणि वेगळेपणाने भगवंताचे भजन पूजन करतो या दोन गोष्टी परस्पर विरोधी  आहेत. (४)एकीकडे एखाद्याला ज्ञान आहे असे म्हणावयाचे आणि लगेच दुसरीकडे ज्ञान नाही असे म्हणावयाचे. याच प्रमाणे एकाच वेळी भक्त आणि विभक्त दोन्ही असू शकत नाही. (५) श्रीसमर्थ म्हणतात जो भक्त असतो तो विभक्त कधी होऊच शकत नाही आणि जो विभक्त आहे तो भक्त नव्हे. परंतु या गोष्टी समजण्याकरिता आत्मानात्म विचार करणे आवश्यक असते.(६) मी कोण आहे? माझे खरे स्वरूप काय आहे? याचा सारासार विचार करावा. तसेच भगवंत कोण आहे याचा शोध करण्यासाठी आपण आपल्या अंतरंगात उतरून खर्या मीचे ज्ञान करून घ्यावे. असा श्रीसमर्थांचा आग्रह आहे. मी चे ज्ञान झाले की भगवंताचे ज्ञान आपोआप घडते. (७) मी कोण हा प्रश्न दिसतो साधा परंतु त्याचे उत्तर शोधू गेल्यास मुलतत्वांची मीमांसा करावी लागते. अशी मीमांसा करता,करता अखेर ज्या मीला आज आपण मी मानतो तो खरा नाही असे उघडपणे दिसून येते. (८) एका तत्वाने दुसर्या तत्वाचा ज्यावेळी निरास होत जातो, त्यावेळी आपण निराळे असे उरत नाही. अशा रीतीने तत्व निरसनाने आत्मनिवेदन सहजच घडते. मनुष्य म्हणजे देह + मन +आत्मा.  आत्मा हा खरा मी होय. परंतु आज आपण देह आणि मन यांच्या  युतीस मी असे मानतो. परंतु देहबुद्धीच्या आश्रयाने वावरणारा मी तत्वाविचारासमोर टिकत नाही. खोटा मी नाहीसा होणे हेच आत्मनिवेदन होय. (९) संपूर्ण दृश्य विश्व पंच महाभूतानि बनलेले आहे. त्यांचे  विवेकाने विवेचन केले तर सर्वांचा निरास होतो. अशा प्रकारे दृश्य विश्वाचे किंवा प्रकृतीचे निरसन झाले कि आत्मस्वरूप तेव्हढे  शिल्लक राहते. मग आपला मी वेगळा राहतोच कोठे?(१०) मुख्य मूलतत्वे दोनच आहेत. एक परमेश्वर आणि दुसरी विश्वाचा आकार घेवून दिसणारी प्रकृती. या दोघांमध्ये मी हा तिसरा चोर येतोच कोठे? (११)  परमात्मा आणि प्रकृती ही दोन मुलतत्वे स्वतःसिद्ध आहेत. परंतु मुळात नसलेला आणि खोटा असलेला हा देहाकार आपल्याला चिटकतो. तरीपण विचारांनी शोध घेतल्यास मुळात त्याला कांही आधार नाही असे निश्चित होते. (१२) व्यक्ती आणि विश्व यामधील तत्वांची रचना शोधून पाहिली, त्याच प्रमाणे तत्वांची मीमांसा करून पाहिली तर असे आढळते की या विश्वामधील अनेक प्रकारचे अगणित आकार, किंवा दृश्य वस्तू, हा सगळा तत्वांचाच विस्तार आहे. (१३) आपल्या देहासकट या विश्वाकडे  साक्षित्वाने पाहू लागलो म्हणजे केवळ बघणारा अशी भूमिका ठेवून , पाहू लागलो तर ती तत्वे सहज नाहीशी होतात, नंतर प्रत्यक्ष आत्म्याचा अनुभव आला की साक्षीपणाही उरत नाही.. विश्वाच्या आरंभी केवळ आत्माच होता, तसाच विश्वाच्या अंती सुद्धा केवळ आत्माच शिल्लक राहतो. हे जर खरे तर आपल्या मीपणाला वेगळे अस्तित्वच रहात नाही. साक्षात्कारी  पुरुष असे सांगतात की मी पणा वीरणे (लयास जाणे)  हे आत्मनिवेदनाचे मर्म आहे. (१४) आत्मा सगळीकडे व्यापून आहे. आपल्या आनंदाने तो संपूर्णपणे भरलेला आहे आणि मीच तो आत्मा सगळीकडे व्यापून आहे. असे श्रुती सांगते. म्हणजे खरा मी सगळीकडे व्यापून आहे आणि स्वानंदाने संपूर्ण भरलेला आहे. हे जर खरे तर मी  आणखी कोणी निराळा असू शकत नाही म्हणून देहाचा अहंकार असत्य आहे. (१५) कोहम या प्रश्नाचे उत्तर सोहम हंस  मी कोण आहे या प्रश्नाचे उत्तर तो मी आहे आणि मी तो आहे असे आहे. या उत्तरामध्ये भरून असलेला सर्व अर्थ  उकलुन पहावा. त्याच्या विचारात शिरले की मी आणखी कोणी निराळा आहे असे सिद्ध होत नाही. (१६) सोहम म्हणजे तो आत्मा मी आहे. आत्मा निर्गुण, निरंजन म्हणजे दृश्याच्या पलीकडे आणि मल रहित आहे. मी तोच असल्याने त्याच्याशी अनन्य आहे. अनन्य म्हणजे मी आणि तो वेगळे नाहीत. अगदी एकरूपच आहोत. हे जर खरे तर मी कोणी निराळा, वेगळा आहे असे कसे म्हणता येईल? म्हणून देहाचा अहंकार मूलतः असत्य आहे. (१७) आत्मा अद्वैत आहे अद्वैत म्हणजे द्वैत नाही ते. ज्यात दुसरेपणा नाही ते. अनात्म्याच्या प्रांतामध्ये जिकडे तिकडे द्वैत  दुसरेपणा, अनेकपणा पसरलेला आहे. मी आणि तू यांचे वेगळेपण असल्यावाचून अनात्म्याचे पाउल हलतच नाही. आत्म्याच्या  प्रांतात मी, तूच असल्याने तेथे वेगळेपणाला वावच नाही. आत्म्याला द्वैताचा स्पर्शच होत नाही. असे असताना तेथे वेगळ्या मी पणाचे कारण असूच शकत नाही. म्हणून देहाचा अहंकार असत्य आहे. (१८) आत्मा सर्व बाजूनी परिपूर्ण आहे. तो मूर्तिमंत पूर्णता आहे. तेथे गुण आणि अगुण दोन्ही नाहीत. मानवी बुद्धीला गुणावाचून वस्तूची कल्पनाच करता येत नाही. म्हणून सर्व अनात्म वस्तू आपण सगुण म्हणतो. परंतु आत्मवस्तू मानवी कल्पनांच्या पलीकडे असल्याने तिला निर्गुण म्हणतो. वास्तविक पहाता, आत्मस्वरूप गुण आणि अगुण या कल्पने पासून सदा मुक्त आहे. असे जे निव्वळ निर्गुण आत्मस्वरूप त्यामध्ये मी देह आहे ही क्षुद्र सगुण कल्पना कशी असणार? अर्थात ती असूच शकत नाही. म्हणून देहाहंता असत्य आहे. निखळ निर्गुण हा समर्थांचा शब्दप्रयोग मोठा अर्थपूर्ण आहे. (१९)
तत त्वं असी म्हणजे ते तू ब्रम्ह आहेस  असे उपनिषदातील स्वानुभवाचे महावाक्य आहे. या मधील तिन्हीही पदांचे उल्लंघन करून जो आत्मस्वरूपा पर्यंत पोहोचला त्याला भेद, आणि अभेद दोन्ही लटके होतात. वास्तविक आत्मवस्तू मुळातच भेदरहित असल्याने तिला भेद आणि अभेद स्पर्श करीत नाहीत. ती आत्मवस्तू जो स्वतः बनला त्याला मी देह आहे अशी मी पणाची निराळी अवस्था कशी असणार? म्हणून मी पणा असत्य आहे.(२०)  मी जीव आहे आणि तो शिव आहे हा विद्या आणि अविद्या यांनी निर्माण केलेला भेद आहे. त्या भेदाची उपाधी नाहीशी केली तर मूळ आत्मस्वरूपात  जीव, शिव असा भेद नाही हे ध्यानात येईल. जीव,शिव भेदरहित असलेला आत्मा हेच आपले खरे स्वरूप आहे. असा निश्चय झाला की मग मी देह आहे असा निराळा मी पणा उरतच नाही. म्हणून आपण कोणी वेगळे ही देह अहंता असत्य आहे. दृश्य जगामध्ये सामान्य आणि विशेष यांचे राज्य चालते. अनेक व्यक्तीना एकच  सामान्य व्यापून  असते उदा, अनेक माणसे विशेष तर त्याना चैतन्याप्रमाणे व्यापून असणारे आणि उरणारे सामान्य म्हणजे शिव होय. जीव आणि शिव एकमेकांवर अवलंबून असतात. दोघांमध्ये भेद आहे तसाच अभेद सुद्धा आहे. जीवाचा जीवपणा विरला की शिवाचा शिवपणा  विरतो. प्रथम जीव स्वतः शिव बनतो आणि नंतर परमात्ममय होऊन जातो. म्हणून मी कोणी निराळा आहे असे मानायला कांही आधारच उरत नाही. (२१) मी देह आहे या भावनेमुळे आपण कोणी वेगळे आहोत, स्वतंत्र आहोत असा जो आपला दृढ विश्वास असतो तो भ्रम असतो. तो अगदी असत्य आहे. एक भगवंतच काय तो सत्य, खरा आहे. तसेच भगवंत आणि भक्त दिसावयास भिन्न दिसले तरी ते वेगळे नसतात. दोघे एकमेकांशी अनन्य असतात, एकरूप असतात. हे जे मी सांगतो आहे त्याचा अर्थ स्वानुभवी पुरुषांनाच कळेल(२२) भक्ताने आपला संपूर्ण मी पणा भगवंताला अर्पण करून त्याच्याशी एकरूप होऊन जाणे याला आत्मनिवेदन असे म्हणतात. आत्मनिवेदनानेच ज्ञानी पुरुषाना समाधान लाभते. असे हे नवव्या भक्तीचे लक्षण आहे. (२२) ज्या प्रमाणे पंच महाभूतांमध्ये आकाश, श्रेष्ठ, समस्त देवांमध्ये जगदीश्वर श्रेष्ठ त्याच प्रमाणे भक्तीमध्ये आत्मनिवेदन भक्ती सर्वात श्रेष्ठ आहे (२४) आत्मनिवेदन भक्ती साधली नाहीतर मनुष्याचे जन्म-मरण चुकणार नाही. हे माझे सांगणे अगदी खरे आहे., अनुभवाला धरूनच आहे (२५) नवविधा भक्ती ही अशी आहे. ती आचरली तर सायुज्य मुक्ती मिळते. या संपूर्ण विश्वाचा लय झाला तरी सायुज्य मुक्तीमध्ये कोणताही फेरबदल होत नाही. (२६) एकंदर चार मुक्ती पैकी पहिल्या तीन मध्ये फरक घडून येतो. सायुज्य मुक्ती मात्र अचल राहते. तिच्यात फरक पडत नाही. (२७) वेद आणि शास्त्रे यांनी एकंदर चार प्रकारच्या मुक्तीचे  वर्णन केले  आहे. त्यापैकी  तीन नश्वर आहेत, अशाश्वत आहेत परंतु चौथी मात्र शाश्वत आहे. (२८) पहिली मुक्ती सालोक्यता, दुसरी, समीपता, तिसरी सरूपता, आणि चौथी सायुज्यता. (२९) या मुक्ती बद्दलचे  विवेचन पुढील समासात केले आहे (३०)
   
         || इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मनिवेदन नाम समास नववा ||

                                    || हरी ओम तत्सत ||


वैशाख कृष्ण ११
(अपरा एकादशी)
दिनांक १६ मे २०१२
                 

No comments:

Post a Comment