|| श्रीगुरुदेव दत्त || || श्री श्री गुरुवे नमः || || श्रीकृष्ण परमात्मने नमः||
श्रीपाद श्रीवल्लभ
चरित्रामृत या भव्य, दिव्य ग्रंथाची रचना श्रीपाद प्रभूंच्या आदेशांनुसार श्री
शंकर भट्ट या कर्नाटकी भारव्दाज गोत्रीय ब्राम्हणाने संस्कृत भाषेत केली होती.नंतर
त्याचा तेलगु भाषेत अनुवाद केला गेला. हे चरित्र श्रीपाद प्रभूंचे आजोबा श्री
बापन्नाचार्युलू यांच्या ३३व्या पिढीतील भाग्यवान पुरूष याचे प्रकाशन करतील असे विधान ग्रंथात केले होते. अगदी तसेच घडले. श्री मल्लादि
गोविंद दीक्षित, भीमावरम, हे बापन्नाचार्युलू यांच्या ३३व्या पिढीतील भाग्यवान सद्गृहस्थ आहेत त्यांनी हा
ग्रंथ इ.सन. २००१ साली श्रीक्षेत्र पिठापूर येथील “श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान”
यांच्या व्दारे प्रकाशित केला. श्रीपाद प्रभूंनी आपल्या वक्तव्यात म्हटल्या
प्रमाणे या महान ग्रंथाचा मराठी, हिंदी, गुजराथी, कानडी आणि इंग्रजी भाषेत अनुवाद
झाला आहे आणि लाखो भक्त यापासून लाभान्वित
होत आहेत.
`या ग्रंथाचे
वैशिष्टय असे की लेखकाने हा प्रवास वर्णनात्मक पद्धतीने लिहिला आहे. लेखक उडपी
क्षेत्री श्रीकृष्ण दर्शनासाठी गेले असताना त्याना श्रीकृष्णांनी, कन्याकुमारीस
जाऊन कन्यका परमेश्वरीचे दर्शन घेण्याची आज्ञा केली. त्यांनुसार शंकर भट्ट कन्या
कुमारी क्षेत्री गेले आणि त्यांनी कन्यका देवीचे दर्शन घेतले. त्यांना जाणवले की
माता त्यांच्याकडे अत्यंत स्नेहपूर्ण नजरेने पहात म्हणत होती “शंकरा, तुझ्या
अंतरंगातील भावावर मी प्रसन्न झाले आहे. तू कुरुगड्डी क्षेत्री जा आणि श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनाने आपल्या
जीवनाचे सार्थक कर.” या आदेशानुसार श्री शंकर भट्ट कुरुगड्डीस जाण्यास निघाले.
मार्गात त्यांना अनेक साधू, संत, महात्मे यांचे दर्शन होत होते. त्यांच्या बरोबर
होत असलेल्या सत्संगात प्रत्येकजण
श्रीपाद प्रभूंच्या अद्भूत लीलांबद्दल, तसेच आपल्या अनुभवाबद्दल शंकर भट्टास सांगत
होते. याशिवाय लेखकास प्रवासात अनेक अनुभव येत होते आणि त्यात श्रीपाद प्रभूंच्या
कारुण्यमय दृष्टीचा अनुभव चाखावयास मिळत होता. या सर्वाना लेखकाने शब्दबद्ध केले
आहे. यातील श्रीपाद प्रभूंनी स्वत: प्रत्यक्ष केलेल्या अद्भूत, अनाकलनिय आणि अगम्य लीला, तसेच त्यांनी वेळोवेळी केलेला उपदेश,
सत्संग आदी वेगळे करुन ते “श्रीपाद श्रीवल्लभ लीलामृत” या नांवाने संकलित करण्याचा
प्रयत्न केला आहे. हे करीत असताना
ग्रंथाचा मूळ गाभा, जसाच्या तसा राहील
याची पूर्ण काळजी घेतली आहे. शंकर भट्टास
प्रवासात आलेले स्वतःचे अनुभव स्वतंत्र रीतीने अध्याय ४६ ते ५२ या सात अध्यायात नमुद केले आहेत.
सध्याच्या युवा
पिढीला वेळेच्या अभावामुळे मूळ ग्रंथ वाचणे त्याचे पारायण करणे कठीण वाटते. अशा
प्रकारचा सार रुपाने संकलित केलेला लघु स्वरूपातील ग्रंथ, मूळ ग्रंथाचे अध्ययन करण्यास नक्कीच प्रेरित
करेल. माझे गुरुदेव परम पूज्य योगाचार्य
श्री हरिभाऊ निटूरकर महाराज यांच्या नि:सीम कृपेने आणि आशीर्वादाने तसेच वेळोवेळी
दिलेल्या प्रेरणेमुळे हे संकलनाचे कार्य पूर्ण झाले आहे. साधकांना याचा नक्कीच लाभ
होईल असा विश्वास वाटतो.
यथामती ही सेवा श्रीपाद
श्रीवल्लभ याच्या चरण कमळी सादर समर्पण.
|| श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये. ||
प्रभाकर गंभीरे.
No comments:
Post a Comment