Wednesday, October 31, 2012
Wednesday, October 24, 2012
Wednesday, October 17, 2012
Tuesday, October 16, 2012
Friday, October 12, 2012
Thursday, October 11, 2012
Wednesday, October 10, 2012
Tuesday, October 9, 2012
श्रीमद दासबोधाचे मर्म
श्रीमद दासबोधाचे मर्म -- भक्ती,ज्ञान,
ब्रम्ह आणि माया यांचे विवेचन.
1) आत्मनिवेदन भक्ती.
श्री समर्थांनी दासबोध ग्रंथाच्या सुरवातीस प्रस्तावनेत म्हटले आहे
“येथे बोलीला भक्तीमार्ग”. मनाचे श्लोक या लघु ग्रंथात सुद्धा भक्ती मार्गाचेच
महात्म्य सांगितलेले आहे. ते म्हणतात “मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी
पाविजेतो स्वभावे.” परमेश्वर प्राप्तीसाठी, ज्ञानमार्ग आणि कर्ममार्ग, या पेक्षा भक्ती मार्ग हा सोपा
राजमार्ग असून सामान्य जनांसाठी आचरण्यास सुलभ आहे असे श्री समर्थांचे निश्चयात्मक
मत आहे. यामुळे त्यांनी आपल्या ग्रंथांमध्ये भक्तीला अधिक प्राधान्य दिले आहे. असे
असले तरी या ग्रंथात विषयांची इतकी
विपुलता आहे कि “यदिहास्ती तदन्यत्र, यान्नेहास्ती न तक्वचीत” अर्थात येथे जे आहे
तेच दुसरीकडे सापडेल. येथे जे नाही ते अन्यत्र कोठेच मिळणार नाही. श्री समर्थांनी
भक्तीचे नउ प्रकार सांगितले आहेत. ते असे, भगवंताचे श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवन,
अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आणि आत्मनिवेदन. यातील प्रत्येक प्रकाराचे स्वतःचे आपले
एक वैशिष्टय आहे. भगवंतांच्या दिव्य लीलांचे, कथांचे श्रवण त्याच्या गुणांचे
कीर्तन, भजन, मधुर नामांचे नामस्मरण,
चरणांचे पादसेवन, वंदन, तसेच भगवंतांच्याप्रती अर्चन, दास्य सख्य आणि
आत्मनिवेदन, या नउ प्रकारच्या भक्तीने ईश्वर आपलासा करुन घेता येतो असे श्री समर्थ
सांगतात. भक्ती आणि ज्ञान या जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ज्ञानातूनच
भक्तीचा उदय होतो. भगवंताच्या सामर्थ्याची सौंदर्याची, कारुण्याची, तसेच भक्तवात्सल्यतेच्या
ज्ञानातूनच भगवंताबद्दलची श्रद्धाभावना, मादियता, आपलेपणा निर्माण होते. त्याच्या
पोटी भक्तीचा उदय होतो. म्हणून ज्ञानामध्ये भक्तीचा जन्म होतो. त्याच प्रमाणे
भगवंताच्या दिव्य, मंगल, मधुर लीलांचे, कथांचे, नामांचे श्रवण, कीर्तन, स्मरण,
करीत गेल्याने मन तदाकार होऊन भगवंताच्या अंतरंगात शिरते. ज्या मानाने तदाकारतेची
खोली वाढते त्या मानाने भगवंताचे अधिकाधिक ज्ञान होते. म्हणून भक्ती ही ज्ञानाची
जननी आहे. भगवंत परमानंद स्वरूप आहेत. त्यांच्या चिंतनात मग्न होऊन भक्त स्वतःला
संपूर्णपणे विसरतो त्या वेळी तो आनंद सागरात बुचकळ्या मारीत असतो. म्हणून
स्वानंदानुभव हे भक्तीचे चरम फळ आहे.
श्री समर्थ श्रोत्यांना सांगतात आत्मनिवेदन म्हणजे समर्पण करणे,
भगवंताच्या हाती आपण स्वःतास सोपविणे, देऊन टाकणे. या सोपविण्यात तीन गोष्टी
असतात. (अ) देवास समर्पण करताना आपण अत्यंत आदराने आणि प्रेमाने देतो. (आ) एकदा एक
वस्तू समर्पण केल्यावर त्या वस्तूवरील ममत्व, माझेपणाचा हक्क, आसक्ती आणि
प्रीती,आपण सर्वस्वी सोडून देतो. (इ) त्या वस्तूला आपण विसरतो. एकदा आपण स्वतःस
भगवंतास समर्पण केल्यानंतर आपण आपल्या “मी”ला संपूर्णपणे विसरून जाऊन भगवंताच्या
चरणी अनन्य व्हावे. श्री समर्थ पुढे म्हणतात श्रोत्यानो, जो भक्त असतो तो भगवंतापासून
कधीच विभक्त होत नाही आणि जो विभक्त असतो तो खरा भक्त होऊ शकत नाही. मी कोण आहे,
माझे खरे स्वरूप काय आहे? याचा सारा सार विचार करावयास हवा. तसेच भगवंत कोण आहे
याचा शोध करण्यासाठी आपण आपल्या अंतरंगात उतरून खऱ्या मी चे ज्ञान करुन घ्यावे.
खरा मी हा माझा देह नसून मी आत्माच आहे अशी निश्चयात्मक बुद्धी झाली म्हणजे अर्थात
मी चे ज्ञान झाले की भगवंताचे ज्ञान आपोआप होते. मी कोण हा प्रश्न दिसतो साधा
परंतु त्याचे उत्तर शोधू लागल्यास मुलतत्वांची मीमांसा करावी लागते. अशी मीमांसा
करता,करता अखेर ज्या “मी”ला आपण आज मी मानतो तो मी म्हणजे देह खरा नाही असे
स्पष्टपणे दिसून येते. एका तत्वाने दुसऱ्या तत्वाचा ज्यावेळी निरास होत जातो,
त्यावेळी आपण निराळे उरत नाही. अशाप्रकारे तत्व निरसनाने आत्मनिवेदन सहजच घडते.
मनुष्य म्हणजे देह + मन + आत्मा. आत्मा हा खरा मी होय. परंतु आज आपण देह आणि मन
यांच्या युतीस मी असे मानतो. परंतु देहबुद्धीच्या आश्रयाने वावरणारा “मी” तत्व
विचारांसमोर टिकत नाही. खोटा मी नाहीसा होणे हेच आत्मनिवेदन होय. संपूर्ण विश्व हे
पंच महाभूतानि बनलेले आहे. त्याचे विवेकाने विवेचन केले तर, सर्वांचा निरास होतो. अशा
प्रकारे दृष्य विश्वाचे किंवा प्रकृतीचे निरसन झाले की आत्मस्वरूप तवढे शिल्लक
राहते. मग आपला “मी” वेगळा राहतोच कोठे? या विश्वात मुख्य मूलतत्वे दोनच आहेत. एक
परमेश्वर आणि दुसरी विश्वाचा आकार घेवून दिसणारी प्रकृती. या दोघामध्ये “मी” हा
चोर येतोच कोठे? आपण या विश्वाकडे सक्षित्वाने पाहू लागल्यास ती तत्वे सहजपणे
नाहीशी होतात, नंतर प्रत्यक्ष आत्म्याचा अनुभव आला की साक्षिपणा सुद्धा उरत नाही.
विश्वाच्या आरंभी केवळ आत्माच होता आणि विश्वाच्या अंती सुद्धा केवळ आत्माच शिल्लक
राहतो. असे असताना आपल्या मी पणाला वेगळे अस्तित्वच उरत नाही. श्री समर्थ म्हणतात
“मी पणा वीरणे अर्थात लयास जाणे हेच
आत्मनिवेदनाचे मर्म आहे. आत्मा सगळीकडे व्यापून आहे. आपल्या सच्चीदानंद स्वरूपाने
तो भरलेला आहे आणि मीच तो आत्मा सगळीकडे व्यापून आहे असे श्रुती सांगते. म्हणजे
खरा मी सगळीकडे व्यापून आहे आणि स्वानंदाने संपूर्ण भरलेला आहे. हे खरे असताना मी
अन्य कोणी निराळा असूच शकत नाही. म्हणून देहाचा अहंकार असत्य आहे. “कोहम” अर्थात
मी कोण आहे? याचे उत्तर “सोहम” अर्थात तो मी आहे आणि मी तो आहे. श्री समर्थ म्हणतात या उत्तरामध्ये भरून असलेला अर्थ उकलुन
पाहावा. त्याच्या विचारात शिरले की “मी”
आणखी कोणी निराळा आहे असे सिद्ध
होत नाही.
“तत् त्वं असी” म्हणजे “ते तू
ब्रम्ह आहेस” असे उपनिषदातील स्वानुभवाचे
महावाक्य आहे. या मधील तिन्ही पदांचे उल्लंघन करुन जो आत्मस्वरूपापर्यंत पोहोचला त्याला भेद आणि
अभेद दोन्हीही लटके होतात. आत्मवस्तू मुळातच भेदरहित असल्याने तिला भेद आणि अभेद
स्पर्श करू शकत नाहीत. ती आत्मवस्तू जो स्वतः बनला त्याला मी देह आहे अशी मी पणाची
निराळी अवस्था कशी असणार? म्हणून मी पणा असत्य आहे. मी जीव आहे आणि तो शिव आहे हा
विद्या आणि अविद्या यांनी निर्माण केलेला भेद आहे. या भेदाची उपाधी नाहीशी केली तर
मूळ आत्मस्वरुपात जीव, शिव असा भेद नाही
हे ध्यानात येईल. जीव, शिव भेदरहित असलेला आत्मा हेच आपले खरे स्वरूप आहे. असा
निश्चय झाला की मी देह आहे ही अहंता असत्य आहे.भगवंत आणि भक्त दिसावयास भिन्न
दिसले तरी ते वेगळे नसतात. ते दोघे एकमेकांशी अनन्य असतात, एकरूप असतात. भक्ताने
आपला संपूर्ण मी पणा भगवंताला अर्पण करुन
त्याच्याशी एकरूप होऊन जाणे यालाच
आत्मनिवेदन असे म्हणतात. ज्या प्रमाणे पंच महाभूतांमध्ये आकाश श्रेष्ठ, समस्त
देवांमध्ये जगदीवर श्रेष्ठ त्याच प्रमाणे सर्व भक्तीच्या प्रकारात “आत्म निवेदन
भक्ती” सर्वात श्रेष्ठ आहे. ही आचरली असता सायुज्य मुक्ती मिळते. या संपूर्ण
विश्वाचा लय झाला तरी सायुज्य मुक्ती मध्ये कोणताही फेरबदल होत नाही.
2) शुद्ध ज्ञान.
श्री समर्थांनी शुद्ध ज्ञानासंबंधी केलेले विवेचन आता आपण पाहू.
सामन्यपणे ज्ञान म्हटले की आपल्या दृष्टी
समोर विविध शास्त्रांतील विवेचनाचे दृश्य दिसते. परंतु श्री समर्थ म्हणतात ज्ञान
म्हणजे केवळ आत्मज्ञान अन्य कांही नाही. आपण आपणास, स्वत:स पहाणे, आपल्या सत्य
स्वरूपाला जाणणे, अर्थात मी कोण ते ओळखणे हेच खरे ज्ञान आहे. मी म्हणजे हा देह
नसून सच्चिदानंद स्वरूप, अविनाशी असा
आत्माच आहे. माझा हा पंचभूतानी बनलेला देह
नारळाच्या कवटी सारखा बाहेरील आवरण आहे. आपणामधील खरा मी हा आत्मा आहे त्यास ओळखले
पाहिजे. या विश्वात कायम टिकणारे काय आणि तात्पुरते राहणारे काय आहे ते निश्चित
करावे. याला ज्ञान म्हणतात. श्री समर्थ पुढे म्हणतात, मनुष्याचा देह हा तात्पुरता
आणि नश्वर आहे. परंतु आत्मा मात्र कायम टिकणारा आहे. खरा मी म्हणजे हा देह नाही तर
मी आत्मस्वरूप आहे. तोच ब्रम्हस्वरूपाने ईश्वर आहे. हे स्वरूपच कायम टिकणारे आहे.
या संदर्भात तैत्तरियोपनिषद सांगते “सत्यम ज्ञानम अनंत ब्रह्मम” तसेच एतत्तरिय
उपनिषद सांगते “प्रज्ञाने ब्रह्मम” आत्मस्वरूप आणि ज्ञान अभिन्न आहेत. ज्या
अवस्थेमध्ये प्रकृतीचा पसारा संपतो, पंचभूतांचा डोलारा मावळून मी, तू हा व्दैतभाव
संपूर्णपणे नष्ट होतो, त्या अवस्थेस ज्ञान असे म्हणतात. समर्थ पुढे सांगतात जो
अनुभव बुद्धी, मन यांना आकलन होत नाही, जो तर्काने विचारांच्या कक्षेत आणता येत नाही.
परा वाणीच्याहि पलीकडे आहे त्या अनुभवाला
ज्ञान असे म्हणतात. देह बुद्धीच्या तीन अवस्था- जागृती, स्वप्न, आणि सुषुप्ती या
तिघीना ओलांडून चौथ्या अवस्थेत प्रवेश केला की आत्मबुद्धी उदय पावते. परंतु ती सुद्धा मावळून केवळ
स्वरूप उरते, हे खरे ज्ञान आहे. पदार्थ ज्ञान म्हणजे दृश्य पदार्थ जाणणे,
दृष्यरहित शुद्ध स्वरूप जाणणे म्हणजेच आत्मज्ञान. आत्मा हा ब्रम्हस्वरूप किंवा
आत्मरूप आहे आणि आपण आत्मस्वरूप आहोत म्हणून आपण ब्रह्मस्वरूप अथवा परमात्म स्वरूप
आहोत. सर्व महावाक्यांचा अर्थ असाच आहे. मी देह नसून आत्माच आहे आणि आत्मा
ब्रह्मस्वरूप असल्याने मी ब्रह्मस्वरूप आहे असा प्रत्यक्ष अनुभव आला म्हणजे
आत्मज्ञान प्राप्त झाले असे समजावे. हे ज्ञान अति सूक्ष्म विचारांनी आपल्यामध्ये
उदय पावते आणि त्याच्यामध्ये सारे विरोध मावळतात. आत्मज्ञान झाले की आपण बांधले
गेलो आहोत हा अज्ञानाने होणारा भ्रम नष्ट
होतो. आत्मज्ञानाला मोक्ष देणारे ब्रम्हज्ञान असे नांव आहे. आत्मा सर्वव्यापी
असल्याने आपण आत्मज्ञानाने सर्वज्ञ बनतो. सर्व ठिकाणी मीच व्यापून आहे असा अनुभव
आल्याने देहापुरता मी आहे ही आकुंचित वृत्ती शिल्लक राहत नाही. श्री समर्थ
श्रोत्यांना पुढे सांगतात आत्मज्ञान सर्व ज्ञानाचे शिखर आहे. सद्गुरूंच्या कृपेने
ते विनासायास प्राप्त होते. सद्गुरूंचे वचन हेच आत्मज्ञानाच्या बाबतीत परम श्रेष्ठ
प्रमाण आहे. अति खोल आणि अतिगंभीर असे कांही असेल तर ते सद्गुरूवचन आहे.
सद्गुरूवचन हाच खरा सिद्धांत होय. ते वचनच खरे अनुभवलीलेले ज्ञान आहे. श्री समर्थ
पुढे म्हणाले “श्रोत्यानो, ते वचनच खरोखरी माझ्या जीवनाचे रहस्य आहे, गुपित आहे.
ते मी आता तुम्हाला सांगतो. “अहं ब्रम्हस्मी” हे
महावाक्य आहे. “मी ब्रम्ह आहे” असा याचा अर्थ आहे. या अर्थामध्ये गुरु आणि शिष्य
दोघे एकरूप होऊन जातात. श्रोत्यानो या महावाक्यातील मर्म ऐका “तुम्ही सर्व स्वतः
ब्रम्हरूप आहात.” याबद्दल किंचितही शंका मनात बाळगू नका. एवढे बोलून श्री
समर्थांनी शुद्ध ज्ञानाचा समास संपविला.
3) ब्रम्ह निरुपण.
हे संपूर्ण विश्व पंचमहाभूतांपासून निर्माण झालेले आहे. परंतु ते कायम
टिकणारे नाही. त्यात सतत बदल होत राहणे हा विश्वाचा मूळ स्वभावच आहे. हे विश्व
निर्माण होण्यापूर्वी आणि निर्माण झाल्यानंतर गुणातीत ब्रम्ह जसेच्या तसे राहते.
ही खरी शाश्वतपणाची खुण आहे. पंचभूतांपासून निर्माण होणाऱ्या सर्व वस्तू नाशवंत
असतात.विश्व आले आणि गेले तरी जी वस्तू अबाधित राहते ती निर्गुण ब्रम्ह होय. मूळ,
शुद्ध, निर्मळ, आणि गुणातीत परब्रह्माला या विश्वाचा पत्ता सुद्धा नसतो.
सच्चीदानंद हा त्या परब्रह्माचा स्वभाव आहे. त्यातील आनंदाला जे स्फुरण असते
त्याला माया असे म्हणतात. ब्रम्ह शस्त्राने तोडता येत नाही, विस्तवाने ते जळत
नाही, पाण्यात कालविले जात नाही, ते गतिमान वायुने उडत नाही. ते पडत नाही, झडत
नाही, त्याला घडविता येत नाही. त्याला कोणताही रंग नाही, ते सर्व पदार्थापेक्षा
वेगळेच आहे. ते सदा सर्वकाळ असते, ते निरंतर टिकते. ते दिसत नसले तरी सर्वत्र भरून
आहे. ते सूक्ष्मपणाने प्रत्येक ठिकाणी व्यापलेले आहे. जे इन्द्रियाना दिसते आणि
उघड असते ते नेहमी असार असते, मिथ्या
असते. जे गुप्त असते ते सूक्ष्म असते, ते सार असते, सत्य असते. गुरुदेवांकडून
प्रत्यक्ष ऐकलेल्या उपदेशाने हे विवेचन बरोबर कळते. साधना करुन सूक्ष्म ब्रम्ह
पाहण्याचे, अनुभवण्याचे सामर्थ्य अंगी आणावे. अध्यात्म श्रवण करुन ते परब्रम्ह
प्राप्त करुन घ्यावे. परब्रम्ह हे आप, तेज, वायू नव्हे,ते व्यक्त नाही,
इन्द्रियाना दिसणारे नाही, ते अव्यक्त, अतींद्रिय आहे. ब्रम्ह डोळ्यांनी दिसत
नाही. त्यामुळे केवळ इंद्रिय दृष्टीने पाहणाऱ्या मूढ लोकांना ते नसल्या प्रमाणे
वाटते. ते सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे. ब्रम्ह इतके सूक्ष्म आहे की ब्रम्हदेवाना
सुद्धा ते जाणणे कठीण पडते. ब्रम्ह असे आहे, तसे आहे, असे कितीही वर्णन केले तरी
त्या वर्णनाहून ते निराळेच आहे. श्री समर्थ म्हणतात श्रवण करुन साधनाभ्यास करणे हा
एकच उपाय ब्रम्हदर्शन करुन देतो. ब्रह्माची असंख्य नांवे आहेत ते खरे परंतु ब्रम्ह
त्या नांवाच्या पलीकडे आहे. कोणतेही नांव त्याचे स्वरूप असे आहे हे निश्चित पणाने
सांगू शकत नाही. ब्रम्ह हे “ ब्रम्हनाद”
रूप आहे, ज्योतिरूप आहे, चैतन्य रूप आहे, सक्षिरुप आहे. ते सनातन आहे. सर्वज्ञ
आहे, सर्वात्मा आहे, सर्वेश्वर आहे. ते सदोदित आहे, शाश्वत आहे. शब्दांच्या पलीकडे
आहे. ते विशाल आहे, विस्तीर्ण आहे, विश्वाला
ते भरून आहे. ते आकाशाप्रमाणे मळहीन आहे. ते आत्मा, परमात्मा, आणि परमेश्वर
आहे.
4) मायेचे
स्वरूप.
सच्चीदानंद स्वरूपातील परब्रम्हातील आनंदाला
जे स्फुरण येते त्याला माया असे म्हणतात. मायेमुळे परमात्मा ईश्वर रुपाने
मनुष्याच्या आटोक्यात येतो. मायेमध्ये अनेक शक्ती वास करतात. त्यापैकी प्रकृती ही
एक शक्ती आहे. ती हे दृष्य विश्व निर्माण करते. ती स्वतः अव्यक्त असून सर्व व्यक्तांचे
मूळ आहे. तिच्यामध्ये आठ अंगे असतात. तीन गुण सत्व, रज, तम आणि पंच महाभूते मिळून
अष्टधा प्रकृती बनते. प्रकृती ही विश्वव्यापी असल्याने व्यक्त अवस्थेस येताना तिचा
सर्व व्यापीपणा सामान्यपणे कायम ठेवते. यामुळे जगातील वस्तुना दोन अंगे असतात. एक
सामान्य आणि दुसरे विशेषांचे अंग. विशेषाला व्यक्ती किंवा रूप असे म्हणतात तर
सामन्याला जाती किंवा नाम असे म्हणतात. संन्या अव्यक्त असते परंतु बुद्धीला आकलन
होते. अव्यक्तामधून व्यक्त रूप धारण करते. कांही काळ तेथे वावरते नंतर पुन्हा
अव्यक्तातविलीन होते. या प्रकृतीच्या खेळास दृष्य असे म्हणतात. हे अंतिम सत्य
नसल्याने प्रत्यक्ष दिसत असले तरी भ्रमरूप असते. ते बाजूस सारून परमात्म स्वरूपाचा
अनुभव घ्यावा लागतो. माया ही परमात्म स्वरुपाची शक्ती दृश्याचा सारा खेळ घडवून
आणते. माया हा शब्द “मा” या धातूपासून तयार होतो. “या” म्हणजे मोजणे, मावणे,
समावेश होनेहोने. माया म्हणजे “विश्वमती यास्याम” जिच्या मध्ये विश्व सामावले
जाते. जी परब्रम्हला मोजमापात आणते. शुद्ध, निर्मळ, निर्गुण परब्रह्मामध्ये अनंत
शक्ती आहेत त्यापैकी दृष्य, नामरूपे किंवा आकार निर्माण करणारी ही एक विलक्षण
शक्ती आहे. ही प्रथम अत्मारुपावर झाकण घालते. या श्कीचे नांव आहे माया आणि झाकणाचे
नांव आहे अज्ञान. अविद्या, अध्यास, भ्रम,
देहबुद्धी ही सारी मायेचीच प्रजा आहे. आत्मज्ञानी पुरुष मायेच्या प्रभावाने फसून
जाऊन तो आत्मस्वरुपास विसरत नाही आणि दृष्याला खरेपणा देत नाही. परंतु अज्ञानी
व्यक्ती मायेच्या अधीन होऊन स्थळ काळ निमित्तांच्या बंधनात वावरतो त्यामुळे
आत्मस्वरूप तर विसरतोच, परंतु त्याबरोबरच संपूर्ण विश्व सत्य मानतो.
आत्मज्ञानाच्या भूमिकेवरून पहिले तर ब्रम्ह आणि त्याची शक्ती दोन्ही एकरूपच आहेत.
परंतु आज्ञानाच्या भूमिकेवरून पाहिल्यास ब्रम्ह आणि माया वेगळी वाटतात.म्हणून
मानवी बुद्धीच्या पद्धतीने श्री समर्थांनी ज्ञानमय ब्रम्ह आणि अज्ञानमय माया यांची
तुलना केली आहे. ते म्हणतात ब्रम्ह निर्गुण निराकार तर माय सगुण साकार, ब्रम्ह
अनंत तर माया परिमित आहे. ब्रम्ह निर्मळ निश्चल, तर माया चंचल,चपळ आहे. ब्रम्ह
दिसत नाही परंतु माया दिसते. ब्रम्ह भासत नाही परंतु माया भासते. ब्रम्ह कल्पांत
काळी सुद्धा नाश पावत नाही, परंतु माया नाश पावते. ब्रम्ह निर्माण होत नाही, परंतु
माय निर्माण होते. ब्रम्ह क्षय पावत नाही परंतु माय क्षय पावते. ब्रम्ह
विकारांपासून मुके तर माय विकारयुक्त असते. ब्रम्ह कांहीच करीत नाही परंतु माया
सर्व कांही करते. विश्वामध्ये सर्वकडे माय पसरलेली आहे त्यामुळे ब्रम्ह झाकले गेले
आहे. परंतु साधू पुरुष मायेच्या विस्तारातून शुद्ध ब्रम्ह स्वरूप निवडून घेतात.
ब्रम्ह अत्यंत सूक्ष्म, तर माय आत -बाहेर स्थूल आहे. ब्रम्ह वाणीने वर्णन करुन
सांगता येत नाही. माया जसे तिचे वर्णन करावे तशी असते. विवेक वापरून माया आणि
ब्रम्ह याना वेगळे केले असता जन्म मरण चुकते.
Subscribe to:
Posts (Atom)